लोकसभेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत बिहारमधील ४० पैकी ३९ जागा जिंकून या राज्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकतर्फी यश मिळविले होते. बिहारची विधानसभा निवडणूकही अशीच एकतर्फी होणार, असे चित्र सुरुवातीला होते, याचे कारण लालू प्रसाद यादव यांची अनुपस्थिती, कमकुवत काँग्रेस अशा पार्श्वभूमीवर ‘नितीश कुमार हाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल,’ असे भाजपनेही जाहीर केले होते. पण निवडणुकीची घोषणा झाली तसे चित्र बदलू लागले. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली आणि त्यातून वेगळा संदेश गेला. नितीश कुमार-भाजप आघाडीत सारे काही आलबेल नाही हेच त्यातून स्पष्ट झाले. रामविलास पासवान हे मोदी सरकारमध्ये मंत्री तसेच बिहारमध्ये जनता दल-भाजप युतीतील मित्रपक्ष. पासवान यांची बिहारमध्ये ताकद काही समाजगटांमध्येच. पण हे समाजगट मतदार म्हणून कळीचे. तेव्हा कधी लालू प्रसाद तरी कधी भाजपबरोबर हातमिळवणी करून पासवान कायम सत्तेत राहिले. पासवानपुत्र चिराग यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून आली आणि त्यांनी स्वबळावर लढण्याचे जाहीर के ले. ही घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राज्यात भाजप-लोकजनशक्ती पार्टी युतीचे सरकार सत्तेत येईल, असा आशावादही चिराग यांनी व्यक्त केला. या साऱ्या घडामोडींमध्ये भाजपबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. नितीश कु मार यांचे नेतृत्व मान्य नाही, असे सांगत पासवानपुत्राने वेगळी चूल मांडल्यावर भाजपकडून व्यक्त करण्यात आलेल्या सावध प्रतिक्रि येमुळे संशय अधिकच बळावत गेला. गेली १५ वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या नितीश कुमार यांचीही प्रतिमा पूर्वीसारखी राहिलेली नाही. अडीच वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडून पुन्हा भाजपबरोबर हातमिळवणी के ल्याने त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नितीश कुमारांनी ज्यांची साथ घेतली, त्या लालूंच्या कुटुंबीयांवर आरोप करून नितीश यांना पेचात पकडायचे, मग सत्तेत भागीदार व्हायचे, असा खेळ भाजपने यशस्वी केला होताच. आजच्या घडीला नितीश कु मार यांना भाजपची साथ हवी आहे. हे ओळखूनच भाजपने पावले टाकली. निवडणुकीत नितीश कु मार यांच्या जनता दलाच्या आमदारांची संख्या कमी करायची, जास्त आमदार निवडून आणून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगायचा, अशी भाजपची योजना असल्याची चर्चा सुरू झाली. पासवानपुत्राला भाजपचीच फू स असल्याचे जनता दलाचे नेते उघडपणे बोलू लागले. लोकजनशक्ती पार्टी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाही, पण नितीश यांच्या उमेदवारांच्या विरोधात लढणार आहे! यातून नितीश यांच्या पक्षाच्या उमेदवारांना तिरंगी लढतींचा सामना करावा लागेल. नितीश यांच्या आमदारांची संख्या कमी करायची हेच भाजपचे उद्दिष्ट दिसते. गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ कमी करण्यासाठी भाजपने वेगवेगळे प्रयोग केले होते. संधी येताच शिवसेनेने भाजपला अद्दल घडवीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा के ला. बिहारमध्ये उद्या भाजपचे जास्त आमदार निवडून आले तरी आधी जाहीर के ल्याप्रमाणे नितीश कु मार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देईल की मुख्यमंत्रिपदावर दावा करेल याचा अंदाज आताच वर्तविता येणार नाही. पण भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केल्यास नितीश कु मार यांची भूमिका महत्त्वाची असेल. अशा वेळी महाराष्ट्राप्रमाणेच लालूपुत्र, नितीश एकत्र येऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन, बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाच्या आधारे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला पावले उचलावी लागतील.