ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत सर किम डॅरोक यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी मतप्रदर्शन करणारे काही ईमेल-संदेश अनाहूतपणे उघड झाल्यामुळे  त्या देशाची काहीशी पंचाईत होणे स्वाभाविक आहे. अद्याप तरी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट, हे दोघेही डॅरोक यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. पण ही परिस्थिती फार काळ टिकेल असे दिसत नाही. थेरेसा मे या लवकरच राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी बोरिस जॉन्सन किंवा तत्सम कट्टर ब्रेग्झिटवाद्याची पंतप्रधानपदी नियुक्ती होईल. अमेरिका आणि ब्रिटन हे परस्परांचे जुने आणि निष्ठावान मित्र मानले जातात. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींमध्ये हे देश खांद्याला खांदा लावून उतरत होते. मैत्रीची ही बैठक केवळ व्हाइट हाऊसच्या विद्यमान यजमानांकडून विस्कटली जाऊ शकते अशी शंका वाटल्यामुळेच बहुधा डॅरोक यांनी ब्रिटिश सरकारकडे २०१७पासून काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर अभिप्राय पाठवले होते. ‘मेल ऑन संडे’ या ब्रिटनमधील टॅब्लॉइड नियतकालिकाने ते प्रसृत केले. व्हाइट हाऊसमध्ये अभूतपूर्व निष्क्रियता आलेली आहे, असे डॅरोक एका ईमेलमध्ये सांगतात. ट्रम्प प्रशासन हे अकार्यक्षम आणि ढिसाळ झाल्याचे मत डॅरोक आणखी एका अभिप्रायात व्यक्त करतात. ट्रम्प यांना स्वतवरील कोणतीही टीका सहन होत नाही आणि टीकाकाराचा पाणउतारा करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ‘संबंधित राजदूताला मी ओळखत नाही पण त्याच्याविषयी या भागात फार चांगले मत नाही’ असे ट्वीट त्यांनी केले. त्याबरोबरच, आम्ही त्याच्याशी व्यवहार करणार नाही. पण ब्रिटनला लवकरच नवीन पंतप्रधान मिळेल ही चांगली बाब आहे, असेही ट्रम्प यांनी लिहिले. यातून दोन बाबी स्पष्ट होतात. एकतर मे यांच्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे माजी परराष्ट्रमंत्री आणि लंडनचे माजी महापौर पंतप्रधानपदी विराजमान होणार, याविषयी ट्रम्प यांना खात्री आहे. शिवाय जॉन्सन आल्यानंतर डॅरोकही ब्रिटनच्या राजदूतपदावर राहणार नाहीत, असा त्यांचा होरा आहे. इकडे लंडनमध्ये ब्रेग्झिटच्या घोळात बुडालेल्या मे सरकारच्या दृष्टीने डॅरोक ईमेल प्रकरण म्हणजे आणखी एक नामुष्कीच ठरली आहे. डॅरोक यांच्या मतांशी आम्ही सहमत नाही. पण नियुक्ती झालेल्या देशातील परिस्थितीविषयी अभिप्राय व्यक्त करण्याचे त्यांचे स्वातंत्र्य नाकारता येत नाही, अशी भूमिका मे यांनी घेतली आहे. ती ब्रिटनची अधिकृत भूमिका असल्यास, ट्रम्प प्रशासनाकडे खुलासे करण्यासाठी त्यांनी व्यापारमंत्री लियाम फॉक्स यांना कशासाठी धाडले हा प्रश्न उरतोच. फॉक्स यांना ट्रम्प यांची भेट मिळाली नाही, पण त्यांनी ट्रम्पकन्या इवान्का यांच्याकडे खुलासा सादर केला. या सगळ्या प्रकरणात डॅरोक यांची पाठराखण करण्याचा एकमेव अपवाद वगळल्यास ब्रिटनमधील गोंधळलेली बजबजपुरीच जगासमोर आली. थेरेसा मे पायउतार झाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांच्या आधिपत्याखालील ब्रिटन अमेरिकेचे राजनैतिक मांडलिकत्व अधिकृतपणे स्वीकारण्याचेच बाकी ठेवेल, अशी भीती तेथील राजकीय विश्लेषकांना वाटते. ट्रम्प यांनी ज्यांची मुक्तकंठाने भलामण केली, असे नायजेल फाराज (हेही ब्रिटनमधील कट्टर ब्रेग्झिटवादी!) उद्या ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूतही बनतील. आपल्याविषयी अनुकूल मतप्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीच आजूबाजूला आणि जगात असाव्यात या बालिश अट्टहासापायी ट्रम्प काहीही करू शकतात. ब्रिटननेही ट्रम्प यांच्या जाहीर वा गर्भित धमक्यांना घाबरून ‘मर्जीतला राजदूत’ वॉशिंग्टनमध्ये नेमल्यास त्यांची ब्रेग्झिटनंतर उरलेली पतही धुळीस मिळेल. ट्रम्प यांच्याविषयी डॅरोक यांनी ‘असमंजस’, ‘असुरक्षित’ अशी मते व्यक्त केली होती, ती खरी ठरवणाराच हा ट्रम्प यांचा विजय ठरेल!