कुत्रा हा या जगात सर्वात कमनशिबी प्राणी आहे. ‘कुत्र्यासारखे वागविणे’, ‘कुत्र्याचे जिणे जगणे’, असे वाक्प्रचार त्यामुळेच रूढ झाले आहेत. ‘कमीने, मै तुझे कुत्ते की मौत दिलाऊंगा’.. असा जोशपूर्ण संवाद एखाद्या चित्रपटात असेल, तर तो ऐकणाऱ्याच्या अंगात लगेच ‘वीरू’ संचारतो, ही ‘कुत्र्याच्या मौतीची महती’. त्यामुळे, हा प्राणी त्रासदायक होतो असे वाटू लागले, की त्यांना नष्ट करण्याचे सर्वाधिक क्रौर्याचे मार्ग शोधून काढून त्यांचा अवलंब करणे हे माणसाला पराक्रमाचे लक्षण वाटत असावे. कुत्र्याला पोत्यात बंद करून आपटून मारत असतानाची एक दृश्यफीत समाजमाध्यमांवर मध्यंतरी पसरली, तेव्हा पोत्यात बंद केलेल्या त्या प्राण्याच्या केविलवाण्या किंकाळ्यांनी अनेकांना पाझरही फुटला होता. पण असा पाझर फुटणारी माणसे म्हणजे ‘कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाच्या लशीच्या उत्पादकांचे दलाल’ असल्याचा शोधही काहीजणांना लागतो आणि बेवारस, भटकी कुत्री हे समाजातील परस्पर संबंधांना कडवटपणा आणण्याचे निमित्त होऊन बसते. पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील एका कुटुंबातील महिलांना भटक्या कुत्र्याच्या गोंडस पिल्लांना घरात आश्रय दिल्याबद्दल शेजाऱ्याकडून चपलांची मारहाण सहन करावी लागली होती, ही अगदी अलीकडची घटना.. सहज, गंमत म्हणून कुत्र्याला गरगर फिरवून उंच गच्चीवरून खाली फेकणाऱ्या माणसांच्या अघोरी शौर्यकथाही याआधी फेसबुकसारख्या माध्यमांमुळे जगासमोर आल्या होत्या. सामाजिक स्वास्थ्याच्या चर्चेत, ‘भटक्या कुत्र्यांचा उपद्रव’ हा जिव्हाळ्याचा मुद्दा येतोच, आणि त्यामध्ये कुत्री ‘नष्ट करण्याची’ बाजू हिरिरीने मांडली जाते, ही माणूस आणि कुत्रा यांमधील हळव्या नात्याची दुसरी आणि दुखरी बाजू असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. या मानसिकतेला स्थळकाळाचे बंधन नसते. कुत्र्यांना त्यांच्या मौतीने मारणे हाच जणू त्या प्राण्याच्या जगण्याचा अधिकार नष्ट करण्याचा एकमेव उपाय आहे, असे मानणारा एक वर्ग समाजात आहेच. भटक्या कुत्र्यांना विजेचे झटके देऊन ठार मारण्याची अघोरी उपाययोजना काही वर्षांपूर्वी मुंबईत महापालिकेच्या जागेतच अमलात आणली जात होती, तेव्हा भटक्या कुत्र्यांच्या जगण्याच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला होता, आणि त्यांना ठार मारण्याऐवजी त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येला आळा घालण्याचा उपाय स्वीकारलाही गेला होता. तरीही कुत्र्यांना जाळून मारण्याचे प्रकार घडतच राहिले. केरळमधील कोट्टायम येथे एका राजकीय पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी दहा भटक्या कुत्र्यांना ठार मारून व त्यांचे देह काठीला टांगून त्याची मिरवणूक काढत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दलचा राग व्यक्त केला. भटकी कुत्री आटोक्यात आणली नाहीत, तर यापुढेही याच मार्गाने त्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशाराही या राजकीय कार्यकर्त्यांनी दिला, आणि त्याचे पडसाद देशभर उमटले. एका वृद्धेच्या मृत्यूस भटकी कुत्री कारणीभूत झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण जमातीवर सूड उगविण्याच्या या मार्गाचे समर्थन करण्यामागेदेखील राजकारणाचे रंग आहेतच. प्राणिमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या निषेधाची झालरदेखील या अघोरीपणाला आहे, असे बोलले जाते. असे असेल, तर राजकीय मतभेदातून कोणत्या वेळी कोणते क्रौर्य जन्म घेईल आणि त्याचे परिणाम कोणाला कसे भोगावे लागतील याचाच हा नमुना म्हणावा लागेल.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!