03 June 2020

News Flash

कुरापतींमागील चिनी चरफड

भारताच्या सुखोई-३० लढाऊ विमानांनी या टापूत उड्डाणे केल्यानंतर चिनी हेलिकॉप्टरेही येथे दिसू लागली आहेत

संग्रहित छायाचित्र

 

भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेवर (लाइन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल – एलएसी) गेल्या आठवडय़ात दोन ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान ‘झटापटी’ झाल्या. ५ मे रोजी पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराजवळ आणि ९ मे रोजी सिक्कीममधील नाकू ला सीमेजवळ झालेल्या झटापटींमध्ये दोन्ही देशांचे मिळून अनुक्रमे २५० आणि १५० सैनिक गुंतले होते. दोन्ही बाजूंकडील काही सैनिक जखमी होण्यापलीकडे फारशी हानी झालेली नसली, तरी यानिमित्ताने दोन्ही देशांनी विशेषत: दक्षिण लडाखमधील सीमेजवळ सैन्याची जमवाजमव केली आहे. पँगाँग सरोवराजवळ झालेल्या झटापटींमध्ये भारताचे कर्नल आणि मेजर हुद्दय़ाचे अधिकारी जखमी झाले. या टापूत गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांवर चिनी सैनिकांनी कोणतीही चिथावणी नसताना हल्ला केला. त्यांच्याकडील दंडुक्यांना खिळे लावलेले असल्यामुळे काही भारतीय सैनिक गंभीररीत्या जखमी झाले. यानंतर भारताच्या सुखोई-३० लढाऊ विमानांनी या टापूत उड्डाणे केल्यानंतर चिनी हेलिकॉप्टरेही येथे दिसू लागली आहेत. हा टापू वादग्रस्त असल्याची भावना दोन्ही बाजूंकडे असल्यामुळे अशा झटापटी होत असतात, ही भारताची बरीचशी समंजस भूमिका. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलेली भूमिका मात्र काहीशी शहाजोग वाटते. कोविड-१९ च्या निराकरणासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सहकार्य दिसून येत आहे, अशा वेळी इतर मुद्दय़ांवर कोणतेही राजकारण करण्याची ही वेळ नाही-  असे हा प्रवक्ता सांगतो. पण चीनचे लष्कर सीमेचे पावित्र्य राखण्यास कटिबद्ध असते, हे या प्रवक्त्याचे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. पँगाँग सरोवराजवळच ऑगस्ट २०१७ मध्ये अशाच प्रकारची झटापट झाली होती. तत्पूर्वी त्याच वर्षी डोकलाम या भूतान-चीन-भारत संयुक्त सीमाबिंदूजवळ ७३ दिवसांचा पेच उद्भवला होता. वारंवार असे प्रसंग येतात याचे प्रमुख कारण म्हणजे, या दोन देशांदरम्यान असलेल्या ३४८८ कि.मी. लांबीच्या प्रत्यक्ष ताबारेषेवरील अनेक बिंदूंविषयी चीनकडून वाद उकरले जातात. अरुणाचल प्रदेशला चीन तिबेटचा दक्षिण भाग मानतो. पुन्हा या सीमा बहुतेक ठिकाणी ‘आखण्यात’ आलेल्या नाहीत. त्यामुळे नाकू ला येथे तर चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसून दमदाटी करत होते. नाकू ला आणि पँगाँग यांच्यात २५०० कि.मी. अंतर आहे. एकाच आठवडय़ात अशा दोन दूरस्थ ठिकाणी झटापटींसारखा थिल्लरपणा करण्याची गरज काय? चीनला तसे करावेसे वाटते याचे एक कारण, सध्याच्या कोविडमय जागतिक परिप्रेक्ष्यात ‘आपणच जगाचे तारणहार’ असल्यामुळे काहीही करू शकतो, असा त्या देशाच्या नेतृत्वाचा समज झालेला असावा! यातूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीसाठी तैवानच्या उपस्थितीला चीन आक्षेप घेतो. याच उन्मादातून भारताशी कुरापतीही काढल्या जातात. वास्तविक दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. डोकलामपश्चात वुहान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली, त्या वेळी डोकलामची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान संवादसेतू बळकट करण्याबाबत मतैक्य झाले होते. चीनच्या चरफडीचे आणखी एक कारण म्हणजे, डोकलामप्रमाणेच याही वेळी भारतीय लष्कराने झटापट सुरू झाल्यानंतर नेमस्त भूमिका घेण्याचे कटाक्षाने टाळले. ‘वाढत्या क्षमतेबरोबरच वाढत्या जबाबदारीचे भानही यावे लागते’ या अर्थाचे इंग्रजी वचन आहे. सर्वाधिक ताकदवान राष्ट्र हे नेहमीच सर्वाधिक भयगंडग्रस्तही असते, असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी फार पूर्वी अमेरिकेच्या बाबतीत म्हटले होते. दोन्ही वचने सध्या चीनला चपखल लागू होतात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 12:02 am

Web Title: article on chinese helicopters in ladakh abn 97
Next Stories
1 साखरेचा गोडवा धोक्यात..
2 करोनाकाळातील मूकयोद्धे
3 अभिनंदनीय आणि आवश्यकही..
Just Now!
X