21 October 2019

News Flash

गडकरींचे नेहरू-प्रेम!

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या पराभवाचे कवित्व अद्यापही संपलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या पराभवाचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमधील विजयाचे सारे श्रेय मोदी-शहा यांना देण्यात आले. पराभवाची जबाबदारी मात्र तीन राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माथी मारण्यात आली. मोदी-शहा यांच्या विरोधात बोलण्याची भाजपमध्ये कोणाची टाप नाही. बिहारमधील पराभवानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळाने यापूर्वी आवाज उठविला; पण तो आवाजही क्षीण ठरेल, अशी व्यवस्था केली गेली. तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजपमधील घुसमट बाहेर पडू लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे कोणाचीही भीडभाड न ठेवता बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध. गेल्या आठवडय़ाभरातील गडकरी यांच्या विविध विधानांवरून भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही, असाच अर्थ काढला जाऊ लागला. ‘अपयशाची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायला हवी’, ‘विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण असतात, पराजयाला कोणी वाली नसतो’ अशा स्वरूपाची परखड मते गडकरी यांनी मांडली. तेव्हाच गडकरी यांचा रोख कोणावर आहे हे स्पष्ट झाले. या विधानांवरून वादंग उठताच आपल्या विधानांचा विपर्यास केला गेला, अशी सारवासारव गडकरी यांनी केली असली, तरी संदेश जायचा तो गेलाच. या स्पष्टीकरणानंतर गडकरी सूचक मौन बाळगतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण गडकरी यांनी पुन्हा आपल्या भावनांना वाट करून दिलीच. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना गडकरी यांनी नव्या वादाला निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नव्या पिढीतील भाजपचे सारेच पहिल्या फळीतील नेते नेहरू-गांधी घराण्यावर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपच्या नोंदी निषिद्ध असलेल्या नेहरू यांच्या भाषणांचे गडकरी यांनी कौतुक केले. नेहरूंची भाषणे वाचायला किंवा ऐकायला आपल्याला आवडतात, ‘देशासाठी आपण जाचक ठरणार नाही, असा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे विचार नेहरूंनी मांडले होते व आपणही तसाच विचार करतो,’ असे गडकरी यांनी म्हटले आहे. मोदी किंवा भाजप ज्यांना कायमच दूषणे देतात, त्याच नेहरूंचे विचार गडकरी यांना उपयुक्त ठरू लागले यातून बराच अर्थ काढता येईल. गडकरी एवढय़ावरही थांबले नाहीत. आपण जर पक्षाध्यक्ष असतो व पक्षाचे खासदार-आमदारांची कामगिरी चांगली नसल्यास त्याची जबाबदारीही आपणच घेतली असती, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. पक्षाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषविलेल्या गडकरी यांचा सारा रोख हा शहा यांच्यावर आहे हे स्पष्टच आहे. भाजप नेतृत्वाला झोंबणारी वक्तव्ये केल्यावरही मोदी हेच दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून बांधील असल्याची ग्वाही मात्र गडकरी यांनी दिली! विख्यात अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या विधानावरून वादळ उठले असतानाच गडकरी यांनी सहिष्णुतेचा मुद्दा भाषणात मांडल्याने त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला २७२ चा जादूई आकडा गाठणे शक्य न झाल्यास पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गडकरी यांचे नाव घेतले जाते. अर्थात गडकरी यांनी आपण कोणत्याही स्पर्धेत नसल्याचे जाहीर केले असले तरी, सर्वमान्य ठरू शकणाऱ्या भाजप नेत्यांत गडकरी यांचे नाव येऊ शकते. भाजपमध्ये अन्य नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असताना गडकरी यांनी मोदी-शहा यांना टोचण्यास सुरुवात तर केली आहे.

First Published on December 26, 2018 2:13 am

Web Title: article about gadkari nehru love