गीतकार योगेश यांचे निधन झाल्याचे वाचून ‘रजनीगंधा’ चित्रपटाची गाणी लिहिणारा कवी गेल्याची हळहळ अनेकांना वाटत असतानाच बासु चटर्जी यांचे जाणे अधिक चटका लावणारे आहे. करोनाकाळात टाळेबंदीमुळे का होईना, कुटुंबीय एकत्र आलेले असताना आणि दुकानाच्या रांगेत उभे राहणाऱ्या मध्यमवयीनांना १९८० पूर्वीचा काळ आठवत असताना बासुदा गेले. अंथरूण पाहून पाय पसरणाऱ्या, गरिबीला धट्टीकट्टी म्हणत तिची तुलना लुळ्यापांगळ्या श्रीमंतीशी करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे प्रेमासारख्या सहज भावनेच्या अभिव्यक्तीप्रसंगी ‘संस्कारां’मुळे बुजणाऱ्या मध्यमवर्गाला त्यांनी चित्रपटांत आणले  व्यावसायिक यशसुद्धा मिळवले- तेही, ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभचे चित्रपट जोरात असताना. अमोल पालेकरांनी हृषीकेश मुखर्जीच्या किंवा अन्य दिग्दर्शकांच्याही चित्रपटांत स्मरणीय भूमिका केल्या असल्या तरी, ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटीसी बात’मधून पालेकरांची एक अमीट प्रतिमा तयार केली ती बासुदांनीच. हे बासुदा असे की, ‘शौकीन’ किंवा ‘पसंद अपनी अपनी’मध्ये मिथुन चक्रवर्ती याच्याकडूनसुद्धा सरळमार्गी मध्यमवर्गीय तरुणाची भूमिका त्यांनी उत्तमपणे वठवून घेतली आणि मिथुन म्हणजे कराटे, डिस्को ही समीकरणे तात्पुरती का होईना पण अडगळीत पडली. हे करण्यासाठी धमक लागते. ती बासुदांनी कुठून मिळवली असेल?

उत्तर सोपे आहे : साहित्यातून! जगण्यातले श्रेय शोधणारे काहीसे आदर्शवादी साहित्य १९४० च्या दशकात होते, तर त्यानंतरचा १९६० चा काळ हा जगणे जसे असते तसे टिपणाऱ्या साहित्याचा कालखंड होता. हिंदीत प्रेमचंदांपासून ते मन्नू भण्डारी, राजेन्द्र यादव, मोहन राकेश यांच्यापर्यंतच्या लेखकांमधून या कालखंडांतला फरक दिसतो; मराठीत खांडेकर, य. गो. जोशी यांच्यानंतर जयवंत दळवी, अरविंद गोखले यांच्या कथा-कादंबऱ्या हाच फरक दाखवतात; तर बंगालीत काळाचा हा फरक बिभूतिभूषण बंदोपाध्याय ते शंकर अशा लेखकांमधून दिसतो. ‘जगण्याचा आरसा’ समोर ठेवणारे हे साहित्य १९६० च्या दशकात आले, तेव्हा मध्यमवर्गीयांचा अनौपचारिक इतिहासच कथा-कादंबऱ्यांतून लिहिला जात होता. राष्ट्रकवी दिनकर यांनी राजेन्द्र यादव यांच्या ‘सारा आकाश’ या कादंबरीला दिलेली दाद नेमकी अशाच शब्दांतली आहे. ‘कादंबरीकाराने निम्नमध्यमवर्गीयांच्या वेदनांचा इतिहास लिहिला आहे, जो आपल्यापैकी बहुतेकांनी भोगला असेल’ असा दिनकर यांचा अभिप्राय. बासुदांनी गांभीर्याने चित्रपटकार म्हणून कारकीर्द सुरू केली ती याच ‘सारा आकाश’वर चित्रपट काढून! बहिणीच्या लग्नात हुंडा द्यावा लागला, त्याचे कर्ज डोईजड झाले म्हणून आता धाकटय़ा भावाने लग्न करायचे- हुंडा घ्यायचा आणि आधीचे कर्ज फेडायचे.. ही कथा बासुदांनी जिवंत केली. कादंबरी ते पटकथा या माध्यमांतरामध्ये काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे याची पक्की समज या पहिल्याच कामात त्यांनी दाखवली होती. कदाचित, फणीश्वरनाथ रेणू लिखित ‘मारे गए गुलफाम’ या कादंबरीवर आधारलेला ‘तीसरी कसम’ हा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या बासु भट्टाचार्य (हे सीनियर बासुदा!) यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणे आपल्या ज्युनियर बासुदांनी आवडीने पत्करले होते, म्हणूनही असेल. पण साहित्याचा आधार चित्रपटांना हवा म्हणजे काय हवे- आणि काय नको हेसुद्धा- बासु चटर्जी यांनी ओळखले होते. चित्रपटांत केवळ शब्द नसतात.. अभिनयातून साकार होणारी माणसे असतात! ही माणसे आणि त्यांचा भवताल, हे मध्यमवर्गीयांनी अगदी जगलेलाच अनुभव मांडताना कसे साकार करायचे, याचेही भान बासुदांना होते. त्यांच्या चित्रपटांमधील ‘लोकेशन्स’मधून हे भान दिसे, पडद्यावरील कलावंतांच्या कपडय़ांमधूनही दिसे.

