News Flash

एका विधिज्ञाची ‘जाझ’यात्रा..

मानवी हक्कविषयक वकील ही त्यांची ओळख संयुक्त राष्ट्रांमध्ये कधीकाळी त्या पदावर काम केले,

निधन वयाच्या ९१व्या वर्षी झाले असले तरी अकालीच वाटावे, असे लोभस उमदेपण सोली सोराबजी यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. महाधिवक्ता तसेच महान्यायवादी या दोन्ही पदांवर काम करूनही, सत्ताधाऱ्यांचे मिंधेपण त्यांनी कधी स्वीकारले नाही. या दोन्ही पदांची उंची -तीही त्या वेळची, आजच्याइतकी खुजी नव्हे- कमी न करता वाढवून, ही पदे त्यांनी खऱ्या अर्थाने ‘भूषवली’च; पण त्यांचे कर्तृत्व या पदांपेक्षा मोठे होते आणि न्यायाची मूल्ये कुणाही व्यक्तीच्या कर्तृत्वापेक्षा नेहमीच मोठी असतात, याची विनम्र जाणीव त्यांना होती. कायदेपंडित बरेच असतात; पण न्यायतत्त्वांची महत्ता ओळखणारी लीनता असेल, तरच विधिज्ञ म्हणून छाप उमटवता येते. ती उमटवणारे फार थोडे जण गेल्या काही वर्षांत आसपास उरले असताना सोली सोराबजींचे कोविडने जाणे अधिकच चटका लावणारे. मानवी हक्कविषयक वकील ही त्यांची ओळख संयुक्त राष्ट्रांमध्ये कधीकाळी त्या पदावर काम केले, त्याच पदावरून तत्कालीन लष्करशाहीग्रस्त नायजेरियात त्यांची नेमणूक झाली म्हणून नव्हे. मानवी हक्कांचा भारतीय राज्यघटनेतला आणि संयुक्त राष्ट्रे मानवी हक्कांच्या सनदेतला धागा त्यांनी अनेक युक्तिवादांतून जपला. मग हे युक्तिवाद न्यायालयांतील असोत की ‘दि इंडियन एक्स्प्रेस’मध्ये त्यांनी दीर्घकाळ आणि विविध विषयांवर केलेल्या स्तंभलेखनातील. सहसा आज मानवी हक्कांविषयी जागरूक दिसणारे लोक केवळ वकिलीचे वा विधिप्रांतातले काम करण्यावर न थांबता राजकीय भूमिका घेताना दिसतात. तसे करणे सोराबजी यांनी नेहमीच टाळले. मात्र म्हणून त्यांना राजकारणाबद्दल काहीच म्हणायचे नव्हते असे अजिबात नाही. राजकीय भूमिका अप्रत्यक्षपणे त्यांनी घेतलीच आणि ती वरवर पाहता तत्कालीन काँग्रेसविरोधी किंवा त्या वेळी प्रचारात असलेल्या शब्दाप्रमाणे ‘बिगरकाँग्रेसवाद’ जोपासणारी भासली, तरी प्रत्यक्षात सोराबजी एकाधिकारशाहीच्या, केंद्रीकरणाच्या प्रवृत्तींविरोधात होते आणि राज्यघटनेमागील न्यायतत्त्वांना धक्का लावण्याच्या विरुद्ध होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपूर्व काळातील राजकीय केंद्रीकरणाच्या वर्तनामुळे राज्यपाल कधीही बदलले जात, राज्यपालांकडून लोकनियुक्त सरकारे खाली खेचली जात, विधिनिषेध न पाळता राज्यपालांकरवी नेतेबदल होई, याविरोधात सोराबजी यांचे ‘द गव्हर्नर : सेज ऑर सॅबोटिअर’ हे पुस्तक, केवळ तत्कालीन राज्यपालांच्या लीला सांगणारे नसून राज्यपालपदामध्ये अनुस्यूत असलेल्या साधुत्वाची जाणीव करून देणारे ठरते. हे साधुत्व जपण्यासाठी किमान सभ्यतेची अपेक्षा असते. तीच राजकारणातून हरवत जाण्याच्या पुढल्या काळात, सोराबजी यांच्या काही भूमिका कदाचित भाबडय़ा किंवा ठार चुकीच्याही ठरवता येतील.. पण तसे करणे म्हणजे दोषाचे मूळ न पाहण्याची लबाडी करून स्वत:लाच फसवणे.

