जुलै महिन्यात देशातील क्रीडा माध्यमे आणि दर्दीचे लक्ष प्रामुख्याने भारतीय क्रिकेट संघाकडे लागलेले असताना, हिमा दास या आसामच्या अ‍ॅथलीटने युरोपातील काही स्पर्धामध्ये सुवर्णपदके जिंकण्याचा धडाकाच लावला. भारतीय संघ काही सामने जिंकला, काही हरला. हिमा दासने तर महिन्याभरात पाच सुवर्णपदके जिंकून दाखवली. तरी तिची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धामध्ये हिमाने आतापर्यंत काही विक्रम प्रस्थापित केलेले असून, त्यामुळे या १९ वर्षीय युवतीकडून भविष्यात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाडसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांची आशा बाळगता येईल अशी परिस्थिती आहे. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतला राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातच फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील ४०० मीटर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावल्यानंतर हिमा पहिल्यांदा प्रकाशात आली होती. बुद्धिबळ, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी या प्रकारांमध्ये जागतिक ज्युनियर आणि सीनियर गटात भारतीयांनी सुवर्णपदके जिंकल्याची उदाहरणे आहेत; पण अ‍ॅथलेटिक्समध्ये हिमाच्या रूपाने प्रथमच भारतीय क्रीडापटूला एखाद्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. भारतात अ‍ॅथलीट्सची खाण म्हणून ओळखले जाणारे प्रदेश म्हणजे प्रामुख्याने पंजाब, केरळ, हरयाणा आणि काही प्रमाणात महाराष्ट्र; पण आसामसारख्या फारशी क्रीडा पाश्र्वभूमी नसलेल्या राज्यात हिमा उदयाला आली हे कौतुकास्पद आहे. आसाममधील धिंग जिल्ह्य़ात एका शेतकरी कुटुंबात हिमा जन्माला आली. धिंग जिल्ह्य़ात जन्माला आल्यामुळे हिमाला ‘धिंग एक्स्प्रेस’ म्हणून संबोधले जाते. शाळेत असताना ती मुलग्यांसह फुटबॉल खेळे. ‘फुटबॉलऐवजी धावण्यावर लक्ष केंद्रित कर,’ असा सल्ला तिला शाळेतील व्यायामशिक्षक शमसुल होक यांनी दिला आणि ‘धिंग एक्स्प्रेस’ने मार्ग बदलला! गेल्या वर्षी फिनलंडमधील कामगिरीमुळे तिचे नाव चर्चेत आले, तरी हिमाचा तोपर्यंतचा प्रवास कसा झाला याची कोणतीही माहिती माहितीजालावर उपलब्ध नाही. क्रिकेटेतर खेळांकडे दुर्लक्ष होते म्हणजे काय होते, याचे हे एक उदाहरण. ४०० मीटर्स स्पर्धेत आजवर आपल्याकडे पी. टी. उषाने भारताला काही महत्त्वाच्या स्पर्धा आणि एकदा तर जवळपास ऑलिम्पिक पदकही जिंकून दिले होते. हिमाची कामगिरी उषापेक्षा सरस होईल, असे तिची सध्याची लक्षणे सांगतात. ‘आदिदास’सारख्या जगद्विख्यात कंपनीने तिला पुरस्कृत केले असून अत्याधुनिक साहित्य आणि क्रीडा सुविधा तिला मिळतील, याची हमी दिली आहे. गेल्या वर्षी जाकार्ता आशियाई स्पर्धेमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवूनही हिमाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. त्याच वर्षी एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम शर्यतीत ती सहावी आली होती. हिमाची या महिन्यात नोंदवलेली पाचपैकी चार अजिंक्यपदे २०० मीटर प्रकारातील आहेत. या स्पर्धा ग्रांप्रि प्रकारातील होत्या. यापुढे तिच्यासमोर अधिक खडतर आव्हाने उभी राहतील. येत्या सप्टेंबर महिन्यात जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणे हे तिच्यापुढील प्रमुख आव्हान राहील. चेक प्रजासत्ताकात परवा ४०० मीटर प्रकारात अजिंक्य ठरताना हिमाने ५२.०९ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. जागतिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी किमान ५१.८० सेकंद अशी वेळ नोंदवावी लागते. प्रतिकूल परिस्थितीत हिमा येथवर आली आहे. तिला पुढील प्रवासात गरज पडल्यास परदेशी प्रशिक्षण, सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अ‍ॅथलेटिक्स संघटना, राज्य व केंद्र सरकार आणि देशी कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या आदिदाससारख्या परदेशी कंपनीने (हितसंबंध राखूनही) याबाबत पुढाकार घेतला आहे.