एकीकडे सीबीएसईच्या धर्तीवर आपले अभ्यासक्रम बदलण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे केवळ राष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाच्या सक्तीमुळे काही विषय अनिच्छेने शिकवण्याचे नाटक करायचे, हे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे गुपित आता उघडे पडले आहे. गणित, भूगोल, इतिहास आणि विज्ञान या विषयांएवढेच शारीरिक शिक्षण आणि कला हेही महत्त्वाचे विषय असतात, हे या खात्यास मान्य नाही. शरीराला व्यायामाची सवय लागणे हे जसे आवश्यक, तसेच रंग, रेषा, स्वर हे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी अतिशय आवश्यक घटक असतात, याचे भान नसल्याने आता शिक्षण खात्याने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे ठरवले आहे. त्यामुळेच या विषयाच्या मार्गदर्शन पुस्तिकांची निर्मिती न करण्याचा धाडसी निर्णय हे खाते अगदी सहजगत्या घेऊ शकते. चित्रकला, हस्तकला, संगीत याकडे लक्ष दिल्याने भावी आयुष्यात थोडेच ‘यशस्वी’ होता येते, अशी पालकांचीच समजूत असते. दोन वर्षांपूर्वी शिक्षण खात्याने या विषयांच्या शिक्षकांच्या नेमणुकांना नकारघंटा दाखवली होती, म्हणून शिक्षकांनी काम बंद आंदोलनही केले. परिणामी या शिक्षकांना शासनाने चक्क घरचा रस्ता दाखवला आणि हे विषय अतिथी शिक्षकांमार्फतच शिकवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शिक्षणतज्ज्ञांनी याविषयी कडाडून टीका करणे अपेक्षित होते, परंतु तसेही घडले नाही. शिक्षण खात्याने या विषयाचे अध्यापन करण्यासाठी दोन हजार शाळांना दर तासाला पन्नास रुपये देऊन अतिथी शिक्षक नेमणूक करण्यास मंजुरीही दिली आहे. असे शिक्षक कुठे मिळतात, याचे संशोधन आता सर्वच शाळांना करावे लागते आहे. ग्रामीण भागात तर याहूनही भयावह परिस्थिती आहे, कारण तेथे असे शिक्षक फुकट हवे आहेत. हे सगळे इतक्या उघडपणे आणि निर्लज्जपणे सुरू आहे, याचे कारण आपल्या पाल्यांना शारीरिक शिक्षण, संगीत, नृत्य, चित्रकला आणि हस्तकला या विषयांत प्रावीण्य मिळावे, असे कोणत्याही पालक संघटनेस वाटत नाही. शिक्षण खात्याने पूर्णवेळ शिक्षक नेमले नाहीत ते नाहीत, वर बाहेरून शिकवायला येणाऱ्या शिक्षकांना काय शिकवायचे, हेही सांगण्यास नकार दिला. या विषयांच्या मार्गदर्शन पुस्तिका शिक्षकांना उपयुक्त ठरणाऱ्या असू शकतात, हेच शिक्षण खात्यास कळू शकत नाही. उलट हे शिक्षक केवळ पुस्तके वाचून दाखवतात, असे सांगून त्यांना कोणतीही मदत करण्यास नकार देण्याचा उद्धटपणाही शिक्षण खाते दाखवू शकते. हे विषय शिक्षणक्रमातून बाद करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. काही काळाने शिक्षकच मिळत नाहीत, म्हणून हे विषयही रद्द करून टाकण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेऊ शकेल. महाराष्ट्रासारख्या राज्यातील मुलांना केवळ पुस्तकात डोके घालून बसायला लावण्याची ही रीत अशैक्षणिक आहे, हे शिक्षण खात्याला ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षक, चित्रकला, हस्तकला आणि संगीत या विषयांसाठी शिक्षक असणे सक्तीचे करण्याऐवजी या शिक्षकांना घरचा रस्ता दाखवणे, हे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासास मारक ठरणारे आहे. शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या कुणालाही याचे भान नसणे हे तर अधिकच चिंताजनक आहे. शिक्षण खात्याला ही चूक केवढी मोठी आहे, याचे भान जोवर येत नाही, तोवर विद्यार्थ्यांना नेहमीच्या विषयांवरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. समूहगान हे विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकतेची जी जाणीव निर्माण करू शकते किंवा हस्तकला आणि चित्रकलेने मुलामुलींना रंग, रेषा आणि आकार यांची जी कलात्मक जाणीव येते, ती अतिशय महत्त्वाची असते; पण ढिम्मपणे कारभार करणाऱ्या शिक्षण खात्यास हा प्रश्न भविष्यातील पिढी घडण्याशी संबंधित आहे, हेच कळत नसेल, तर कोण काय करणार?