30 May 2020

News Flash

करोना आला धावून!

कोविड-१९ मुळे जगातील बहुतेक देशांप्रमाणेच इस्रायलही ग्रस्त आहे.

संग्रहित छायाचित्र

 

इस्रायलमध्ये जवळपास ५०० दिवस आणि तीन निवडणुकांनंतर सत्तेचा पेच सुटल्यागत दिसतो. विद्यमान पंतप्रधान आणि लिकुड पक्षाचे नेते बेन्यामिन नेतान्याहू आणि त्यांचे कट्टर विरोधक व ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट या विरोधी पक्षाचे नेते बेनी गांत्झ यांनी एकत्र येऊन सरकार चालवण्याविषयी घेतलेला निर्णय अभूतपूर्व आणि धाडसीच आहे. कोविड-१९ मुळे जगातील बहुतेक देशांप्रमाणेच इस्रायलही ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत एकत्र सरकार स्थापणेच हितावह कसे आहे, याविषयी नेतान्याहू गेले अनेक दिवस आग्रही होते. त्यात राष्ट्रहितापेक्षाही स्वहितच अधिक असावे. कारण १२० सदस्यीय इस्रायली संसदेमध्ये (क्नेसेट) सर्वाधिक ३६ जागा जिंकूनही बहुमतासाठीच्या ६१ जागा त्यांना जुळवता आल्या नव्हत्या. त्यांचे विरोधक बेनी गांत्झ यांच्या पक्षाला ३३ जागाच मिळाल्या, पण त्या वेळी त्यांना इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे आघाडी सरकार बनवण्याचे पहिले निमंत्रण त्यांना मिळाले. पण राजकारणात निव्वळ आकडे जुळवून उपयोगाचे नसते, गणितेही जुळवावी लागतात, हे गांत्झ यांना कळून चुकले. कारण त्यांचीही ६१ जागा जमवताना विलक्षण दमछाक झाली. करोना संकटाचा सामना एकत्र येऊन करू या, नेतान्याहू यांच्या विनंतीवजा दबावाला अखेरीस गांत्झ फशी पडलेच. यामुळे त्यांच्याच पक्षात फूट पडली. कारण वाट्टेल ते झाले, तरी नेतान्याहू यांच्याबरोबर जाणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी अगदी तिसऱ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही केली होती! राजकारणात कधीही भीष्मप्रतिज्ञा करायची नसते, हा त्यांच्यासाठी दुसरा धडा ठरला. आता संयुक्त सरकारमध्ये पहिले १८ महिने पंतप्रधानपद नेतान्याहू यांच्याकडे राहील आणि नंतरचे १८ महिने ते गांत्झ यांच्याकडे सोपवले जाईल. तोवर गांत्झ हे संरक्षणमंत्री आणि ‘पर्यायी पंतप्रधान’ म्हणून जबाबदारी सांभाळतील. संयुक्त सरकारमध्ये गांत्झ यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व कमी असले, तरी मोक्याचे कायदामंत्रिपद त्यांच्या पक्षाला मिळाले आहे. नेतान्याहू यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचा खटला २४ मे रोजी सुरू होतो आहे. पण त्याने नेतान्याहू यांना तूर्तास फरक पडणार नाही. करोनाची भीती दाखवून सलग पाचव्यांदा पंतप्रधानपदावर बसण्याची अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली आहे. पश्चिम किनारपट्टीतील व्याप्त भूभाग इस्रायलमध्ये विलीन करून घेणे हे त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे काम आहे. ‘करोनामुळे झालेला आर्थिक विध्वंस निस्तरण्यासाठी आपण एकत्र येऊ,’ असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आर्थिक सुधारणांना ते कितपत प्राधान्य देतील याबाबत शंकाच आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेली व्यक्ती पंतप्रधानपदावर कधीही बसू शकणार नाही, यासाठी क्नेसेटमध्ये कायदा करू असे आश्वासन गांत्झ यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. त्याची पूर्तता होण्याची विद्यमान स्थितीत कोणतीही शक्यता नाही. आता ते विचित्र चक्रव्यूहात अडकले आहेत. नेतान्याहू यांचे अनेक निर्णय मान्य करायचे, तर त्याचे श्रेय विद्यमान पंतप्रधानांनाच मिळणार. निर्णयांना विरोध करायचा, तर सरकार डळमळीत होणार आणि अस्थिरतेचे खापर गांत्झ यांच्या माथी फुटणार! सत्ता भ्रष्ट करते, त्याचबरोबर सत्ता अगतिकही करते याचे हे ठसठशीत उदाहरण. पुन्हा निवडणूक लढवायची तर गांत्झ यांचे अनेक सहकारी पक्ष त्यांच्यावर निवडणूक काळातील आश्वासने मोडल्याबद्दल विलक्षण नाराज असल्यामुळे स्वबळावर किंवा आघाडी करूनही सत्ता प्राप्त होण्याची शक्यता नाही. इस्रायलमधील या दोन प्रमुख नेत्यांना पुरेसा जनाधार नाही, पण ऐन वेळी त्यांच्या मदतीला करोना विषाणू धावून आला आहे! त्यामुळे ‘समान, सामर्थ्यवान शत्रूशी’ लढण्यासाठी दोघे एकत्र आले आहेत. हे संयुक्त सरकारही औट घटकेचे ठरल्यास आणखी एखाद्या विषाणूचीच वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर येईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 12:02 am

Web Title: article on elections in israel abn 97
Next Stories
1 एक पाऊल पुढे, दोन मागे..
2 घर-ग्राहकांचा तूर्त विजय!
3 बुडत्याला आधार.. पण काडीचाच
Just Now!
X