News Flash

हीच पुरस्काराची वेळ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यामुळे रामचंद्रन यांच्याआधी भारतरत्न मिळण्याची वाट पाहावी लागली होती.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार तमिळ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर होणे ही एरवी स्वाभाविक घटनाच. त्यांचे रुपेरी पडद्यावरील कर्तृत्व, लोकप्रियता, राजकारण, समाजकारण याबद्दल गेली काही वर्षे समाजमाध्यमांच्या सर्व व्यासपीठांवर अक्षरश: पूर येत होता. त्यामुळे खरे तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला हा पुरस्कार खूप अगोदरच द्यायला हवा होता. परंतु तेव्हा ते ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात, तेथे विधानसभेच्या निवडणुका नव्हत्या, त्याला काय करणार? रजनीकांत यांचे आडनाव गायकवाड असे असून ते मूळचे महाराष्ट्रातील आहेत, ही जरी मराठी माणसासाठी अभिमानाची बाब असली, तरी चित्रपटसृष्टीतील आज हयात असणाऱ्या सर्वांपेक्षा किती तरी ज्येष्ठ असलेल्या सुलोचना दीदी यांना हा पुरस्कार मिळावा, म्हणून सरकारदरबारी किती तरी जणांना उंबरे झिजवावे लागतात. तेव्हा पुरस्कार हा कर्तृत्ववानांनाच द्यायचा असतो, हे सिद्ध करताना एकाच दगडात आणखी काही पक्षी हाती लागतात काय, याचाही विचार करावा लागतोच! तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा कार्यभार सांभाळणारे आणि रजनीकांत यांच्या किती तरी आधी तमिळ चित्रसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे एम. जी. रामचंद्रन यांना १९८८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देण्यात आला त्यानंतरच्याच वर्षात तमिळनाडूमध्ये आठव्या विधानसभेसाठी निवडणुका होत्या. पुरस्कार कधी मिळतो, याला जे महत्त्व प्राप्त होते, ते राजकारणामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यामुळे रामचंद्रन यांच्याआधी भारतरत्न मिळण्याची वाट पाहावी लागली होती. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्र विधानसभेने २०११ मध्येच केलेली असूनही, तशी घोषणा नोव्हेंबर २०१३ मध्ये झाली आणि २०१४ च्या फेब्रुवारीत तो देण्यात आला, यामागचे कारणही मे-२०१४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक, हेच असावे अशी उघड चर्चा झाली होती. आता फाळके पुरस्कार रजनीकांत यांना मिळतो आहे आणि तमिळनाडू विधानसभेची निवडणूक येत्या ६ एप्रिल रोजी आहे. रजनीकांत हे भाजपला जवळचे वाटतात, त्यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घ्यावा, असे प्रयत्न गेले काही महिने सुरू होते. मागील वर्षाच्या अखेरीस रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा करून धुरळा उडवून दिला होता. काहीच दिवसांत आपला हा निर्णय त्यांनी मागे घेतला. तरीही त्या राज्यातील निवडणुकीत रजनीकांत यांचे महत्त्व मात्र टिकून राहील, असे तेथील निरीक्षकांना वाटते. त्यामुळे फाळके पुरस्कार निवडणुकीच्या काहीच दिवस आधी जाहीर होण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणे स्वाभाविक आहे. गेली साडेचार दशके रजनीकांत यांनी तमिळ चित्रसृष्टीत आपले स्थान अनन्यसाधारण बनवले. अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या भारतीय चित्रसृष्टीतील अगदी मोजक्या कलावंतांमध्ये त्यांची गणना होते. अगदी गेल्या दहा वर्षांत त्यांचे जे पाच चित्रपट प्रदर्शित झाले, त्यांनी लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. ‘थलैवार’ (नेते) हे अभिधान मिरवणाऱ्या रजनीकांत यांनी राजकारणात येऊन त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घ्यावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तमिळनाडूने गेल्या पाच दशकांत राष्ट्रीय पक्षांचा मुख्यमंत्री पाहिलेला नाही. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवतीच तेथील राजकारण फिरते. त्यामुळे खरे तर रजनीकांत यांच्यासाठी राजकारण प्रवेश ही केवळ औपचारिकता होती. त्यांच्या ‘रजनी मक्कळ मंदरम’ या त्यांच्या चाहत्यांच्या संघटनेची राज्यभर ६५ हजार केंद्रे आहेत. परंतु या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी न होता, पडद्यामागे राहून राजकीय सूत्रे हलवण्याच्या त्यांच्या खेळीने तेथील अनेक जण बुचकळ्यातही पडले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला फाळके पुरस्काराने झळाळी प्राप्त झाली हे खरेच. प्रश्न एवढाच की, बरोब्बर १ एप्रिल रोजीच जाहीर करून या पुरस्काराला राजकारणाची जोड द्यायची खरेच गरज होती काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 12:06 am

Web Title: article on dadasaheb phalke prestige award to tamil actor rajinikanth abn 97
Next Stories
1 पाकिस्तानचे बदलते रंग
2 झळांचे तात्पर्य…
3 नेतान्याहूंशिवाय आहेच कोण…!
Just Now!
X