दिवंगत ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांचे जे प्रदर्शन येत्या आठ मार्चपर्यंत मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनात (एनजीएमए) खुले राहणार आहे त्यामध्ये, दालनाच्या दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी भिंतीच्या मागे पांढऱ्या फळ्यावर काही काळे आकार दिसतात. हे तुकडे लोहचुंबकामुळे फळ्याला धरून आहेत. हे काय, याचा उलगडा याच मजल्यावरील अन्य चित्रे पाहिल्यावर होतो : बरवे यांच्याच ‘निसर्गाची मुळाक्षरे’ या गाजलेल्या चित्रातील हे आकार, निरंगी होऊन येथे आहेत.. या फळ्यावर त्या आकारांची रचना प्रेक्षकांनी स्वत: करावी, अशी – चित्रप्रदर्शन पाहण्याच्या ठरीव शिस्तीला मुरड घालून प्रेक्षकांना विचारप्रवण करणारी- कल्पना यामागे आहे. ‘बघे’ होऊ नका, सहभागी व्हा, हे सांगण्याचा एक प्रयत्न याच प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अभिनेते अमोल पालेकर यांनीही केला होता, त्यात मात्र तेथल्या तेथे, अशोभनीय प्रकारे बाधा आणण्यात आली. सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताना ‘ठोकशाही’चा निषेध करणारी आणि साहित्य संमेलनात ‘लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या आयुरारोग्यासाठी उभे राहून प्रार्थना करू या’ म्हणून काँग्रेसी नेत्यांसह साऱ्यांना ऐन आणीबाणीच्या काळात खुर्च्यावरून उठविणारी व्यासपीठे ज्या महाराष्ट्राने पाहिली, त्याच महाराष्ट्रात ‘प्रदर्शन बरवे यांचे आहे, बरवेंबद्दलच बोला’ असे सांगण्याचा प्रसंग गेल्या शुक्रवारी घडला. पालेकर हे या केंद्र सरकारी दालनाची धोरणे गेल्या काही महिन्यांपासून कशी संशयास्पदरीत्या बदलली आहेत, याची आठवण उपस्थितांना देत असताना त्यांना थांबवण्यात आले. हे असे थांबवले जाणे आणि नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे यात काय फरक आहे, असा प्रश्न पालेकरांनी तिथेच केला. पालेकरांच्या वक्तव्याचा काहीएक खुलासा होईल, अशी संधी होती, तीही या दालनाच्या शासननियुक्त संचालिकेने गमावली.  मुंबई वा बेंगळूरु येथील ‘एनजीएमए’ कलादालनांमध्ये प्रदर्शने कोणती असावीत, याचा निर्णय ‘स्थानिक कलावंतांच्या सल्लागार समिती’नेच घ्यावा, अशी प्रथा असताना ही समिती गेले चार महिने का नेमलेली नाही, या पालेकरांच्या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देणाऱ्या सरकारी अरेरावीचे जे दर्शन त्या सोहळ्यात झाले, ते शोचनीय होते. ‘निषेध नोंदवण्याचाही अधिकार नाही का?’ हा प्रश्न पुण्यात पत्रकार परिषद बोलावून पालेकरांनी विचारला, तो या प्रकाराबद्दल. आपण जे बोललो, त्याविषयी माहितीच्या अधिकारातून माहिती घेतली आहे, असे पालेकरांचे म्हणणे. मात्र एका महत्त्वाच्या कलासंस्थेवर जे साधार आक्षेप पालेकरांनी नोंदविले, त्याविषयी आपण काही करणार आहोत काय, याच्या चर्चेऐवजी भलतीच चर्चा सुरू झाली आहे.   ‘पालेकरांमुळे प्रभाकर बरवे यांच्या प्रदर्शनाकडे आता प्रसारमाध्यमे पाहातच नाहीत’, ‘पालेकर कट रचून प्रमुख  पाहुणे झाले’, ‘पालेकरांना कुठे काय बोलावे हे कळत नाही’, ‘जिथेतिथे सरकारविरोधी वक्तव्य करायचे एवढेच यांना जमते’ अशा शब्दांत समाजमाध्यमांवर जी राळ उठवली जाते आहे, ती अखेर सरकारी अरेरावीला प्रोत्साहन देणारीच ठरेल. बरवे नाटक पाहतानाही चित्रांशीच कसे नाते जोडत, याची एक आठवण पालेकर यांनी उद्घाटन सोहळ्यात सांगितली होती. पालेकर यांनी कलाजगताच्या वतीने नोंदविलेले आक्षेप, त्यांच्या बोलण्यावर निर्बंध असल्याची जाहीरपणे करून देण्यात आलेली जाणीव,  पालेकरांचे आक्षेप पुरेसे न ऐकताच  व दिल्लीहून नंतर झालेला लेखी- परंतु दिनांकाविना खुलासा, हे सारे जणू बरवे यांची ‘निसर्गाची मुळाक्षरे’ पाहताना आकारच जोखावेत, बरवे ज्याला ‘अचित्र’ म्हणत तो अवकाश पाहूच नये, इतके असंवेदनशील आहे. ही विखुरलेली, असंवेदनशीलतेची मुळाक्षरे जोडून एक निकोप संस्था उभारण्याचे काम कलावंत करतील का?