संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धीची देवता असणाऱ्या श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. पुढील नऊ दिवस या श्रीगणेशाचे वास्तव्य आपल्या घरांत आणि सार्वजनिक ठिकाणी असणार आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असतानाच कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्य़ांनी सोसलेल्या भयावह परिस्थितीची क्लेशदायक किनार विसरता कामा नये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा सार्वजनिक उत्सव विविध कारणांसाठी महत्त्वाचा. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात जनमत निर्माण करण्यासाठी घराघरांत विराजमान होणाऱ्या गणेशाला रस्त्यावर आणून सामाजिक अभिसरण घडवण्याचा केलेला प्रयत्न आज इतक्या वर्षांनतर खूपच वेगळ्या पद्धतीने साजरा होतो आहे. भक्ती आणि शक्ती अशी नवी जाणीव या शंभरी पार केलेल्या उत्सवाने प्रत्येकाच्या मनात निर्माण केली आहे. हौसेच्या पलीकडे समाजकारणाचा मार्ग म्हणून त्याला मिळालेली मान्यता वादातीत आहे. त्यामुळेच राज्यातील अतिवृष्टी आणि दुष्काळाची जाणीव ठेवून हा उत्सव साजरा करण्याचे भान अनेक सार्वजनिक मंडळांनी दाखवलेले दिसते. समाजकारणाने जेव्हा राजकारणाशी हातमिळवणी करायचे ठरवले, तेव्हा त्यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यासपीठ आयतेच उपलब्ध झाले. त्यामुळे या महोत्सवाला अनेकांगी पदर लाभले. छोटय़ा मंडळापासून सुरुवात करून अल्पावधीत सत्तेचा सोपान पार करणाऱ्या या मंडळांच्या कार्यकर्त्यांमधून भावी पिढीचे नगरसेवक, आमदार, खासदार निर्माण होण्याची एक नवी परंपरा निर्माण झाली आणि अधिक खर्च करणारा बलवान असा नवा अर्थही आपोआप प्राप्त झाला. परंतु याच सार्वजनिक उत्सवातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग अनेक चांगल्या कामांसाठी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये जेवढी वाढ होत राहील, तेवढा हा उत्सव विधायकतेच्या मार्गावर जाऊ शकेल. समाजजागृतीसाठी उत्सवाचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल, याचा विचार होत असतानाच, त्यातील उन्मादाला वेसण घालण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. गेल्या काही वर्षांत या उत्सवाला जो औद्योगिक पाठिंबा मिळतो आहे, त्याने अर्थकारणही बदलले आहे. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यापेक्षा उद्योगांच्या जाहिरातींतून गणेशोत्सवाचा खर्च उभा केला जाऊ लागल्यामुळे वर्गणीच्या नावाखाली होणारा धाकदपटशाही कमी होऊ लागला आहे. परंतु त्याबरोबरच या उत्सवातला दिखाऊपणा मात्र वाढू लागला. भक्तांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना पुढे येऊ लागल्या. त्याने या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप पूर्णत: पालटले. उत्सवात नव्याने शिरलेल्या या अर्थकारणाने या उत्सवातील उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली. यंदा देशातील मंदीसदृश परिस्थितीचा फटका या उत्सवालाही बसतो आहे. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिमा संवर्धनाचा, तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्याचाही आटोकाट प्रयत्न होईल. या वर्षी राज्यातील काही जिल्ह्य़ांत अतिवृष्टीचे, तर अनेक जिल्ह्य़ांत दुष्काळाचे सावट आहे. तेथील नागरिकांचे जगणे असह्य़ स्थितीत असताना, त्याची जाणीव ठेवून सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव साजरा करण्याची सद्बुद्धी सर्वाना द्यावी, अशी अपेक्षा सामान्यांकडून होणे स्वाभाविक आहे. गणांचा नायक असलेल्या या देवतेकडून प्रगती, संपन्नता आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागणाऱ्या प्रत्येकाच्या पदरात निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तीचे दान पडावे, असे मागणे अजिबातच गैर नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सतत येणाऱ्या विघ्नांचे संकट दूर व्हावे आणि समाजात मांगल्याची प्रतिष्ठापना व्हावी, अशा इच्छेनेच यंदाचा हा सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, यात शंका नाही.