05 April 2020

News Flash

विस्कटलेले क्रीडाविश्व

पण सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेपेक्षा विषाणूचा विचार करण्यास प्राधान्य देते.

करोना विषाणूच्या वैश्विक प्रादुर्भावामुळे, विशेषत: प्रगत आणि नवप्रगत देशांमधील अभूतपूर्व फैलावामुळे क्रीडा स्पर्धाचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कटले गेले आहे. चालू मोसमातील बहुतेक सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित झाल्या आहेत. अमेरिका आणि युरोप हे क्रिकेटेतर बहुतेक सर्व स्पर्धाचे केंद्रबिंदू असतात. करोनाच्या धुमाकुळामुळे तेथील सर्व स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ज्या दोन बहुराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार होत्या, त्या दोन्ही- म्हणजे युरो चषक आणि कोपा अमेरिका पुढील वर्षीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही अत्यंत प्रेक्षकप्रिय स्पर्धा यंदा जून-जुलै या काळात होणार होत्या. फॉम्र्युला वन रेसिंग हंगामाच्या पहिल्या सात शर्यती आतापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टेनिसविश्वालाही करोना विषाणूचा फटका बसू लागला असून, अनेक टेनिसपटूंचा विरोध डावलून फ्रेंच खुली स्पर्धा आता सप्टेंबरमध्ये म्हणजे अमेरिकन खुल्या स्पर्धेनंतर होणार आहे. प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा अजूनही २९ जून ते १२ जुलै या काळात भरवली जाऊ शकते असा विश्वास या स्पर्धेचे संयोजक ऑल इंग्लंड क्लबला अलीकडेपर्यंत वाटत होता. परंतु युरोपात आणि इंग्लंडमध्येही परिस्थिती झपाटय़ाने बिकट बनल्याने हा विश्वास तितक्या ठामपणे व्यक्त होत नाही. जगभर करोनाच्या फैलावामुळे रद्द किंवा स्थगित झालेल्या क्रीडा स्पर्धामुळे अवाढव्य वित्तहानी झालेली असून, तिची मोजदाद करण्याच्या मन:स्थितीत सध्या कोणी नसले, तरी भविष्यात काही कठोर निर्णय त्याही अनुषंगाने घ्यावे लागतीलच.

सर्व क्रीडा स्पर्धामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित ऑलिम्पिक स्पर्धेसमोर दोन महायुद्धांनंतर प्रथमच अस्तित्वाचा (तात्कालिक आणि तात्पुरता) प्रश्न उभा राहिला आहे. १८९६ पासून सुरू झालेल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा १९१६ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान, तसेच १९४० आणि १९४४ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान भरवल्या जाऊ शकल्या नव्हत्या. यंदा टोक्योमध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक होऊ घातले आहे. ते पुढे ढकलावे, अशी मागणी सध्याची गंभीर स्थिती पाहता अनेक स्तरांतून होते आहे. याबाबत दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल. त्यानंतरही ऑलिम्पिक पुढे ढकलावे की नेहमीप्रमाणे होऊ द्यावे, याबाबत नेमके निर्णय घेणे या घटकेला सोपे नाही. ऑलिम्पिक स्थगितीविषयी आताच निर्णय घेणे जबाबदार किंवा परिपक्वपणाचे ठरणार नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी नुकतेच सांगितले. याचा अर्थ किमान स्पर्धा पुढे ढकलण्याविषयी आयओसी सध्या विचार करत नाही, म्हणजे ती वेळेवर होईल अशी आशा संघटनेला वाटते. जपानी पंतप्रधान शिन्झो आबे यांच्या सरकारची अधिकृत भूमिकाही वेळेवर ऑलिम्पिक भरवण्याचीच आहे. ऑलिम्पिक ज्योतीचे शुक्रवारी जपानमध्ये आगमन झाले. शनिवारी ती पाहण्यासाठी करोनाकेंद्री जमावबंदी सूचना धुडकावून हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ऑलिम्पिकची तयारी हे मोठे आव्हान असते आणि ते आव्हान पेलण्यासाठी जपानी यंत्रणा सज्जही झाली होती. ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे अर्थव्यवस्थेला सुप्त चालनाच असते. पर्यटन वाढते, उपभोग व मागणी वाढते. पुरस्कर्त्यांकडून यंदाच्या ऑलिम्पिकसाठी जवळपास तीन अब्ज डॉलर येणार असल्याचा अंदाज आहे. प्रक्षेपण हक्कांमधून मिळणारे उत्पन्न कदाचित याच्या दुप्पट भरू शकेल. इतक्या मोठय़ा निधीवर तात्पुरते का होईना, पण पाणी सोडावे लागणे सोपे नाही. लंडन, पॅरिस, लॉस एंजलिस, अथेन्स या शहरांप्रमाणेच टोक्योही एकापेक्षा अधिक ऑलिम्पिक स्पर्धा भरवणारे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. यापूर्वी १९६४ मध्ये जपानने प्रथमच एक आशियाई देश म्हणून ही स्पर्धा यशस्वीरीत्या भरवून दाखवली होती. बीजिंग, लंडन, रिओ दी जानेरो या गेल्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपदाचा फायदा त्या-त्या अर्थव्यवस्थांना मोठय़ा प्रमाणात झाला होता. जपानही मंदीच्या छायेत काही वर्षे असल्यामुळे या ऑलिम्पिककडून त्या देशाला मोठय़ा आर्थिक आशा आहेत.

पण सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेपेक्षा विषाणूचा विचार करण्यास प्राधान्य देते. अनेक प्रकारांमधील पात्रता फेऱ्याच सुरू होऊ शकलेल्या नाहीत. काही खेळांमध्ये या स्पर्धा दोन महिने अलीकडेपर्यंत चालतात. त्या होऊ शकलेल्या नाहीत आणि नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही. पात्र ठरलेल्या असंख्य खेळाडूंना करोनाच्या प्रभावामुळे पुरेसा सराव करता येऊ शकत नाही. त्यांची तंदुरुस्ती ऑलिम्पिकपर्यंत उच्चतम पातळीवर नेणे हे स्वतंत्र आव्हान आहे. ही गुंतागुंत इतर स्पर्धाच्या मानाने किती तरी अधिक पट आहे. शिवाय इराण, इटली, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका हे सहसा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये नेहमी चांगली कामगिरी करणारे देश प्राधान्यक्रमात ऑलिम्पिकच्या तयारीला किती वरचे स्थान देतील, हा प्रश्नच आहे. एका जराशा सुधारित प्रकारातील विषाणूने संपूर्ण जगाला पेचात टाकले आहे. क्रीडाविश्वही त्याला अपवाद नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 3:26 am

Web Title: article on disrupted sports world due to corona virus akp 94
Next Stories
1 अपात्र ‘आयाराम’ की अध्यक्षही?
2 इस्रायलमध्येही ‘महाविकास’!
3 आता का कळवळा?
Just Now!
X