सुहानीच्या शिक्षणाची गाडी रुळावर आलेली पाहून सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला- मी मात्र साशंक होते. सुहानी संस्थेत आली, शाळेत जाऊ लागली त्याला जेमतेम पंधरा दिवस लोटले असतील, नसतील, संध्याकाळी एक मध्यमवयीन गृहस्थ संस्थेत आले. सुहानीची चौकशी करू लागले. मी सुहानीकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. भीतीनं ती अगदी गर्भगळीत झाली होती..

दसऱ्याचा सण आमच्या संस्थेत दणक्यात साजरा होतो. तसा तो त्याही वर्षी झाला. श्रीखंड-पुरीचं जेवण जेवल्यावर दुपारी मोठय़ांसकट मुलंही पेंगुळली. वातावरण इतकं सुस्तावलं होतं की एखादी डुलकी काढण्याचा मोह आवरेना. तेवढय़ात जिन्यातून गडबड ऐकू आली. बायकामुलांचे संमिश्र आवाज आले. आता डुलकीचं काही खरं नाही हे समजलं. येणाऱ्यांची वाट बघायला लागले. काही क्षणातच मंडळी जिना चढून वर आली. दोन मध्यमवयीन स्त्रिया, त्यांच्यासोबत दोन मुली आणि दोन मुलगे, असा एकंदर लवाजमा कार्यालयात आला. आम्हा बसलेल्या मंडळींकडे स्तब्धपणे बघत मंडळी उभीच राहिली.

मी त्या सर्वाकडे बघत होते. दोघींमधली एक थोडं पुढारीपण घेऊन उभी होती. बारीक दिसत असली तरी अंग धरून होती. दुसरी तिच्या पाठी उभी होती. तिची मात्र अगदीच रया गेली होती. गाल अगदी आत गेलेले, डोळ्यांचीही अवस्था तशीच. तरुण वय दिसत असूनही तोंडातल्या काही दातांनी रजा घेतलेली दिसत होती. अंगावरची साडी विरलेली. कशीबशी पदर गुंडाळून उभी होती. उभी तरी कशी, कुठल्याही क्षणाला खाली पडेल अशी. मी तिला खुणेनंच समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तिनं ती संधी घेतली आणि मटकन् खाली बसली. मग जरा मुलांकडे बघायला सवड झाली. एकंदर निरीक्षणावरून समोर बसलेल्या बाईंची ती मुलं असावीत अशी अटकळ मी बांधली.

आता काही बोलणार, विचारणार एवढय़ात पुढे उभी राहिलेली नऊ- दहा वर्षांची मुलगीच बोलायला लागली. म्हणाली, ‘‘तुमची संस्था गरीब पोराला शिकवते, असं ऐकलंय म्हणून आमी आलोय. आमाला ठिवून घ्या आणि शिकवा. काय पण करा पण आमाला शिकवा.’’ एका दमात ती मुलगी अगदी खणखणीत आवाजात एवढं बोलली. मग एकदम गप्पच बसली. अपेक्षेनं आम्हा सर्वाकडे आळीपाळीनं टकामका बघत राहिली. बोलण्या, बोलण्यातून, मुलांच्या डोक्यावर छप्पर नाही हे लक्षात आल्यावर अर्थातच त्यांची व्यवस्था करणं ओघानं आलंच. त्या दृष्टीनं मी कागदपत्रांची चौकशी केली. मुलांच्या आईच्या हातात किती तरी कागदपत्रं होती. त्यातच चौघांचेही शाळेचे दाखलेदेखील होते. चौघांचे दाखले चाळल्यावर एक वेगळी बाब लक्षात आली. ती म्हणजे चारही भावंडांच्या मधल्या नावात आणि आडनावात फरक होता. सख्खी म्हटली जाणारी भावंडं आणि हा फरक कसा काय, असं वाटून आणखी खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की मुलांना शाळेत जायची इतकी ओढ होती की वडिलांच्या गैरहजेरीत आईच्या मानसिक असंतुलनाच्या काळात आठवेल त्या नातेवाईकाचे नाव सांगून येनकेनप्रकारेण मुलांनी शाळेत प्रवेश मिळवला होता. प्रवेश मिळवताना त्यांना आठवेल ते नाव (वडिलांचं म्हणून) त्यांनी सांगितलं होतं. ते कधी मामाचं होतं तर कधी काकाचं. सोबतीला असलेली आई हे काहीही नीट समजून घेण्याच्या पलीकडे होती. तिला काळजी होती पोरांच्या आणि स्वत:च्या पोटात चार घास कसे जातील, रात्री पाऊस पडला तर झोपायचं कुठे याची.

