18 October 2019

News Flash

‘चौकीदार’ आणि ४० आमदार

मोदी यांच्या विधानानंतर आमदारांच्या फोडाफोडीला प्रारंभ झाल्यास चौकीदारच घोडेबाजार करीत असल्याच्या टीकेलाच बळकटी मिळेल.

(संग्रहित छायाचित्र)

महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी पदाची शान राखावी, अशी अपेक्षा असते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये अशा पदांवरील व्यक्ती या संकेताचे पालन करताना दिसत नाहीत. विरोधकांनी केलेल्या आरोपांना सरकारमधील मंत्र्यांनी उत्तरे देण्याची प्रथा-परंपरा होती. पण राफेल विमान खरेदीच्या वादावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर हवाई दलाच्या प्रमुखांनी भाष्य केले. लष्करप्रमुखांनीही विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली. घटलेला रोजगार किंवा काँग्रेस पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवर निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक हंगामात फक्त विरोधी पक्षाचे नेते किंवा विरोधकांशी संबंधितांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले. साऱ्या सरकारी यंत्रणा विद्यमान सरकारने किंवा ‘मोदी सरकार’ने आपल्या राजकीय फायद्यासाठी जुंपल्याचा आरोप अशा उदाहरणांमुळेच केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांतील वक्तव्यांविषयीच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, हाही आरोप होतो. निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात ही अपेक्षा कोणत्याही राजकीय नेत्याने व्यक्त करण्यात काहीच चूक नसतेच, परंतु ‘तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत,’ असे सांगून २३ मे रोजी लोकसभा निकालानंतर हे आमदार बाजू बदलून भाजपकडे येतील, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी निव्वळ प्रचारासाठी करणे, हे त्यांना पदाची प्रतिष्ठा राखता येते का, याविषयीचा नवा वाद निर्माण करणारे होते. निवडणुकीच्या प्रचारात मोदी हे जाहीर सभांमधून ‘मी चौकीदार’ असे सांगतात. तसे सभेतील लोकांकडून वदवून घेतात. पण हेच मोदी संधिसाधू आमदारांच्या पक्षांतरासारख्या राजकीय दुर्वर्तनाविषयी अभिमानाने भर सभेत बोलतात, यावर टीकाटिप्पणी होणारच. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालात कोणत्याही परिस्थितीत भाजपचे कमळ फुलवायचेच, असा निर्धार भाजपने केला आहे. एका राज्यातील आमदारांच्या पक्षांतराला पंतप्रधानांनी प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे, हा मुख्य मुद्दा. पंतप्रधान घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. ‘खासदार फुटणार’ असा दावा पंतप्रधानांनी केला असता तरी ते समजू शकले असते. पण एका राज्यातील आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच फुटणार, यात पंतप्रधानांनी लक्ष का घालावे? पक्षाध्यक्ष किंवा पक्षाचे अन्य नेते असल्या दाव्यांच्या पेरणीसाठी वापरता आले असते. पश्चिम बंगालमधील २४ मतदारसंघांमध्ये पुढील तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असताना, तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदारांमध्ये संदेश देण्याकरिता मोदी यांनी आमदार फुटणार अशी आवई उठविली हे क्षणभर मान्य केले तरी, २९४ सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत ममतादीदींच्या पक्षाचे २०० पेक्षा जास्त आमदार आहेत. पैकी ४० आमदार फुटले तरीही सरकारच्या स्थैर्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. तरीही मोदी यांनी हा दावा केला! उत्तर भारतात गतवेळएवढय़ा जागा मिळणे कठीण असल्याचा अंदाज आल्यानेच भाजप नेतृत्वाने बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच मोदी यांनी ममता यांना थेट लक्ष्य केले आहे. अलीकडेच चित्रपट अभिनेता अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी ममता बॅनर्जी दरवर्षी मला बंगाली कुडता आणि मिठाई पाठवितात, असे सांगत अन्य विरोधकांपेक्षा ममता वेगळ्या आहेत हे भासविण्याचा प्रयत्न केला. मोदी यांच्या विधानानंतर आमदारांच्या फोडाफोडीला प्रारंभ झाल्यास चौकीदारच घोडेबाजार करीत असल्याच्या टीकेलाच बळकटी मिळेल.

First Published on May 1, 2019 12:04 am

Web Title: 40 of your mla are in contact with me says pm modi