‘सर (किंवा मॅडम), तुम्हाला लॉटरी लागली आहे, ते पैसे तुमच्या बँकखात्यात वळवायचे आहेत, त्यासाठी जरा खात्याचा तपशील सांगता?’ किंवा ‘तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे, त्यासाठी तपशील द्या पाहू..’ असे दूरध्वनी टाळण्याचे कसब एव्हाना सुशिक्षित भारतीयांच्या अंगवळणी पडले आहे. काही जण फसतातही, परंतु त्यापैकी फार थोडे अशा बुडीतखाती गेलेल्या रकमेचा पाठपुरावा करतात. कारण हे काम एकटय़ादुकटय़ानेच करावे लागते. मीरा रोड येथील ‘कॉल सेंटर’वरील छापे आणि त्यांचा पाठपुरावा, हे प्रकरण मात्र या नेहमीच्या अनुभवापेक्षा फार वेगळे आहे. ‘करसंकलन अधिकारी बोलतो आहे.. तुम्ही कर थकवला आहे.. आता ताबडतोब अमुक इतकी रक्कम क्रेडिट कार्डाने भरा.. ज्या कार्डाने भरली, त्याचा सारा तपशीलही द्या,’ अशा मागण्या अमेरिकेतील ६४०० करदात्यांकडे ठाणे जिल्ह्यातील कॉल सेंटरमधून केल्या जातात, रक्कम जमाही होते.. आणि प्रत्यक्षात अमेरिकेच्या करसंकलनाशी या कॉल सेंटरचा काहीही संबंध नसतो, याकडे अमेरिकी तपासयंत्रणांनी गांभीर्याने पाहिले. पैसे गमावणाऱ्यांनीही तक्रारी केल्या, त्याआधारेच भारतीय तपासयंत्रणेशी संपर्क साधता आला. नागरिकांच्या या फसवणुकीचा पाठपुरावा अमेरिकी तपासयंत्रणा आता भारतात येऊन करू इच्छितात. अर्थात महाराष्ट्र पोलिसांसाठी, मीरा रोड भागातील विविध कॉल सेंटरमधील ७७० तरुणांच्या तपासाचा पहिला टप्पाही प्रचंड होता. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर, ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, स्थानिक पोलीस निरीक्षक नितीन ठाकूर आणि या कारवाईत सहभागी झालेल्या २० अधिकाऱ्यांसह सुमारे २०० पोलिसांचे या कारवाईसाठी अभिनंदनच करायला हवे. शब्दश: रातोरात ७० प्रमुख संशयित हुडकून काढण्यात पोलिसांनी मिळवलेले यश अभूतपूर्व म्हणावे असेच आहे. या गुन्हेगारी जाळ्याचा खरा सूत्रधार अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलेला मूळ भारतीय आहे आणि त्याचे नावगाव आम्ही सांगणार नाही, असा सावध पवित्रा आपल्या पोलिसांनी घेतला आहे.  साधारण तीन कोटी सहा लाख रुपये भरतील, एवढय़ा रकमेसाठी झालेला हा अभूतपूर्व तपास पाहून तीन प्रश्न निर्माण होतात : पहिला, भारतातील अशाच स्वरूपाच्या आणि जनसामान्यांना नाडणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांबाबत आपल्या तपासयंत्रणा कितपत सजग असतात? दुसरा, फसवणुकीसाठी केवढे कौशल्य भारतीय तरुणांनी पणाला लावले होते याचीही माहिती आता ‘बीबीसी’पासून ‘वॉशिंग्टन पोस्ट’पर्यंत अनेक युरो-अमेरिकी प्रसारमाध्यमे देत असल्यामुळे भारताची जी नाचक्की होते आहे, तिचा थेट आर्थिक फटका आपल्या कॉल सेंटर उद्योगाला- किंवा एकूण ‘बीपीओ’  क्षेत्राला कितपत बसेल? तिसरा प्रश्न म्हणजे या ७० ‘कौशल्यवंत’ तरुणांसारखे जे आणखीही तरुण डिजिटल कृष्णकृत्ये करताहेत त्यांना जरब बसेल का? या तीनही प्रश्नांची उत्तरे निराशाजनक असली, तरी धक्कादायक नाहीत. आपल्या ‘बीपीओ’ उद्योगाची स्थिती उत्तमच राहील हे खरे, परंतु त्यापैकी ‘कॉल सेंटर’ या उपक्षेत्राला गेल्या काही वर्षांत उतरण लागलेली आहे. फिलिपाइन्स अथवा पूर्व युरोपीय देशांत नवी कॉल सेंटर्स वाढत असल्याने आपल्याकडील या क्षेत्राची विस्तारसंधी ७० टक्क्यांनी आधीच घटली आहे. विशेषत: कॉल सेंटरमधील तरुण व त्यांची नैतिकता हा गेले दशकभर चर्चेचा विषय आहेच. त्याहीपेक्षा गंभीर आहे, तो पहिला प्रश्न. आर्थिक गुन्ह्यांत नाडले गेलेल्यांना वाऱ्यावरच सोडण्याची आपली परंपरा अशीच सुरू राहणार असेल; तर मीरा रोडच्या अभूतपूर्व कारवाईचे कौतुक निष्फळच ठरते.