कोविड-१९च्या उद्भवास कारणीभूत असलेल्या नॉव्हेल करोना विषाणूला रोखण्यासाठी उपलब्ध औषधांपैकी हमखास यशस्वी असे कोणतेही नाही. त्यामुळे या विषाणूविरुद्ध लस हाच एकमेव पर्याय असू शकेल. अशा लसी कधीच तात्काळ बनलेल्या नाहीत हा इतिहास आहे. मात्र करोनाबाबत सारी गणितेच पूर्णपणे विस्कटलेली दिसतात. वरवर पाहिल्यास हा एक प्रकारचा फ्लूच. परंतु त्याच्या अतिरिक्त संसर्गजन्यतेमुळे आणि विचित्र गुणधर्मामुळे तो जगभर वेगाने पसरत आहे आणि सामान्य फ्लूपेक्षा किती तरी अधिक बळीही घेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल तक्त्यानुसार, भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जगभर कोविडबाधितांचा आकडा २ कोटी ७० लाखांच्या आसपास स्थिरावला होता. ८ लाख ८० हजार बळी या रोगाने घेतले होते. कोविडबाधितांच्या बाबतीत भारत आठवडय़ाअखेरीस ब्राझीलला मागे सारत दुसऱ्या क्रमांकावर सरकला. देशात बाधितांची संख्या सोमवार सायंकाळपर्यंत ४२ लाखांवर पोहोचली होती आणि बळींचा आकडा ७१ हजारांच्या वर होता. ही आकडेवारी चिंताजनक खरीच. या निराशामय अवकाशात आशेचा किरण रशियाकडून दाखवला गेला. मॉस्कोतील गामालेया प्रयोगशाळेने तयार केलेल्या लसीच्या दोन टप्प्यांतील चाचण्यांमध्ये ७६ जणांत ‘तीव्र प्रतिकारशक्ती’ उत्पन्न झाल्याचे निष्पन्न झाले होते. या लसीविषयी प्रथम रशियाकडून घोषणा झाली, त्या वेळी स्वाभाविक संशय निर्माण झाला होता. कारण दर्जा आणि पारदर्शिता या दोन्ही निकषांवर अलीकडील रशियन संशोधन फार विश्वासार्ह नसते हे वारंवार दिसून आले आहे. मात्र, आता लॅन्सेट या प्रतिष्ठित नियतकालिकाने या चाचण्यांच्या वैधतेचा (पण अद्याप परिणामकारकतेचा नव्हे!) निर्वाळा दिल्यामुळे त्यांची दखल घेणे भाग पडते. रशियन लसीविषयी प्रमुख आक्षेप असा की, त्या केवळ दोनच टप्प्यांत घेतल्या गेल्या आणि तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच त्यांची घोषणा रशियन सरकारने करून टाकली! दोन टप्प्यांतील चाचण्यांसाठी वापरलेली नमुनेसंख्या हादेखील आक्षेपाचा ठळक मुद्दा. इतक्या अत्यल्प संख्येने मिळालेल्या प्रतिसादावरून कोटभर, लाखभर लोकसंख्येविषयी अंदाज कसा काय बांधायचा? तिसऱ्या टप्प्यात नैसर्गिक आणि दैनंदिन परिप्रेक्ष्यामध्ये लस टोचलेल्यांकडून विषाणूसंसर्गाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. कदाचित सध्या साऱ्यांनाच ‘काही करा पण लस आणा’ अशी घाई झालेली असल्यामुळे रशियन लसीची म्हणावी तितकी चिकित्सा झालेली दिसत नाही. तशात लॅन्सेटच्या अहवालामुळे या लसीसाठीच्या संभाव्य लाभार्थीमध्ये भारताचाही समावेश झालेला आहे. मात्र लॅन्सेटचाही अंदाज यापूर्वी चुकलेला होताच. शिवाय त्या -किंवा वैद्यकीय अभ्यासाच्या कोणत्याही- नियतकालिकाने अद्याप तरी ‘खुशाल वापरा लस’ असे काही म्हटलेले नाही. तेव्हा या लसीचे स्वागत सावधपणेच करावे लागेल. करोनाचे संकट अभूतपूर्व आहे. संबंधित विषाणू पूर्णपणे निराळा आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या विकासासाठीही काही वेळ द्यावाच लागेल. आजघडीला डझनाहून अधिक लसींवर प्रयोग सुरू आहेत. त्यातही विशेष दखल घ्यावी असे प्रयोग म्हणजे फायझर, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका आणि मोडेर्ना. या तिन्ही लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. भारतातही सिरम इंडिया (कोविशील्ड), भारत बायोटेक (कोवॅक्सिन) आणि झायडस कॅडिला (झेडकोव-डी) यांच्याकडून स्वतंत्रपणे लस विकसित केली जात आहे. ही लस विकसित होणे हा कोणत्याही शर्यतीचा किंवा राष्ट्राभिमान-राष्ट्रवादाचा भाग असू शकत नाही. ती विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांना वेळ आणि अवकाश दिला गेला पाहिजे. रशियन लस ही १८ ते ६० वर्षे वयोगटांतील तंदुरुस्त मंडळींसाठी सुरक्षित ठरली आहे. करोनाची शिकार ठरणारे बहुसंख्य जुन्या विकारांनी ग्रस्त असतात. त्यांच्याविषयी चाचण्या अजूनही दूर आहेत. अकाली जल्लोषामुळे त्यांची दिशाभूल होण्याची शक्यताच अधिक.