सभ्यतेचा संस्कार तरुण सोराबजींवर सर जमशेदजी कांगा यांच्याकडून झाला होता आणि प्रौढपणी नानी पालखीवालांसारख्या ज्येष्ठांमुळे तो दृढ झाला. पालखीवालांनी राज्यघटनेचा सरनामा किंवा प्रास्ताविकच बदलणाऱ्या ४२व्या घटनादुरुस्तीला जितक्या मनापासून, जितक्या तिडिकीने आणि जितका साधार विरोध केला होता, त्याची आठवण यावी असे काम २०१५ नंतर सोराबजींनी ‘सेडिशन’ किंवा राजद्रोह- ज्याला चित्रवाणी वृत्तवाहिन्या सरसकट देशद्रोह म्हणतात- त्याविषयी केलेले आहे. राजद्रोहाचा गुन्हा भारतीय दंडविधानाच्या कलम १२४(अ) नुसार दाखल करता येतो, याचा दुरुपयोग सध्या सुरू आहे असे म्हणणे गेल्या पाच वर्षांत सोराबजी यांनी वारंवार मांडले. आजच्या यंत्रणा या कलमाचा दुरुपयोग करताहेत ही स्पष्टोक्ती तर सोराबजींनी केलीच, पण निव्वळ देशविरोधी घोषणा देणे म्हणजे राजद्रोह नव्हेच, तर देशविरोधी ठरणारी प्रत्यक्ष कृती केल्यास राजद्रोहाचे कलम वापरले जावे असाच घटना समितीतील चर्चाचा निर्वाळा असून त्या प्रकाशातच, त्या मर्यादेतच यंत्रणांनी हे कलम वापरावे, असे त्यांनी ठणकावले होते.

सोराबजी हे मुंबईकर होते, इथल्या रिदम हाऊसमधून जाझ संगीताच्या रेकॉर्ड विकत घेणे हा त्यांचा तरुणपणीचा छंद होता. अनेक देशीविदेशी जाझ वादकांना मुंबईत आणण्याचे श्रेय सोराबजींचेच होते व पुढे समविचारी जाझप्रेमी मित्रांच्या साथीने उत्तमोत्तम जाझ पथकांना संधी देणारी संस्थात्मक बांधणी -जाझ इंडिया संस्था तसेच जाझयात्रा वा जाझ उत्सव हे उपक्रम- करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, या तपशिलांतून कुणाला केवळ त्यांचा उच्चभ्रूपणाच दिसेल. पण जनसामान्यांना ज्या प्रकारचे सिनेसंगीत, उदाहरणार्थ शम्मी कपूर वा पुढे आर. डी. बर्मनमुळे आठवते, त्यातून अजरामर झालेले जाझचे मर्म सोराबजींच्या जगण्यात दिसे. उच्चभ्रूपणाच्या ड्रमसेटचा ताल न सोडताही, त्या तालाची पर्वा न करता सार्वजनिक क्षेत्रातील विधिनिषेधाचा आग्रह धरणारी गिटार सतत वाजत राहिली म्हणून राजकीय नेतृत्वावर बिगरराजकीय टीका ते करू शकले. धीरगंभीर दर्दभऱ्या ट्रम्पेटसारखा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सूर १९८४च्या शीख शिरकाणबळींचे विनाशुल्क वकीलपत्र त्यांनी घेतले तेव्हा साऱ्यांनीच ऐकला आणि जाझ संगीतात ट्रोम्बोन हे लांब दांडीचे कण्र्यासारखे वाद्य ज्या टिपेला जाते तसा सूरही राजद्रोह कलमाच्या गैरवापराबद्दल त्यांनी लावला.. सोली सोराबजींचे जगणे ‘जाझ’ ठरले. संपल्याची चुटपुट लावणाऱ्या त्या ‘जाझ’यात्रेला लोकसत्ताची आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:40 am

Web Title: article about former attorney general soli sorabjee zws 70
Next Stories
1 लस डार्विनवाद!
2 इस्राायलचे प्रगतिपुस्तक
3 आयपीएल बंद झाली तरी…
Just Now!
X