ब्राझीलमधील सर्वात मोठय़ा साओ पावलो शहराचे आकाश काही दिवसांपूर्वी भर दुपारी काळ्या ढगांनी आच्छादले. अवकाळी आलेल्या त्या काळ्या ढगांनी काहींना छायाचित्रणासाठी उद्युक्त केले. काहींना जगबुडी जवळ आल्याची भीती वाटून गेली. काहींना तो दैवी चमत्कार भासला. फारच थोडय़ांना त्यावेळी हे ठाऊक होते, की तेथून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अ‍ॅमेझॉन वर्षांवनातील अवाढव्य जंगलवणव्यांनी उठलेल्या धुरातून ते काळे ढग निर्माण झाले होते. जगातील सर्वात मोठे वर्षांवन असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वन आणि प्राणिसृष्टीला गेले काही आठवडे धुमसत असलेल्या जंगलवणव्याची झळ पोहोचू लागली आहे. पण ही झळ निव्वळ अ‍ॅमेझॉनच्या जीवसृष्टीपुरती मर्यादित राहणार नाही, असा विश्लेषकांचा होरा आहे. मोठय़ा जंगलांच्या वेशीवर वा काही वेळा जंगलातही वणवे पेटणे हे नवीन नाही. शेतीशी आणि जंगलांशी संबंधित टाकाऊ घटकांची विल्हेवाट असा कचरा पेटवूनच लावली जाते. विषुववृत्तीय जंगलांमध्ये अशा आगी प्रत्यक्ष जंगलांसाठी हानिकारक ठरत नाहीत. अ‍ॅमेझॉनसारखे वर्षांवन बारमाही हिरवे असते आणि सहसा कोरडे पडत नाही. त्यामुळे कॅलिफोर्नियातील कोरडय़ा जंगलांप्रमाणे या जंगलाच्या आजूबाजूला आगी लावण्याची फार बंधने नाहीत. पण अ‍ॅमेझॉनचे अवाढव्य जंगल ब्राझीलसह नऊ देशांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक देशामध्ये यासंबंधीचे कायदे भिन्न असतात. ते असले तरी अंमलबजावणी यंत्रणांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता भिन्न असते. तरीही जवळपास ६० टक्के अ‍ॅमेझॉन जंगल ब्राझीलमध्ये येत असल्यामुळे त्याच्या संवर्धनाची आणि सध्याच्या संकटातून मार्ग काढण्याची सर्वाधिक जबाबदारी ब्राझीलवर येते. या देशाचे नेतृत्व त्या दृष्टीने सज्ज आणि परिपक्व आहे का, या प्रश्नाचे उत्तर तूर्त ‘नाही’ असे द्यावे लागते. या अकार्यक्षम नेतृत्वामुळे अ‍ॅमेझॉन वणव्याचा मुद्दा अधिकच ज्वलंत बनलेला आहे.

अ‍ॅमेझॉन जंगल परिसरातील जंगलतोड नवीन नाही. गेली अनेक वर्षे विकासाच्या रेटय़ाखाली कमी-अधिक प्रमाणात ती होतच असते. साधारण गेल्या शतकात सत्तरच्या दशकात या जंगलतोडीला सुरुवात झाली. नव्वदच्या दशकात आणि नवीन सहस्रकात यात वाढच होत गेली. २००४ मध्ये एकटय़ा ब्राझीलमध्ये २८ हजार चौ.किमी.वरील जंगल साफ केले गेले. नंतरच्या काळात म्हणजे २०१४ पर्यंत यात काहीशी घट झाली. त्यानंतर पुन्हा हे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढू लागले आहे. या वर्षी एकटय़ा जुलै महिन्यात जवळपास १४०० चौ.किमी.वरील वर्षांवन नष्ट झाले आहे. यातून मार्ग निघेल अशी आशा जागतिक समुदायाला वाटत नाही, कारण ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी अ‍ॅमेझॉन संवर्धनापेक्षा विकासाला प्राधान्य दिलेले आहे. यंदा जानेवारीत सत्तेवर आल्यापासून बोल्सोनारो यांनी हवामान बदलांविषयीच्या सर्व चर्चाची यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे. अ‍ॅमेझॉनचे अवाढव्य जंगल आणि जागतिक हवामान बदल यांच्या परस्परसंबंधांविषयी त्यांना देणेघेणे नाही. कारण हवामान बदलाप्रमाणेच अ‍ॅमेझॉन संवर्धनावरही त्यांचा विश्वास नाही! शेती, खाणकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अ‍ॅमेझॉन वर्षांवनाचे लचके तोडायची त्यांची तयारी आहे. नव्हे, ते त्यांचे निवडणुकीतील एक आश्वासनच होते. त्यांच्या या भूमिकेमुळे ब्राझीलमधील एक मोठा वर्ग आनंदलेला असला, तरी यातून उद्भवणाऱ्या भीषण परिणामांची एक तर या वर्गाला कल्पना नाही किंवा देणेघेणे नाही. शेतीसाठी जमिनी मिळवण्यासाठी अवैध आगी लावणे हे तेथे नवीन नाही. बोल्सोनारो यांनी अशा शेतकऱ्यांचा छडा लावण्याऐवजी, ‘इबामा’ या ब्राझीलच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या २७ पैकी २१ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा अद्भुत निर्णय घेतला. यातून ते नेमके कशाला प्राधान्य देतात, हेही पुरेसे स्पष्ट होते. अ‍ॅमेझॉनच्या मुद्दय़ावर फ्रान्ससह अनेक पाश्चिमात्य देशांनी चिंता व्यक्त केली असून  फ्रान्सचे अध्यक्ष इमानुएल माक्राँ यांनी सध्या त्यांच्या देशात सुरू असलेल्या जी-७ परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रस्ताव मांडला. ही कृती म्हणजे बोल्सोनारो यांना ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ वाटते. अ‍ॅमेझॉनमधील विस्तीर्ण परिसरात पसरत चाललेल्या आगी विझवण्यासाठी त्यांनी आता लष्कर धाडले आहे. पण हे पुरेसे नाही. अ‍ॅमेझॉनचे वर्षांवन हजारो प्राणी, कीटक, वनस्पती प्रजातींचे आणि काही डझन लुप्त होत जाणाऱ्या आदिवासी जमातींचे आश्रयस्थान आहेच. शिवाय पृथ्वीवर मोसमी पावसाचे चक्र सुरू ठेवण्यातही या वनाचे योगदान अमूल्य असते. यासाठीच जर्मनी व नॉर्वेसारखे देश, संयुक्त राष्ट्रांतील काही संघटना अ‍ॅमेझॉनच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे झटत आहेत. त्या प्रयत्नांना बोल्सोनारो यांच्या पर्यावरणमारक धोरणांमुळे झळ बसू लागली आहे.