जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल या तशा उजव्या, परंतु मवाळ वळणाच्या. सहिष्णू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या. जगभरात, त्यातही प्रामुख्याने युरोपात स्थलांतरितांविषयी तिटकाऱ्याची भावना जोर धरू लागली असतानाच्या काळात गतवर्षी त्यांनी सीरिया आणि अफगाणिस्तानातून जर्मनीत येत असलेल्या स्थलांतरितांचे खुल्या दिलाने स्वागत केले. युरोपातील कोणत्याही देशाहून अधिक स्थलांतरित आज जर्मनीत आहेत. त्यावरून त्यांच्यावर जर्मनीत जेवढी स्तुतिसुमने उधळली गेली, त्याहून अधिक टीकाप्रहार झाले. पण त्या झुकल्या नाहीत. अशा नेत्याने अचानक देशात बुरखाबंदीच्या प्रस्तावाची घोषणा करावी हा अनेकांसाठी मोठाच धक्का ठरला. गेल्या दोनेक वर्षांपासून बुरखाबंदी हा युरोपातील मोठा वादविषय बनला आहे. मुस्लीम स्त्रियांनी आपला देह नखशिखांत झाकून घ्यावा असे धर्ममरतडांचे मत. ते बहुसंख्य मुस्लिमांना शिरसावंद्य आहे. या पडदा पद्धतीचेही देशकालानुसार विविध प्रकार दिसतात. कुठे संपूर्ण देह झाकून घेणारा बुरखा घातला जातो. कुठे फक्त डोळे उघडे ठेवणारा नकाब असतो. कुठे मस्तक, मान आणि खांदे झाकणारा खिमार, तर कुठे केवळ डोईचे केस आणि मान झाकून घेणारा हिजाब. सर्वसाधारणत: बुरखा म्हणून ते ओळखले जातात. फ्रान्समध्ये मध्यंतरी बुर्किनी हा मुस्लीम महिलांसाठीचा पोहण्याचा नवा पोशाख आला होता. यात महिलांची इज्जत आणि सुरक्षा असल्याचे मुस्लीम धर्मगुरू कितीही सांगत असले, तरी हे पुरुषी वर्चस्ववादाचे आणि महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीकच. तेव्हा ही बुरखा बहार हटली पाहिजे असे कोणी म्हणत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. धर्ममरतडांना मात्र तो आपल्या धर्मातील हस्तक्षेप वाटतो. त्यामुळे फ्रान्स, नेदरलँड्स, बेल्जियम आदी युरोपीय देशांनी पूर्ण वा अंशत: बुरखाबंदी लागू करणे हा मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांच्या दृष्टीने इस्लामी जीवनपद्धतीवरील हल्ला ठरत आहे. यातून युरोपात जो संस्कृतीसंघर्ष निर्माण झाला, त्याला इस्लामी स्थलांतरित आणि त्यांच्यामुळे त्या-त्या देशातील कायदा-सुव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत येणारा ताण याची जोड लाभून एकंदर मुस्लिमांविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली. बुरखा आणि इस्लाम यांचा काहीही संबंध नसल्याचे जाहीर करून इजिप्तसारख्या मुस्लीमबहुल देशाने बुरखाबंदीला पाठिंबा दिला आहे. पण हे लक्षात न घेता बुरखाबंदी हा जणू मुस्लीम महिलांच्या मानवाधिकारावरील आक्रमणच, अशा पद्धतीने बुरख्याची भलामण करणारी छद्म धर्मनिरपेक्षतावादी मंडळीही या द्वेषभावनेला खतपाणी घालताना दिसतात. मर्केल यांच्या घोषणेने धक्का बसला तो या सर्वाना. मर्केल यांनी २०१७ मधील निवडणुका लक्षात घेऊन आपली घसरत चाललेली लोकप्रियता सावरण्यासाठी ही घोषणा केली आहे. तेथे ‘जर्मनीसाठी पर्याय’ या थेट नावाने उभ्या राहिलेल्या स्थलांतरितविरोधी पक्षाला मोठे जनसमर्थन लाभत आहे. तेव्हा मर्केल यांनी राजकीय खेळी म्हणून हा पत्ता फेकला, असे म्हटले जाते. मर्केल यांच्या हेतूंबद्दल शंका घेतल्या जाऊ शकतात, परंतु म्हणून त्यांच्या प्रस्तावास अयोग्य ठरवता येणार नाही. याचे कारण सार्वजनिक जीवनात धार्मिक हक्कांचे अवडंबर माजवत देशाच्या सेक्युलर विचाररचनेस आव्हान देणारी कोणतीही बाब सहन केली जाणार नाही, असेच हा प्रस्ताव सांगतो आहे. या गोष्टीला धर्ममरतडांकडून विरोध होणार हे नक्की. पण प्रागतिक विचारसरणीचे लोकही त्याकडे संशयाने पाहताना दिसतात. हे अधिक गंभीर आहे. कारण अंतिमत: या संशयाला लांगूलचालनाचा दरुगध येताना दिसतो आणि साऱ्याच अतिरेकी शक्तींना प्रागतिक विचारांवर हल्ला करण्यासाठी असे कारण हवेच असते.