मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे रविवारी रात्री प्रसृत झाल्यानंतर मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स सोमवारी १४२१ अंशांनी उसळला. एखाद्-दोन अपवाद वगळता बहुतेक चाचण्यांनी एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. दोन चाचण्यांनी तर भाजपच स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडेल, असे भाकीत वर्तवले आहे. ही आकडेवारी किती खरी आहे हे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईलच. पण ती खरी असेलच असे मानून शेअर बाजाराने मात्र ‘स्थिर सरकारच्या शक्यतेला’ भरभरून प्रतिसाद दिला आहे. यातील विरोधाभास म्हणजे, सोमवारी जगभरातील आणि विशेषत: आशियातील प्रमुख शेअर बाजार कोसळले होते. चिनी दूरसंचार कंपनी हुआवैवर (huawei) अमेरिकेने निर्बंध घातल्यामुळे सोमवारी सकाळी भारत सोडून इतर आशियाई शेअर बाजार निर्देशांक त्यांच्या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत अमेरिकेने हे निर्बंध काही प्रमाणात सशर्त शिथिल केल्यामुळे मंगळवारी सकाळी या बाजारांची स्थिती काहीशी सुधारली. मुंबई भांडवली बाजारात अगदी गेल्या दोन आठवडय़ांतही घबराटीचे वातावरण होते. त्या दोन आठवडय़ांत सेन्सेक्समध्ये १९१३ अंशांची किंवा ४.९ टक्क्यांची घसरण झाली होती. चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्धाला त्या वेळी सुरुवात झाली होती हे त्या घसरणीचे एक कारण होते. याशिवाय पश्चिम आशियात अमेरिकेने इराणच्या विरोधात दंड थोपटायला सुरुवात केल्यामुळे आणि त्यात सौदी अरेबियानेही आक्रमक भाषा सुरू केल्यामुळे या संघर्षांचा थेट परिणाम तेल उत्पादन, वाहतुकीवर आणि त्यामुळे किमतींवर होणार हे उघड आहे. पण या दोन कारणांशिवाय विश्लेषकांच्या मते आणखी अधिक प्रभावी कारण दोन आठवडय़ांतील सेन्सेक्स पडझडीमागे होते. ते कारण म्हणजे शेअर दलालांनी हेरलेले संभाव्य राजकीय अस्थैर्य! उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती भाजपवर कुरघोडी करणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे बहुमताचा आकडा भाजपला नव्हे, तर एनडीएलाही ओलांडता येणार नाही, या धास्तीचे पडसाद शेअर बाजारात उमटू लागले होते. ही धास्ती मतदानोत्तर चाचण्यांच्या आकडय़ामुळे कुठल्या कुठे पळून गेली, असे काही हर्षोल्हसित विश्लेषकांनी सांगितले. मतदानोत्तर चाचण्यांवर शेअर बाजाराची चढ-उतार आपल्यासाठी नवीन नाही. पण यातही एनडीएच्या आकडय़ांना मिळणारा प्रतिसाद जोरकस असतो हेही दिसून आले आहे. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीएला सत्तास्थापनेची सर्वाधिक संधी असल्याचा अंदाज वर्तवला गेल्यानंतर सेन्सेक्स ६.६ टक्क्यांनी उसळला होता. २०१४ मध्ये मोदींच्या प्रथम सत्ताग्रहणाचे अंदाज ६.८ टक्क्यांच्या सेन्सेक्सवृद्धीने साजरे झाले होते. मात्र ‘इंडिया शायनिंग’ची प्रचंड हवा निर्माण होऊनही बहुमताचा आकडा कसाबसा गाठला जाईल, या अंदाजानंतर ७.५ टक्के इतकी प्रचंड घसरण अनुभवायला मिळाली होती. २००९ मध्ये यूपीए-२ सत्तेवर येणार या अंदाजाला जेमतेम १.९ टक्के सेन्सेक्सवृद्धीचा उदासीन प्रतिसाद मिळाला होता. नरेंद्र मोदीप्रणीत एनडीएला खरोखरच बहुमताच्या आसपास वा पलीकडे जागा मिळाल्यास सेन्सेक्स ४० ते ४२ हजारांपर्यंत पोहोचेल, असाही अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. निव्वळ अंदाजित राजकीय आकडेवारीवर इतके चढ-उतार होण्यामागे नेमके काय कारण असावे, याचाही विचार आणि अभ्यास होण्याची गरज आहे. मतदानोत्तर निष्कर्ष अनेकदा फसवे कसे ठरतात, याचीही स्वतंत्र आणि समांतर चर्चा नेहमी होत असतेच. तेव्हा तो पाया भुसभुशीत असूनही त्याच्यावर इतके मोठे इमले कसे काय (काही लाख कोटींचा फायदा किंवा नुकसान) उभे राहतात, हे कोडे उरतेच.