मदर तेरेसा यांचे नाव आता लवकरच ख्रिश्चन संतांच्या मांदियाळीत समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या भगतगणांचा आनंद स्वर्गातही मावेनासा झाला असेल. अन्य धर्मातील आस्तिकांनाही यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. याचे कारण त्यामुळे दैवी चमत्कार, मग ते त्यांचे असो की आपले, या गोष्टीलाच पाठबळ मिळणार आहे. हे कसे ते समजून घेण्यासाठी तेरेसा यांचे संत होणे म्हणजे काय ते पाहणे आवश्यक आहे. आपल्याकडे आपण कोणासही सहज संतपद बहाल करतो. त्यासाठी मागील साधुसंतांनी फारच किरकोळ अटीशर्ती सांगून ठेवल्या आहेत. म्हणजे जो बोलतो तसाच चालतो तोच साधू आहे असे ओळखून देव त्याच्यात जाणावा वगरे. या अटीने आपल्याकडे गाडगेबाबांसारखा विरक्त, की ज्याचे पंचतारांकित आश्रम नसतात, शानदार सत्संग नसतात असा माणूसही संत होऊन जातो. आता ‘पोटासाठी संत, झाले कलीत बहुत’ असे तुकारामांनी म्हणूनच ठेवले आहे. त्यामुळे तशी जमातही हल्ली काहीही बोलताना आणि कसेही चालताना दिसते. कॅथॉलिक धर्मपंथामध्ये मात्र असा कोणासही संताचा दर्जा दिला जात नाही. तेथे चमत्कारालाच नमस्कार असतो. त्यालाही पोपची मान्यता असावी लागते. इ.स. १२३४ मध्ये तसा धार्मिक कायदाच करण्यात आला आहे. या धर्तीवर आपल्याकडेही काहींनी उद्योग चालविले असून, ते आध्यात्मिक टक्केवारी मोजून संतपदाची प्रमाणपत्रे देत आहेत. त्या कायद्यानुसार मात्र संतपदाच्या दर्जासाठी त्याचे त्याच्या मृत्यूनंतरचे दोन चमत्कार सिद्ध होणे आवश्यक असते. मदर यांचा एक चमत्कार सिद्ध झाला होता. प. बंगालमधील मोनिका बसरा या महिलेच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदरच्या प्रतिमास्पर्शाने बरी झाली होती. आता त्यांचा दुसरा मरणोपरांत चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकनने जाहीर केले आहे. तो २००८ मधील असून त्यानुसार त्यांनी ब्राझीलमधील एका व्यक्तीची मेंदूतील गाठ बरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे तसा मदरभक्तांचा आणि आता चर्चचा विश्वास आहे. असा धार्मिक विश्वास असला, की जिचा कर्करोग मदरकृपेने बरा झाला असे सांगण्यात येते तिच्यावर औषधोपचारही सुरू होता, याकडे रीतसर दुर्लक्ष करणे सोपे जाते. मदरना काळ्या पशाचे, भ्रष्ट नेत्यांचे आणि क्रूर हुकूमशहांचे वावडे नव्हते. मानवी जीवनातील दैन्य आणि वेदनांवर त्यांचे इतके प्रेम होते, की त्यांच्या आश्रमांतील रुग्णांवर नीट उपचारही केले जाऊ दिले नसत या गोष्टी आता ग्रंथबद्धही आहेत. पण त्याकडेही दुर्लक्ष करता येते. अंधश्रद्धेविरोधात लढणाऱ्या संघटनांनी मदरच्या या चमत्कारकथांविरोधात आंदोलन केले होते, पोलिसांत तक्रार केली होती, त्यांना धर्मद्रोही ठरवणे सोपे जाते. यात खेदाची बाब अशी की सारेच धर्म याबाबत एकाच पातळीवर असतात. त्यामुळेच मदर तेरेसा यांचे संतपद इतर धर्मगुरूंच्याही लाभाचे ठरणार आहे. कारण त्यामुळे चमत्कार या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास वाढणार आहे. सगळेच धर्म आज कट्टरतावादी शक्तींच्या हातात चालले आहेत. धर्मगुरू सत्ता प्रस्थापित करण्याचे उद्योग सर्वत्र सुरू आहेत. अशा वेळी अशा चमत्कारिक गोष्टींना हवा देणे हे त्या उद्योगांना बळ देणारेच ठरणार आहे. पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या तुलनेने आधुनिक मानल्या जाणाऱ्या पोपने तेरेसांसह तब्बल ८१३ व्यक्तींना संतपदानजीक आणावे हा मिथ्या भगल वाढविण्याचा प्रकार आहे. त्याने धर्माचे भले होईलही. समाजभल्याबद्दल मात्र शंका आहे.