या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धामध्ये भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी समाधानकारक आणि आश्वासक म्हणावी लागेल. २६ सुवर्णपदके आणि प्रत्येकी २० रौप्य व कांस्यपदकांची कमाई केलेल्या भारताने पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठ तिसरा क्रमांक पटकावला. हे करताना कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आपण खूपच मागे टाकले. निव्वळ आकडेवारीचा विचार केल्यास भारताची राष्ट्रकुल स्पर्धामधली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरते. यापूर्वी नवी दिल्ली २०१० स्पर्धेत १०१ पदके, तर मँचेस्टर २००२ स्पर्धेत भारताने ६९ पदके जिंकली होती; पण दिल्लीतील स्पर्धेत तिरंदाजी, टेनिस असे क्रीडा प्रकार होते. ते यंदा नव्हते. शिवाय मँचेस्टरमधील स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात स्नॅच आणि क्लीन व जर्क या प्रकारांमध्ये, तसेच एकूण कामगिरीसाठी स्वतंत्र पदकांची खिरापत वाटली गेली होती. तीही या वेळी नव्हती. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची पारंपरिक ओळख असलेल्या हॉकीत भारताला एकही पदक मिळू शकले नाही. त्याचे कोणाला वैषम्य वाटत नाही, कारण पदकासाठी केवळ याच प्रकाराकडे डोळे लावून बसण्याचे दिवस केव्हाच मागे सरले आहेत. या वेळी अनेक प्रकारांमध्ये भारताने अनपेक्षित सुवर्णपदके जिंकून दाखवली. टेबल टेनिसमध्ये सांघिक किंवा बॅडमिंटनमध्ये संमिश्र सांघिक प्रकारातील सुवर्णपदके उदाहरणादाखल देता येतील. मनिका बात्राने एकेरी, दुहेरी, सांघिक आणि मिश्र दुहेरी या प्रत्येक प्रकारात पदक जिंकले. टेबल टेनिसमध्ये तिने भारतातर्फे पहिले एकेरीतील सुवर्णपदक जिंकले. मनू भाकरने नेमबाजीत अवघ्या १६व्या वर्षी मिळवलेले सुवर्णपदक चर्चेत राहिले. तितकीच चर्चेत राहिली १५ वर्षीय अनीश भानवालाची नेमबाजीतली आणि दीपक लाथरची वेटलिफ्टिंगमधील कामगिरी. नीरज चोप्राने भालाफेकीत मिळवलेले सुवर्णपदक भारतासाठी पहिलेच ठरले. एकीकडे युवा खेळाडू अशा प्रकारे चमकत असताना बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, कुस्तीत सुशील कुमार आणि बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल या बुजुर्ग खेळाडूंनीही सुवर्णपदके जिंकली. गोल्ड कोस्टमधील भारतीय यश हे असे वैविध्यपूर्ण आणि सर्वंकष होते. सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदके जिंकली. टेबल टेनिसमध्ये बॅडमिंटनपेक्षा अधिक पदके मिळाली. काही दिवसांपूर्वी आयपीएल सुरू झाल्यानंतरही तिथला झगमगाट राष्ट्रकुलमधील झळाळत्या कामगिरीसमोर झाकोळला गेला. क्रिकेटेतर खेळांविषयी देशभर वाढू लागलेली आवड ही खरोखरच आश्वासक बाब आहे. अजूनही यातील बरेचसे यश हे व्यवस्थेमुळे नव्हे, तर व्यवस्थेशिवाय मिळालेले आहे. हरयाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा अपवाद वगळता शासकीय पाठबळ आणि पायाभूत सुविधांविषयी अजूनही उदासीनता आहे. महाराष्ट्रातही तेजस्विनी सावंत, राहुल आवारेसारखे सुवर्णपदक विजेते निर्माण होत असतात; परंतु इतर राज्यांच्या तुलनेत मराठी खेळाडूंना मिळणारे पाठबळ आणि सुविधा अजूनही पुरेशा दर्जेदार नाहीत. एखादी स्पर्धा आली, त्यात खेळाडूंनी पदके जिंकली की पारितोषिके जाहीर करून मोकळे व्हायचे, हे परिपक्वपणाचे लक्षण नाही. तळागाळातील खेळाडूंच्या विकासावर, ऑलिम्पिक-एशियाड-राष्ट्रकुल स्पर्धामध्ये पदकविजेते निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशातून लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. राज्याच्या ग्रामीण भागात आजही कुस्तीचे प्रस्थ आहे. पुणे, ठाणे ही शहरे एके काळी देशातील बॅडमिंटन केंद्रे होती. ललिता बाबर किंवा कविता राऊतसारख्या अ‍ॅथलीट ग्रामीण-आदिवासी दुर्गम भागातील परिस्थितीतून निर्माण होतात. निधीची चणचण सर्वच राज्यांना जाणवत असते, पण त्यातूनही हरयाणा, आंध्रसारखी राज्ये इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढतात. महाराष्ट्राने त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2018 commonwealth games indian medal in commonwealth games
First published on: 17-04-2018 at 02:33 IST