अफगाणिस्तानचे शांततादूत अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी अलीकडेच प्रमुख भारतीय नेत्यांची भेट घेऊन, अफगाण शांतता चर्चेत भारताच्या भूमिकेचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे भारतीय नेत्यांना काही अंशी दिलासा मिळाला असेल. हे अब्दुल्ला गेल्या आठवडय़ात पाकिस्तानलाही जाऊन आले. अफगाणिस्तान चर्चेचा अंतिम तोडगा हा अफगाणप्रेरित आणि अफगाणहितैषी असेल, असे अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत सांगितले. भारताची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे या मुद्दय़ावर अब्दुल्ला आणि भारतीय नेत्यांमध्ये मतैक्य आहे ही जमेची बाब. अफगाणिस्तानातील अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुबळे आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना तालिबानचा प्रभाव रोखता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळण्याची घाई अमेरिकी सैन्याचे सर्वोच्च कमांडर आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झाली होती. अफगाणिस्तानातून फौजा काढून घेऊन, त्या देशाला पुन्हा रक्तलांछित अनिश्चिततेच्या वाटेवर ढकलून दिल्याचे खापर आपल्या माथी फोडले जाऊ नये, म्हणून अफगाण शांतता चर्चेसाठी ट्रम्प यांनी लोकनियुक्त घनी सरकारसह तालिबानलाच वाटाघाटींसाठी आमंत्रित केले. याबद्दल त्यांना दोष देण्याची वेळ आता निघून गेली. कारण वाटाघाटींची ही प्रक्रिया आता खूप पुढे गेली आहे. त्यामुळे निव्वळ मतभेदांपोटी वाटाघाटींकडे पाठ फिरवण्यापेक्षा हे वास्तव स्वीकारण्याचा मार्ग गेले काही महिने भारताने स्वीकारला असून, प्राप्त परिस्थितीत तो योग्य मानावा लागेल. अध्यक्ष अश्रफ घनी हे तर भारतमित्र आहेतच. पण त्यांचे कट्टर विरोधक आणि शांतता प्रक्रियेतील प्रमुख घटक असलेले अब्दुल्ला यांनाही भारताला विश्वासात घ्यावेसे वाटते, याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. काही शंका तरीही उरतातच. तालिबानचे हक्कानी गट आणि आयसिसशी असलेले संबंध नजरेआड करता येत नाहीत. तालिबान, हक्कानी म्होरके, अल कैदा यांना सोव्हिएत फौजांविरोधात एके काळी अमेरिकी प्रशासन आणि सीआयएने पोसले. आज त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी, त्यांच्यातीलच काहींना अमेरिकेला वाटाघाटींसाठी बोलवावे लागते हा काव्यात्मक न्याय झाला. हक्कानी गटाचे आश्रयदाते पाकिस्तानात आहेत आणि काबूलसारख्या प्रमुख शहरांमध्ये घातपात, दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कृत्य हक्कानी अगदी अलीकडेपर्यंत करत होते. याची झळ अफगाणिस्तानील अल्पसंख्य शीख समुदायाला बसलेली दिसतेच. अब्दुल्ला हे मूळचे ताजिक आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला असलेल्या या समुदायाची भारताशी नेहमीच जवळीक राहिलेली आहे. अश्रफ घनी हे पख्तून आहेत आणि अफगाणिस्तानचे भवितव्य पख्तुनांनीच घडवावे या विचारांचे आहेत. खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानच्या अफगाण सीमेवरील राज्यातही बहुसंख्य पख्तून आहेत. पंजाबी वर्चस्ववादी मानसिकता असलेल्या पाकिस्तानी शासकाकडून आणि लष्कराकडून आपले मुस्कटदाबी होते, हा विचार या पख्तुनख्वा प्रांतात जोर धरतो आहे. त्यामुळे अश्रफ घनी यांचे सरकार अस्थिर करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. हक्कानींचा वापर पाकिस्तानकडून यासाठी प्रामुख्याने होतो. यामुळे अफगाणिस्तानवादी तालिबान नाराज होऊन पाकिस्तानी सैनिकांना अफगाण सीमेवर लक्ष करतात. अफगाण तालिबानचा म्होरक्या मुल्ला फझलुल्लानेच २०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा नृशंस संहार घडवून आणला होता. अशी हिंसक मानसिकता आणि पार्श्वभूमी असलेली मंडळी शांतता व स्थैर्यावर कशी काय चर्चा करणार, हा प्रश्न कोणालाही पडावा! भारताने कोणत्याही प्रकारे थेट सहभागी न होता, किंवा कोणत्याही गटाची बाजू न घेता अफगाण हिताला आणि स्थिर अफगाणिस्तानला प्राधान्य असेल तो तोडगा मान्य, अशी काहीशी स्थितप्रज्ञ भूमिका घेतली आहे. तूर्त तीच हितावह ठरते.