हृषीकेश मुखर्जी, बासु भट्टाचार्य आणि बासु चटर्जी हे तिघेही बिमल राय यांच्या परंपरेतले. चित्रीकरण आणि खोटेपणा यांचे नाते तोडताना बासु चटर्जीनी ‘दो बिघा जमीन’ च्या पुढले पाऊल टाकले. ‘सारा आकाश’चे अख्खे चित्रीकरण राजेन्द्र यादवांच्या राजा की मंडी (आग्रा) येथील घरातच करून बासु चटर्जीनी अभावितपणे ‘हिंदी न्यू वेव्ह’ चित्रपटांचा पाया मजबूत केला. पुढे ‘रजनीगंधा’मध्ये विद्या सिन्हा आणि अमोल पालेकर यांच्या भेटीगाठी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’लगत त्या वेळी असलेल्या ‘समोवार कॅफे’त बासुदांनी घडवल्या. आणखीही कित्येक चित्रपटांतून टॅक्सी, रिक्षा, डबलडेकर बसमधून ये-जा करणाऱ्या नायक-नायिकांच्या नजरेतून, त्या वाहनांतूनच त्यांना दिसणारी मुंबई दाखवली. ही दृश्ये अजिबात अलौकिक वगैरे नव्हेत, दिपवणारी तर नव्हेतच. इतकेच कशाला- तस्करीच्या अधोविश्वातील अंधाऱ्या गल्ल्या आणि बॉस लोकांचे अड्डे आदींतून धक्कादायक आणि ‘कधीच पाहिले नाही- पाहण्याची हिंमतसुद्धा नाहीच’ असे मुंबईचे रूप १९७२ ते ७५च्या काही चित्रपटांतून दिसायचे, तसेही काही बासुदांनी दाखवले नाही. त्यांनी दाखवलेली मुंबई ‘आपली’ वाटणारीच होती. सरळसाधी. नेहमीची. ‘चितचोर’मध्ये प्रेक्षकांना त्यांनी गावाला नेले. ‘शौकीन’मध्ये तर गोव्यालाही नेले. पण गावाला येऊन ‘मै तो गया मारा’ म्हणणारा ‘चितचोर’चा नायक जसा मुंबईचा, तसे ‘शौकीन’मधले चारही म्हातारेसुद्धा मूळचे मुंबईचेच. स्टुडिओ पद्धतीच्या अस्तानंतर, बडय़ा बॅनरांसोबत छोटे निर्मातेही स्थिरावत असताना आणि ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ला ‘हम आपके है कौन’च्या उच्चमध्यमवर्गीय भपक्याने भुलवले नसताना, करण जोहर शाळकरी असताना जे अनेक दिग्दर्शक नामवंत झाले, त्यांपैकी बोरिवलीला भाडय़ाच्या घरात राहणारे बासु चटर्जी हे एक!

बासुदांवर एक आक्षेप हमखास घ्यावा असा. तो म्हणजे, संधी आणि बौद्धिक कुवत असूनसुद्धा त्यांनी चित्रपटांमध्ये राजकीय भाष्य आणले नाही. दिवंगत प्रिया तेंडुलकरांना ‘रजनी’चे रूप देऊन गृहिणी व सजग नागरिक यांतला फरक बासुदांनी मिटवला, हे खरे. पण त्याहीपुढली- मनोहर श्याम जोशी लिखित ‘कक्काजी कहीन’ या भारतीय राजकारणाचे सत्यदर्शन घडवणाऱ्या व्यंग्यसंग्रहाला दूरदर्शन मालिकेचे रूप देण्याइतकी- कुवत जर बासुदांकडे होती; तर त्यांच्या पात्रांनी कधी राजकीय भूमिका का नाही घेतली? याचे उत्तर शोधण्यासाठी, त्यांच्या नायिकांकडे पुन्हा पाहावे लागेल.. या नायिकांपैकी चटकन आठवणाऱ्या म्हणजे विद्या सिन्हा आणि झरीना वहाब किंवा दोन-तीन चित्रपटांत रती अग्निहोत्री. तिघीही चापूनचोपून वॉयलच्या साडय़ा नेसणाऱ्या. त्यातून प्रेक्षकांच्या वकुबानुसार घडेल तितकेच अंगप्रदर्शन. एरवी नाही. एक नीतू सिंगने साकारलेली ‘प्रियतमा’ वगळता या प्रेमिका-नायिकांच्या व्यक्तिमत्त्वांत अबोध लोभसपणा. पण अशा नायिकांच्या पलीकडे ‘स्वामी’मधल्या गिरीश कर्नाड यांची नायिका म्हणून शबाना आझमींना स्थान देऊन बासुदांनी, साक्षात् शरच्चंद्र चट्टोपाध्यायांची कादंबरी ‘स्त्रीवादी’ केली. ‘शौकीन’ने स्त्रियांचे वस्तुकरण हा निव्वळ पुरुषी अहंकाराचा भाग कसा, याचे बिंग फोडले. त्याहीनंतरचा (१९९४) ‘त्रियाचरित्र’ हा चित्रवाणीपट, पुरुषी अत्याचारामुळे लढाऊ होणाऱ्या स्त्रीची कहाणी सांगतो. स्त्री-पुरुष समानता तसेच मध्यमवर्गीय संस्कारांतून आलेली मूल्ये जपणे, हे बासु चटर्जी यांचे ‘राजकारण’च (चांगल्या अर्थाने) होते! मध्यमवर्गीय भावभावनांच्या या ‘इतिहासकारा’ला ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.