‘पुढारलेला जिल्हा’ असे बिरुद मिरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्य़ातच वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या व्हावी, याचा अर्थ केवळ आर्थिक सुबत्ता मिळून सामाजिक सुधारणा होत नाहीत, असा होतो. मुलीच्या प्रेम प्रकरणाचा संशय आल्यावरून वडिलांनी गळा दाबून खून करणे, मृतदेह घरातच लपवून ठेवून पोलिसांत ती हरवल्याची तक्रार करणे आणि नंतर नातेवाइकांच्या मदतीने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, हे सारेच निर्घृण आणि अमानुष आहे. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर ज्या नगर जिल्ह्य़ाने नव्या वाटा चोखाळल्या आणि ज्यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशातही वेगळे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली, त्याच नगर जिल्ह्य़ात पुन्हा पुन्हा असे प्रकार घडल्यामुळे समाज उलटय़ा दिशेने प्रवास करू लागला आहे की काय, अशी शंका येते. मुलीचे कोणावर तरी प्रेम असल्याने वडिलांना अनावर संताप होण्याचे दिवस संपले, असे वाटत असताना, पुन्हा तेच घडते. मुलीने पालकांचेच ऐकले पाहिजे. शिकली, सवरली, म्हणजे तिला शिंगे फुटतात, कुटुंबाची इभ्रत व्यक्तिगत स्वातंत्र्याहून अधिक महत्त्वाची असते, यासारखे विचार दूर फेकले जावेत यासाठी गेल्या अनेक शतकांमध्ये ज्या ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळींचा अपमान नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील चौंडी या गावी झाला आहे. नगर जिल्ह्य़ातील नेवासे हे वैचारिक चळवळीचे पहिले विद्यापीठ. समतेचा पुरस्कार स्वीकारू पाहणाऱ्या समाजाने, त्या काळातही मुक्ताबाईला संतपदाचा मान दिला. स्त्रीच्या आयुष्यात घडू शकणारे हे पुनरुत्थान एका नव्या सामाजिक विचारांची ज्योत होती, हेही नंतरच्या काळात सिद्ध झालेच. समाजात निम्म्या संख्येने असलेल्या स्त्रीला जगण्याचा, स्वतंत्रपणे विचार करण्याचा आणि तो कृतीत आणण्याचा अधिकार मिळावा, म्हणून एकोणिसाव्या शतकापासून अनेकांनी जे प्रचंड प्रयत्न केले, त्यालाही त्यापूर्वीपासून महाराष्ट्राच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली संतपीठांची वैचारिक परंपरा होती. अशा परिस्थितीत एखाद्या बापाने आपल्या मुलीचाच खून करावा, ही घटना केवळ हृदयद्रावक नाही. ती समाजातील पुरुषांच्या विचारांची दिशा दाखवणारीही आहे. कोणताही प्रश्न संवादाने सुटू शकतो, याचे भान नसले की संताप आवरता येत नाही. अशा अवस्थेत आपण आपल्याच मुलीचा गळा दाबतो आहोत, हेही लक्षात येत नाही. मुलीने कुटुंबाची प्रतिष्ठा सांभाळायची, तर वडीलधाऱ्यांचे ऐकायलाच हवे, अशी हुकूमशाही ज्या समाजातून हद्दपार होऊ शकत नाही, तेथे अशा घटना पुन्हा पुन्हा घडतच राहणार. समाजाचा विरोध असतानाही महात्मा जोतिबा फुले यांचा मुलींच्या पहिल्या शाळेचा हट्ट आणि त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महिलाश्रमासाठी करावी लागलेली धडपड महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचा पाया होती. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व मिळवून देणाऱ्या या घटना महाराष्ट्रातच घडू शकल्या. परंतु आज एकविसाव्या शतकातही त्याचे उलट पडसाद उमटताना दिसतात. कोणासही जन्माला येतानाच मिळालेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार अन्य कुणालाही- म्हणजे कुटुंबीयांनाही- नाही, हे सूत्र अजूनही तळापर्यंत पोहोचलेले नाही, असा चौंडीतील घटनेचा अर्थ. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात भरारी मारणाऱ्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याला नख लावणारी आणि खऱ्या अर्थाने समाज स्वतंत्र होत असतानाच्या काळात घडलेली ही घटना सतत घडत राहते, हे केवळ क्लेशकारकच नाही, तर सामाजिक पातळी दर्शवणारे आहे. आपण सुधारलो आहोत, या वल्गना किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते. म्हणून त्याचा निषेध करताना पुढील वाट किती काटेरी आहे, याची जाणीवही ठेवणे आवश्यक आहे.