वर्षभराचे नियमित वेळापत्रक पार पाडणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचे करोनाच्या संकटाने मोठेच नुकसान होणे स्वाभाविक आहे. याचे मुख्य कारण ही आपत्ती ऐन परीक्षेच्या काळातच उद्भवली. परीक्षांचा हंगाम हा शैक्षणिक वेळापत्रकातील शेवटचा टप्पा. परीक्षा, निकाल, प्रवेश, अध्ययन सत्र परीक्षा आणि अंतिम परीक्षा असे हे वेळापत्रक या वर्षी कोलमडले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होता होताच महाराष्ट्रातील अनेक भागांत इतका पाऊस पडत राहिला, की अनेक शाळा आणि महाविद्यालयांना किमान आठ ते पंधरा दिवसांची सुटी देणे भाग पडले. त्याचा परिणाम पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर झाला. आता दुसऱ्या सत्राच्या अखेरीस परीक्षा सुरू होता होताच करोनाचे संकट उभे ठाकले. नववी, अकरावीच्या परीक्षा रखडल्या आहेत. दहावीचीही एका विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा, राज्यातील प्रवेश परीक्षा सगळे ठप्प झाल्याचे चित्र आहे. झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकाच परीक्षकांच्या हाती पोहोचल्या नसल्यामुळे त्याचे मूल्यांकनही रखडले आहे. परीक्षांचे निकाल हे पुढील प्रवेशापूर्वी होणे आवश्यक असल्याने हा खोळंबा किती काळ लांबतो, हेच आता महत्त्वाचे आहे. अर्थात दरवर्षी प्रवेशाच्या काळात होणारी न्यायालयीन प्रकरणे, गुणवत्ता याद्यांवरून होणारे वादंग यामुळे विद्यापीठीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे काम रखडण्याचा अनुभव नवा नाही. काहीही आक्षेप, हरकतींविना प्रक्रिया पार पडली असे गृहीत धरले, तरीही परीक्षा आणि निकालानंतर प्रवेश प्रक्रियेच्या आवश्यक फेऱ्या पुरेसा वेळ देऊन घडवून आणणे यासाठी किमान काही महिन्यांचा कालावधी जाणारच. अगदी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करताना खंडीभर परीक्षांतील वेगवेगळ्या परीक्षा एका वेळी येणार नाहीत याची काळजी घेण्याची तारेवरची कसरत प्रशासनाला आता करावी लागेल. हे जरी खरे असले, तरीही सध्याच्या राष्ट्रीय आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करणे शक्य आहे. याबाबत केंद्रीय आणि राज्यांच्या पातळीवर एकसूत्रता निर्माण करण्याची संधी आपत्तीमुळे का होईना चालून आली आहे. देशातल्या अनेक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते आणि त्यामुळेच निकालांचेही. त्याचा परिणाम देशपातळीवरील प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकावर होतो, असा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. देशातील प्रत्येक मंडळ, विद्यापीठ यांच्या शैक्षणिक वेळापत्रकात मोठी तफावत आहे. राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना एप्रिलच्या मध्यातून सुट्टी लागते आणि त्या जूनमध्ये सुरू होतात. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांचे नवे वर्ष एप्रिल महिन्यातच सुरू होते. आधीचे वर्ष संपवून एप्रिलमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांचे वर्ग भरवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना मे महिन्यात सुट्टी दिली जाते आणि जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होतात. राज्यातील एका विद्यापीठाचे निकाल जाहीर होतात, तेव्हा दुसऱ्यांची परीक्षा सुरू असते, तर तिसऱ्या विद्यापीठाने प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली असते. एकाच राज्यात शैक्षणिक वर्षांची अशी अनेक समीकरणे तर राज्याराज्यांतील समीकरणांची गणतीच न केलेली बरी. सध्याच्या परिस्थितीत या सगळ्यात एकसंधता साधणे शक्य होऊ शकेल. स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य कायम ठेवूनही प्रवेश, परीक्षा, निकाल यांसाठी एक ठरावीक चौकट देशपातळीवर आखता येईल. मात्र, सवयीच्या झालेल्या सुट्टय़ांवर गदा येईल याची धास्ती घेऊन कुरबुर करणाऱ्या अध्यापकांनीही आपल्या विचारांची दिशा बदलायला हवी. सध्या केंद्र शासनाने सीबीएसई आणि केंद्रीय नियंत्रण संस्थांना शैक्षणिक वर्षांचे नवे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील विद्यापीठांसाठीही त्याचा विचार होणे आवश्यक आहे.