‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असे ब्रीद घेऊन दलित आणि बहुजनांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी बहुजन आझाद पार्टी हा नवा पक्ष; इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या देशातील अतिशय नामांकित शिक्षण संस्थेच्या पन्नास माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केला आहे. हे सर्व जण सुशिक्षित आहेत, शिवाय ते अनेक ठिकाणी उच्च पदांवर कामही करीत होते. हा पक्ष स्थापन करून या समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी या सगळय़ांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या आणि ते पूर्णवेळ या कामात उतरले. हे या नव्या पक्षाचे वेगळेपण. दलितांच्या समस्या डोळय़ांसमोर ठेवून देशात अनेक राजकीय पक्षांची स्थापना झाली. त्यातील रिपब्लिकन पक्षाची तर अनेक शकले झाली. शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाने आजच्या दलित-बहुजनांचे प्रश्न सुटले नाहीत. देशातील दलित आणि बहुजन समाज आजही अस्वस्थ आहे, याचे हा नवा राजकीय पक्ष हे निदर्शक आहे. अरविंद केजरीवाल हेही आयआयटीचे माजी विद्यार्थी. त्यांनीही आम आदमी पक्षाची (आप) स्थापना करून दिल्ली राज्यात दोन वेळा सत्ता मिळवली. या नव्या पक्षाचे संक्षेपीकरणही ‘बाप’ हे नाव धारण करते आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीय समाजासाठी हा पक्ष काम करणार असल्याचे संस्थापक नवीनकुमार यांचे म्हणणे आहे. ‘या समाजाला साबण आणि तेल नको आहे, तर त्यांचे हक्क आणि आरक्षण हवे आहे,’ असे ते म्हणतात. शिक्षण आणि नोकऱ्या या दोन्ही क्षेत्रांतून सरकार मागेच हटत चालल्याची अस्वस्थता जशी यामागे दिसते; तसाच सध्याच्या राजकीय पटलावर, या समाजाचे हितसंबंध राखणारे म्हणून जे राजकीय पक्ष आहेत, ते या समाजाला कोणत्याच पातळीवर आपले वाटत नाहीत, असाही याचा अर्थ होतो. राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांमध्ये या समाजाचे जे नेते आहेत, ते वळचणीलाच राहिले आहेत. त्यामुळे ते राजकीय आकांक्षा बाळगून असले, तरी ज्या समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात, त्या समाजाचे हित साधण्यात ते अपयशी होतात. बिहारच्या येत्या निवडणुकीत हा पक्ष सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. तयारी न करता घाईघाईत निवडणुका लढवणे, हे आपल्या पक्षाचे ध्येय नसल्याचे संस्थापकांचे म्हणणे आहे. हा पक्ष न्यायालयातील आरक्षणाची मागणी करतानाच, महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आणि भूमी सुधारणा, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानलालसा, याही मुद्दय़ांवर भर देणार आहे. प्रचलित राजकीय पक्षांचा नव्या पिढीशी असलेला संवाद तुटत चालला असल्याचे हे लक्षण आहे. युवकांना आपल्या जगण्यात आणि परिसरातील सगळय़ांच्याच जीवनात जो बदल अपेक्षित होता, तो घडताना दिसत नाही. राजकीय पक्षांकडून अशा समूहाचा उपयोग राजकारण करण्यापुरताच होतो आणि नंतर त्यांच्या प्रश्नांकडेही कमालीचे दुर्लक्ष होते, ही परिस्थिती बदलण्यासाठी देशात आजवर अनेक नवे प्रयोग झाले. कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना करताना विविध वर्गसमूहांमध्ये जे सामाजिक अभिसरण घडवून आणले, त्यामुळे त्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्तेपर्यंत पोहोचताही आले. सत्ताकारणासाठीची गणिते, हे सारे फार काळ टिकू देत नाहीत, असा अनुभव असतानाही बहुजन आझाद पक्षाने आपल्या वैचारिक प्रतीकांमध्ये डॉ. आंबेडकरांबरोबरच महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले, पेरियार, सुभाषचंद्र बोस, राम मनोहर लोहिया, अब्दुल कलाम आणि कांशीराम यांचा समावेश केला आहे. युवकांच्या आशाआकांक्षांना कवेत घेऊन नवसमाजनिर्मितीचे हे स्वप्न कसे पुरे होईल, ते पाहायला हवे.