मुलं शाळेत जातात का, नाव काय लावतात, त्यांच्यापाशी पाटी पुस्तक आहे का, हे प्रश्न तिला सतावत नव्हते, कारण या प्रश्नांपासून ती किती तरी योजनं दूर होती. दारिद्रय़, वंचितता, दु:ख यांनी तिला गांजून टाकलं होतं. मुलांनी मात्र आपापले शोध लावले होते. पुढे कागदपत्रांचं काय करायचं ते बघू. आधी मुलांना राहू दे, अशा ठरावावर आम्हा सर्वाचं एकमत झालं. अशा प्रकारे सुहानी (मोठी, घडाघडा बोलणारी मुलगी) व तिची धाकटी बहीण आमच्याकडे संस्थेत राहिल्या. ताबडतोबीनं रुळल्या आणि मुख्य म्हणजे शाळेत जाऊ लागल्या. सुहानीच्या दोन्ही भावांनी मात्र संस्थेत राहणं, शाळेत जाणं साफ नाकारलं.

सुहानी आणि तिची तीन भावंडं आपल्या आईसोबत अक्षरश: रस्त्यावर आली होती, नव्हे त्यांच्या बेजबाबदार बापानं त्यांची ही अवस्था केली होती. चार मुलं झाल्यावर दुसरं लग्न करण्यासाठी तो माणूस पळून गेला आणि तसंही दारिद्रय़ात दिवस काढणारी ही मायलेकरं एकदम बेघर झाली. कधी देवळाचा आश्रय घे तर कधी कुणाच्या पडवीत रात्र काढ तर कधी रस्त्यावरच मुक्काम ठोक, अशी त्यांची त्रिस्थळी यात्रा चालली होती. मग हळूहळू सारे जण सावरले. आयुष्याला सामोरे गेले. सुहानीच्या आईनं कुठं तरी काम धरलं आणि सुहानीलाही एका घरी कामासाठी ठेवलं. त्याचवेळी सुहानीमधल्या बंडखोरीची पहिली चुणूक दिसली. झालं असं की, सुहानी घरी कामाला राहिली तिथल्या माणसांनी ‘आम्ही तिला दुपारच्या शाळेत पाठवू,’ असं भरघोस आश्वासन दिलं, पण त्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आली तेव्हा मात्र मंडळी का कू करू लागली. सकाळपासून कामच एवढं असायचं की सुहानी दुपारच्या शाळेला एकही दिवस वेळेवर जाऊच शकत नसे. रोज उशिरा जाणं, गृहपाठ अर्धवट असणं या साऱ्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे सुहानी अभ्यासात कमालीची मागे पडायला लागली. वर्गात काय चाललंय याचा मुळी तिला अर्थबोधच होईना.

सुहानीकडून काम करून घेणाऱ्या माणसांना हेच तर अपेक्षित होतं. सुहानी एकंदर प्रकाराला कंटाळून शाळा सोडून देईल, असा त्यांचा कयास होता. तो मात्र साफ चुकला. शाळेत जायला मिळत नाही असं समजल्यावर त्या दहा-अकरा वर्षांच्या मुलीनं असहकार पुकारला. वारंवार आईकडे जाण्याचा हट्ट करणं, रडणं, उपाशी राहाणं अशा अनेक उपायांचा सुहानीनं अवलंब केला. त्याच सुमारास तिला आमच्या संस्थेविषयी कळलं. त्याक्षणी संधी मिळताच सुहानीनं तिच्या आत्याकडे धाव घेतली. ही आत्या म्हणजे सुहानीच्या आईसोबत आलेल्या त्या बाई होत.

सुहानीच्या शिक्षणाची गाडी रुळावर आलेली पाहून सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला- पण मला मात्र अजूनही एकंदरीत प्रकरणाबद्दल साशंकता होती. ती मंडळी सुहानीचा इतक्या सहजासहजी नाद सोडतील असं मला मुळीच वाटत नव्हतं. दुर्दैवानं माझी ही भीती खरी ठरली. सुहानी संस्थेत आली, शाळेत जाऊ लागली त्याला जेमतेम पंधरा दिवस लोटले असतील, नसतील, संध्याकाळी एक मध्यमवयीन गृहस्थ संस्थेत आले. सुहानीची चौकशी करू लागले. मी त्यांना कार्यालयात बोलावलं पण ते त्याला तयार होईनात. ‘मला एकटय़ानं सुहानीशी पाच मिनिटं बोलायचं आहे,’ असं सारखं सांगू लागले. मी सुहानीकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. भीतीनं ती अगदी गर्भगळित झाली होती. त्या गृहस्थांना तिनं ओळखलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या स्वरातला धमकीचा सूरही तिला समजला होता. तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. फक्त तिची मान भयानं नकारार्थी हलत होती. सुहानीची ती अवस्था मला बघवेना. मी थोडय़ा खंबीर स्वरात त्या व्यक्तीला कार्यालयात बोलावलं. त्या गृहस्थांनी सुहानीच्या आईनं आपल्याकडून बरीच मोठी रक्कम उसनवारीनं घेतल्याचं सांगून ते सुहानीकडून वळते करून घेण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट केला.

मला काय बोलावं ते सुचेना. सुहानीच्या आईनं घेतलेले पैसे त्या कोवळ्या मुलीकडून काम करून वळते करून घेतले जाणार होते. पुढे काय झालं ते सांगत बसण्यापेक्षा एवढंच सांगते की बाल कामगार प्रतिबंधक कायदा व त्याचा भंग केल्यास काय होऊ शकतं याची जाणीव दिल्यावर ते गृहस्थ निमूटपणे उठून गेले ते परत कधीच आले नाहीत.

