तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदावरून व्ही. के. शशिकला यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. हे जे घडले ते अपेक्षेप्रमाणेच.  अनिश्चितता होती ती हकालपट्टी कधी होणार यापुरतीच. पदावरून उचलबांगडी करण्यात आली असली तरी शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. अण्णा द्रमुक पक्षातील वादात भाजपने लक्ष घातले आणि साऱ्या घडामोडी पटापट घडत गेल्या. आता मूळ प्रश्न अण्णा द्रमुकचे सरकार किती काळ तगेल हा आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारणाचे जसे फायदे असतात तसेच तोटेही तेवढेच असतात. त्याचे उदाहरण म्हणजे तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष. चित्रपट अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे स्वरूपच गेली साडेचार दशके व्यक्तिकेंद्रित राहिले. रामचंद्रन आणि जयललिता या दोन गुरू-शिष्यांभोवतीच पक्षाचे सारे राजकारण फिरत राहिले. जयललिता यांनी हयातीत ना आपला उत्तराधिकारी नेमला, ना कोणाचे नेतृत्व पुढे आणले. जयललितांच्या निधनानंतर त्यांची मैत्रीण व्ही. के. शशिकला यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले. कसलाही जनाधार नसलेल्या फक्त जयललितांची खास मैत्रीण म्हणून पक्ष आणि सरकारच्या कारभारात लुडबुड करणाऱ्या शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यावर त्यांची महत्त्वाकांक्षा बळावली. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडले. आले शशिकलाबाईंच्या मनात आणि तामिळनाडूच्या राजकारणाचा सारा बाजच बदलला. शशिकला यांनी मुख्यमंत्रिपदाची सारी तयारी केली होती. त्यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी बंडाचे निशाण रोवले. याच दरम्यान बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावली. चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज या ऐतिहासिक इमारतीतील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यालयाऐवजी शशिकला यांची रवानगी बेंगळूरुच्या कारागृहात झाली. या घडामोडींनंतर मुख्यमंत्री पलानीस्वामी, माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांचे भाचे दिनकरन अशा तीन गटांमध्ये अण्णा द्रमुक विभागला गेला. तामिळनाडूत चंचुप्रवेश करण्यास हीच योग्य संधी आहे हे ओळखून भाजपने पुढाकार घेतला. लोकसभेच्या ३९ जागा असलेल्या या राज्यात आपल्याला अनुकूल अशा पक्षाचे सरकार असले पाहिजे या दृष्टीने भाजपची आखणी सुरू होतीच. एखाद्या राज्यात पाय रोवण्याकरिता प्रादेशिक पक्षाशी मैत्री करायची, मग मित्रपक्षाला संपवायचे आणि नंतर आपले वर्चस्व निर्माण करायचे ही भाजपची खेळी. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, आसाममध्ये आसाम गण परिषद या दोन प्रादेशिक पक्षांना भाजपने असेच संपविले व सत्ता हस्तगत केली. तामिळनाडूतही याचाच कित्ता गिरविला जाईल, असा एकूण रागरंग दिसतो. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळे वटारताच पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम या दोन गटांचे विलीनीकरण झाले. शशिकला यांच्या हकालपट्टीनंतर पक्षातील सरचिटणीस हे मुख्य पदच रद्द करण्यात आले. पक्षाचा कारभार मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम हे दोघे बघणार आहेत. उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम हे भाजपला सोयीचे आहेत. यामुळेच पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये अण्णा द्रमुक सरकार टिकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शशिकला यांची सरचिटणीसपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर त्यांचे भाचे दिनकरन यांनी सरकार पाडण्याचा निर्धार केला आहे. दिनकरन यांच्याबरोबर अद्याप २१ आमदार आहेत. विधानसभेतील २३४ पैकी १३१ सदस्य असलेल्या अण्णा द्रमुकमधून २१ जण गळाल्याने सरकार अल्पमतात येऊ शकते. सरकार अस्थिर होऊ नये हा भाजपचा प्रयत्न आहे आणि मोठाच योगायोग असा की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा अद्यापही निर्देश दिलेला नाही. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुक पक्ष किती काळ तगेल, हाच खरा प्रश्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiadmk general council meet sasikala out ttv vows revenge
First published on: 14-09-2017 at 03:04 IST