18 January 2021

News Flash

‘तेजस’चा प्रकाश..

भारतीय हवाई दलात ७३ लढाऊ आणि १० शिकाऊ अशा एकंदर ८३ ‘तेजस’ विमानांचा समावेश करण्याचा झालेला निर्णय हा अभिनंदनीय तर आहेच

 

भारतीय हवाई दलात ७३ लढाऊ आणि १० शिकाऊ अशा एकंदर ८३ ‘तेजस’ विमानांचा समावेश करण्याचा झालेला निर्णय हा अभिनंदनीय तर आहेच. शिवाय, भारतीय संरक्षण दलांसंदर्भात अनिर्णितता आणि अनिश्चितता यांनी ग्रस्त असलेले ‘अँटनी दशक’ अखेर २०२० उलटून गेल्यानंतर संपले, अशी ग्वाही २०२१ च्या प्रारंभी या निर्णयाने मिळाली आहे. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची कारकीर्द २००६ ते २०१४ अशी दीर्घ होती आणि याच काळात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने ‘तेजस’च्या निर्मितीला वेगही दिला होता. ‘उडत्या शवपेटय़ा’ म्हणून मिग विमानांची कुख्याती झाल्यानंतर ‘तेजस’सारखे विमान हवाई दलासाठी आवश्यकच होते. पण अँटनी यांच्या काळात संरक्षण खात्याने अनेक   बाबींवर निर्णयच घेण्याचे टाळले, तसेच या तेजस विमानांबाबतही झाले. अखेर नौदलाच्या विमानवाहू तुकडय़ांत ‘तेजस’चा समावेश करण्याचा निर्णय, २०१० सालात जाहीर झाला होता. प्रत्यक्षात ‘तेजस’साठी ‘कावेरी’ हे भारतीय इंजिनच वापरावे का, ते वापरल्यास कुणाच्या सहकार्याने बनवावे, फ्रेंच कंपनीचे साह्य त्यासाठी घ्यावे काय, हे सारेच मुद्दे २०११ अर्धे उलटले तरी अनिर्णितच राहिले होते. जगातील सर्वात लहान आणि वजनाने हलके  असे तेजस हे लढाऊ विमान अखेर नौदलासाठी तयार होऊ लागले, पण २०१५ मधील नवा राफेल करार आणि त्यानंतर खासगी कंपन्यांनाच संरक्षण उत्पादनात प्राधान्य देण्याची भूमिका या गदारोळात तेजसचा हा समावेश मागेच पडला आणि मग अवघ्या वर्षभरापूर्वी, १३ जानेवारी रोजी ‘आयएनएस विक्रमादित्य’वर ‘तेजस’ दिमाखात उतरले!  ‘तेजस’ची इथवरची गती मंद असली, तरी भारताला अभिमान वाटावा असेच हे विमान आहे. चौथ्या पिढीतील या विमानाचे वजन १२ टन  असून लांबी १३.२ मीटर आहे. स्वनातीत वेगाने ते मार्गक्रमण करते. बहुउद्देशीय मोहिमांसाठी ते प्रभावीपणे वापरता येईल. अतिशय चपळतेने हल्ला चढविण्याची त्याची क्षमता आहे. एक आसनी विमानात इंजिन देखील एकच आहे. तरीदेखील ते ताशी २२०० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करू शकते. हवाई युद्धासह टेहळणी, युद्धनौका विरोधातील कारवाईस सक्षम ठरेल, या दृष्टीने ते विकसित करण्यात आले आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर ते क्षेपणास्त्र, बॉम्बचा मारा करू शकते. विविध प्रकारच्या मिश्र धातूंचा वापर केल्यामुळे त्याचे वजन कमी करणे शक्य झाले आहे. या विमानाचे आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याचे पंख.  ते त्रिकोणी आहेत. तेजसला नेहमीच्या लढाऊ विमानांसारखा शेपटीचा भाग नाही. रडारवर त्याचे अस्तित्व अधोरेखित होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले. वैमानिकाला डिजिटल प्रणालीने संचालन करता येईल, अशी संपूर्ण व्यवस्था कार्यान्वित आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा, संगणकीय प्रणाली समाविष्ट आहे. शत्रूच्या विमानासह जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची पूर्वसूचना देणारे जे संवेदक विमानात बसविलेले आहेत ते भारतीय बनावटीचे आहेत, हेही विशेष . हवेत इंधन भरण्याची क्षमता असल्याने ते प्रदीर्घ काळ कार्यरत राहू शकते. अशा विमानाचा समावेश यापूर्वीच व्हावयास हवा होता. त्यामुळेच आता केंद्र सरकारच्या ‘संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समिती’ने   ४५,६९६ कोटी रुपये खर्चून एकंदर ८३ विमानांच्या खरेदीस मंजुरी दिल्याचे अप्रूप अधिक. एक विमान ५५० कोटी रुपयांहून महाग असल्याचे गणित कोणी करील, पण ‘राफेल’ची नवी किंमत सुमारे १६७० कोटी रुपये प्रत्येकी असल्याची वदंता (प्रत्यक्ष किंमत गोपनीय ठेवण्यात आलेली आहे) लक्षात घेता हा सौदा स्वस्तच आहे. ‘तेजस’चा प्रकाश २०२४ पर्यंत दिसेल, हे स्वागतार्ह आहेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:02 am

Web Title: article on indian air force includes 83 tejas aircraft abn 97
Next Stories
1 ‘विश्वधर्मा’चे विस्मरण
2 बायडेन येतायेता..
3 ‘अराजकीय’ अपेक्षा..
Just Now!
X