सुहानी शाळेत जाऊ लागली ती आपल्या बहिणीचं बोट धरून. मात्र सुहानीचा जीव जसा शाळेत जायला, शिकायला तळमळत असायचा, तशी आवड तिच्या बहिणीच्या ठायी आढळली नाही. रस्त्यावर राहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात एक स्वैरपणा येत जातो. तो सुहानीच्या तीनही भावंडांत स्पष्ट दिसायचा. कुठं तरी फिरत राहावं, मिळेल ते काम करावं, त्यातून काही चटकमटक खावं आणि रात्र झाली की आईचा पदर धरून ती नेईल तिथं जाऊन त्या रात्रीपुरती पाठ टेकावी. असाच त्यांच्या आयुष्याचा क्रम बनून गेला होता. त्यातून सुहानीची बहीण कोणीही चॉकलेटची लालूच दाखवली तरी जायची. ही बाब मात्र आम्हाला अतिशय अस्वस्थ करायची. शारीरिक, मानसिक, भावनिक पाठबळ नसलेली ही मुलं कुठल्या संकटांना तोंड देत असतील याची  कल्पना करता यायची.

बहिणीला या सवयीपासून वाचवता यावं यासाठी सुहानीचा आमच्यापाठी लकडा असायचा. गंमतीची गोष्ट म्हणजे यात आम्हाला मदत केली ती एका पोलीसदादांनी. हे कॉन्स्टेबल रस्त्यावरील मुलांचे काही प्रश्न सोडवताना आमच्या परिचयाचे झाले होते. एकदा चर्चेच्या ओघात या समस्येचा उल्लेख झाल्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, मी सोडवतो यातून पोरीला.’’ खरंच तो भला माणूस आमच्याकडे आला. ढगांच्या गडगडाटासारखा आवाज असणाऱ्या त्या माणसाचा आवाज इतका मृदू लागू शकतो हे खरंच वाटलं नसतं, पण तसं दिसत होतं खरं. किती तरी वेळ पोलीसदादांनी (पुढं या दोघी जणी त्यामुळे इतर मुलंही त्यांना मामा म्हणायला लागली.) त्या बालिकेला काय सांगितलं कोण जाणे. पण गाडी रुळावर आली खरी. सुहानीला कविता करायला आवडायच्या. खूप कविता करायची ती. कुठलाही विषय तिला वज्र्य नव्हता आणि नवल म्हणजे कवितेचं व्यक्त होणं आनंदी असायचं. कदाचित शिकायचं, खूप शिकायचं ही ध्येयप्राप्ती झाल्यावर बाकीच्या अडचणी अगदीच क्षुल्लक वाटायला लागल्या असतील. आयुष्य सुंदर वाटायला लागलं असेल.

तरीही एक अडचण होतीच. सुरुवातीला सुहानीसकट आम्हा सर्वानाच वाटलं की, मुली योग्य ठिकाणी राहिल्यामुळे आईला खूप बरं वाटेल. आई जवळपासच राहत होती. भेटायला येऊ शकत होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही सुहानीच्या आईनं आपल्या चारही मुलांना वाढवलं होतं, वाढवत होती. आता त्यातला अर्धा भाग सुटून गेला व ती एकाकी अर्धपोटी राहणारी स्त्री उन्मळून गेली. मुलींसाठी व्याकूळ होऊन रडू लागली. हातात चार पैसे आले की कुठलंही खाणं घेऊन मुलींना भेटायला धाव घेऊ लागली. यातील मनस्ताप अस झाला की ईश्वराची करुणा भाकत एखाद्या मंदिराचा आश्रय घेऊ लागली.

सुहानीच्या आईला यातून बाहेर यायला खूप वेळ लागला, पर्यायानं तिच्या मुलांनाही. कालांतरानं याही वेळी त्या कुटुंबानं परस्थितीशी तडजोड केली. कधी ना कधी आपण एकत्र असणार आहोत, असा आशेचा किरण त्यांना दिसत राहिला व त्यासाठी ते तात्पुरते वेगळे राहिले. झालंही तसंच. सुहानी मोठी झाली. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली. बारावीपर्यंत शिकली आणि नर्सिगचा कोर्स पूर्ण करून परिचारिका म्हणून पुण्याबाहेरील एका रुग्णालयात रुजू झाली आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे सगळं बघायला सुहानीच्या आईनं तग धरला. या बाईंची तब्येत इतकी तोळामासा होती की कधी कधी उद्याचा दिवस या बाई बघू शकणार नाहीत असं वाटावं. पण सुहानी शिकायला लागली तशी कमालीच्या खंगलेल्या या बाईनं जोर धरला. जीवनेच्छा बळावली व लेकीचं यश बघून तृप्त झाली आणि सुहानीची साठा उत्तरांची कहाणी सफल झाली.

रेणू गावस्कर

eklavyatrust@yahoo.co.in