‘देवा आम्हाला वाचव’.. डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी देण्याविषयी अभिप्राय विचारला गेल्यावर ज्या मोजक्या रिपब्लिकन धुरीणांनी २०१६मध्ये धिक्कार कळवला, त्यांपैकी दोन माजी परराष्ट्रमंत्री होते – हेन्री किसिंजर आणि जॉर्ज शुल्त्झ. ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये गेले तर काय होईल, यावर शुल्त्झ यांनी एवढय़ा तीन शब्दांची प्रतिक्रिया दिली होती. त्यांचे परवाच निधन झाले. १०० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य आणि गतशतकातील अत्यंत स्फोटक अशा राजनैतिक, लष्करी कालखंडाचे साक्षीदार राहिलेले शुल्त्झ म्हणजे एक वल्लीच. बहुगुणसंपन्न, उच्चशिक्षित आणि अमेरिका व जागतिक आर्थिक-लष्करी-राजनैतिक पैलूंचे विचक्षण जाणकार ही त्यांची एक ओळख. दुसऱ्या महायुद्धात तोफदलाकडून मर्दुमकी गाजवलेले सैन्याधिकारी ही दुसरी ओळख. अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि प्राध्यापक ही तिसरी ओळख. खरे तर एवढय़ा भांडवलावर अमेरिकेसारख्या संपन्न, सुशिक्षित देशात अत्यंत आरामात आणि समृद्धीत जीवन व्यतीत करता आलेच असते. जॉर्ज शुल्त्झ तेवढय़ावर समाधान मानणाऱ्यांपैकी नव्हतेच. ते सार्वजनिक जीवनात शिरले आणि रमले. रिचर्ड निक्सन यांच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री व वित्तमंत्री, मग एका बडय़ा अमेरिकी कंपनीचे सीईओपद अशी वळणे घेत १९८२मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या सरकारातील परराष्ट्रमंत्रिपदापाशी ही वाटचाल स्थिरावली. तो त्यांच्या सार्वजनिक कारकीर्दीचा परमावधी. या पदावर सात वर्षे त्यांनी केलेले काम जॉर्ज शुल्त्झ यांना मुत्सद्दी मेरुमणी ठरवते झाले. तो कालखंड स्फोटक आणि गुंतागुंतीचा. सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानमध्ये शिरल्या होत्या आणि कम्युनिस्ट महासत्तेची युद्धखोरी फुरफुरत होती. इराण-काँट्रा प्रकरणात रीगन यांची नाचक्की झाली होती आणि अमेरिकी अर्थव्यवस्था दोलायमान होती. अमेरिकी राजकीय-राजनैतिक वर्तुळात पराकोटीचा सोव्हिएतद्वेष फुसांडत होता. स्थैर्य, सामोपचार, तोडगा, चर्चा, संघर्षविराम, शस्त्रसंधी हे शब्दच जणू राज्यकर्त्यांच्या शब्दकोशातून विलुप्त झाले होते. या काळात रीगन यांना चतुर, व्यापक दृष्टी, साहसी सहकाऱ्यांची गरज होती. हे गुण त्यांचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज शुल्त्झ यांच्या ठायी पुरेपूर दिसून आले. अमेरिकी परराष्ट्रमंत्र्याच्या जबाबदाऱ्या व्यापक आणि भूमिका व्यामिश्र असते. तो एकाच वेळी अमेरिकेचा सर्वोच्च मुत्सद्दी असतो आणि त्याच वेळी अध्यक्षांचा परराष्ट्र व संरक्षण धोरण सल्लागारही असतो. त्या संघर्षजन्य कालखंडातही रीगन यांनी केवळ तीनदा बळाचा वापर केला, याचे श्रेय जॉर्ज शुल्त्झ यांचे. तत्कालीन सोव्हिएत महासंघाशी संबंध सुधारण्याकामी त्यांनी दाखवलेली तन्मयता आणि चिकाटी म्हणजे त्या काळी प्रवाहविरोधात पोहणेच होते. परंतु तत्कालीन सोव्हिएत अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह व रोनाल्ड रीगन यांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे कमी करण्याबाबत त्या दोन नेत्यांमध्ये झालेला ऐतिहासिक करार त्या प्रयत्नांची इतिश्री ठरली. १९८९मध्ये ते जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर काही महिन्यांनी जर्मन भिंत कोसळली आणि पुढे तर सोव्हिएत महासंघाचेही विघटन झाले. शीतयुद्ध संपवण्याचे श्रेय ज्या काही मोजक्या धुरीणांना दिले जाते, त्यांत शुल्त्झ अग्रणी. अशाच प्रकारे अथक प्रयत्न त्यांनी आणखी एक संघर्ष मिटवण्यासाठी केले. लेबनॉनमधील यादवी संपवण्यासाठी त्यांनी केलेल्या शिष्टाईमोहिमांचा रोख पुढे इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष संपवण्याकडे वळला. तो संपल्याशिवाय पश्चिम आशियात शाश्वत शांतता नांदणार नाही असे त्यांनी सांगून ठेवले. आज जगात अनेक संघर्ष नव्याने उफाळून येत असताना शुल्त्झ यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाची उणीव प्रकर्षांने जाणवते. ते परराष्ट्रमंत्री असताना ‘ही जबाबदारी आवडते की नाही’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर शुल्त्झ उत्तरले, ‘मी येथे मजा करायला आलेलो नाही’!