अमेरिकेत न्यूयॉर्क राज्याचे डेमोक्रॅट गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांच्यावरील लैंगिक छळ प्रकरणी झालेले आरोप सकृतदर्शनी तथ्याधारित ठरवून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू होणे, ही अध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे. बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात महिलांचे प्रस्थ मोठे. परराष्ट्रमंत्रिपदापासून ते अगदी उपाध्यक्षपदापर्यंत अत्यंत महत्त्वाची पदे त्या पक्षातील महिलांनी भूषवली आहेत आणि भूषवत आहेत. अगदी अलीकडे अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष (हिलरी क्लिंटन) याच पक्षातून निवडली जाणे जवळपास निश्चित  मानले जात होते आणि नजीकच्या भविष्यात तो मान कमला हॅरिस यांच्या रूपात याच पक्षाला मिळण्याची चिन्हे आहेत. प्रगतीशील आणि पुरोगामी विचारसरणीमुळे या पक्षाकडे महिलांचा ओढा अधिक दिसून येतो. या प्रतिमेला कुओमो प्रकरणाने तडा गेला आहे. कुओमो यांच्या गव्हर्नरपदाच्या कारकीर्दीत त्यांनी ११ महिलांचे शोषण केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे न्यूयॉर्कच्या अ‍ॅटर्नी जनरल लेटिशिया जेम्स बुधवारी जाहीर केलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे. कुओमो यांच्या बेछूट वागणुकीमुळे गव्हर्नर कार्यालयातील वातावरण महिला कर्मचाऱ्यांसाठी असुरक्षित आणि ताणग्रस्त बनले असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर गव्हर्नर कुओमो यांच्या विरोधात न्यूयॉर्क विधिमंडळात महाभियोग चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. खुद्द बायडेन यांनी कुओमो यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. एका जनमत चाचणीनुसार, न्यूयॉर्क राज्यातील ५९ टक्के मतदार आणि प्रांतिक विधिमंडळातील ५२ टक्के डेमोक्रॅट प्रतिनिधींनी कुओमो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तेथील दोन्ही डेमोक्रॅट सेनेट सदस्यांची यापेक्षा वेगळी भूमिका नाही. न्यूयॉर्क विधिमंडळाच्या कायदेविषयक समितीतर्फे या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू आहे. परंतु कुओमो यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत अद्याप समीप आलेला दिसत नाही. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तीन वेळा ते न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदी निवडून आले आणि चौथ्यांदा निवडून येण्याची उमेद बाळगून होते. गेल्या वर्षी करोनाचा हाहाकार सुरू झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अनेक रिपब्लिकन गव्हर्नर आपापल्या कार्यक्षेत्रात घोडचुका करत असताना आणि त्याची मोठी किंमत अमेरिकावासियांना मोजावी लागत असताना, न्यूयॉर्क राज्यात कुओमो यांनी मात्र समर्थपणे परिस्थिती हाताळली. त्या राज्यात जीवितहानी वा बाधितांचे प्रमाण कमी होते, असे नाही. पण  जवळपास दररोज प्रसारमाध्यमांतून जनतेसमोर येत कुओमो न्यूयॉर्कवासियांना धीर देत होते. करोनाचा सामना करताना त्यांनी अधिक कल्पकता आणि कितीतरी अधिक संवेदनशीलता दाखवली. डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांचे वजन वाढले होते आणि अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणूनही काही गोटांतून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला तूर्त पूर्णविराम मिळेल. ट्रम्प यांचा वैयक्तिक उच्छृंखल स्वभाव आणि महिलांप्रति असंवेदनशीलता यांविषयी नेहमीच चर्चा होत राहिली. लैंगिक छळाचे आरोप असूनही न्यायमूर्ती ब्रेट कॅव्हाना यांची त्यांनी केलेली पाठराखण ही या सर्वांवर कडी ठरली होती. अशा ट्रम्प यांना आणि त्यांच्या रिपब्लिकन समर्थकांना कुओमो प्रकरणाच्या निमित्ताने डेमोक्रॅटिक पक्ष आणि बायडेन यांची कोंडी करण्याची संधी चालून आली आहे. बायडेन यांच्या दृष्टीने त्याहीपेक्षा मोठी समस्या ही कुओमो यांचा मुजोर अडेलतट्टूपणा ही आहे. करोना आपत्कालीन साह्य, पायाभूत सुविधा निधी आदी मुद्द्यांवर त्यांना रिपब्लिकन सदस्यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. उद्या ही मंडळी कुओमो यांच्याकडे बोट दाखवू लागल्यास बायडेन प्रशासनाची कोंडी होणार आहे. कुओमो प्रकरण हाताळणी ही बायडेन यांच्यासाठी पहिली मोठी सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.