भारतात करोनाची दुसरी लाट रौद्रभीषण बनली असून, नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. रोजच्या वाढणाऱ्या बाधितांच्या आकड्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर तीव्र ताण पडत आहेच. शिवाय दैनंदिन मृतांच्या संख्येतही मोठी भर पडत असल्यामुळे अनेक नगर-महानगरांत अंत्यसंस्कार व्यवस्थाही तोकडी पडू लागली आहे. या अभूतपूर्व संकटाच्या परिस्थितीचा सामना धैर्य आणि विवेकाने करणेच आवश्यक. पण संकटामुळे भंबेरी उडालेले कित्येक जण विवेक गमावून बसतात. सध्या सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल गुंडाळावी, ही सूचनाही या प्रवृत्तीचे निदर्शक ठरते. आयपीएल प्राप्त परिस्थितीत नेमकी कोणत्या कारणासाठी गुंडाळावी, याविषयी विविध मतप्रवाह आहेत. देश शोकसागरात बुडालेला असताना यांना खेळ सुचतो कसा, हा एक आक्षेप. इतक्या मोठ्या संकटात अशा प्रकारे जल्लोषी कार्यक्रम गुंडाळलेलेच बरे, हा आणखी एक आक्षेप. मन शांत ठेवण्यासाठी चार घटका करमणूक करणे वा करवून घेणे पातकी ठरत नाही हे कळण्यापलीकडे गेलेली ही मंडळी. आयपीएल मोजक्या शहरांमध्ये प्रेक्षकांविना सुरू आहे. आयपीएलमध्ये सहभागी सारे खेळाडू आणि सहायकवृंद जैवसुरक्षेच्या परिघात (बायो बबल) वावरत असतात. म्हणजे त्यांच्याद्वारे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाही आणि त्यांना आपसांतही एकमेकांची बाधा होण्याची शक्यता नाही. प्रेक्षकच नसल्यामुळे कुंभमेळा किंवा निवडणुका यांच्यासारखी ही स्पर्धा बहुसांसर्गिकही ठरू शकत नाही. राहता राहिला मुद्दा नैतिकतेचा. ती कुणी ठरवायची आणि तिच्या सीमारेषा कोणत्या? नैतिक जबाबदारी ओळखून आयपीएलकर्ते आणि खेळाडूंनी स्वत:हून ही स्पर्धा थांबवायला हवी असा शहाजोग सल्ला द्यायला कुणाचे काय जाते? बाहेर करोनाकल्लोळ सुरू आहे म्हणून घरात दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पाहणे किंवा घरात गोडधोड आस्वादणे कुणी बंद करत नाही. आयपीएलच्या परिचालनाविषयी रास्त आक्षेप आहेत आणि ‘लोकसत्ता’ने त्यातील त्रुटी वेळोवेळी दाखवूनही दिल्या आहेत. रविचंद्रन अश्विनसारख्या क्रिकेटपटूंनी कुटुंबीयांसमवेत राहता यावे म्हणून माघार घेतली आहे. पॅट कमिन्ससारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने स्वयंस्फूर्तीने पंतप्रधान मदतनिधीला घसघशीत मदत देऊ केली आहे. आपल्या अब्जाधीश भारतीय क्रिकेटपटूंनी कमिन्सचा कित्ता गिरवण्यास काहीच हरकत नाही. परंतु अश्विन किंवा कमिन्सची कृती हा वैयक्तिक निवडीचा भाग झाला. त्यांचे अनुकरण किती जण करतात हा वेगळा मुद्दा. शिवाय आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धा या स्वतंत्र अर्थव्यवस्था असतात. त्यातून र्आिथक क्रियाकलापांच्या एका दीर्घ साखळीचा उद््भव होतो. या साखळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार अवलंबून असतात. युरोपात गेल्या वर्षीही करोनाचा कहर होता, त्या वेळी जर्मनीसारख्या देशांमध्ये सर्वप्रथम फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्याच. त्या वेळी करोनाकाळात फुटबॉल खेळण्याच्या नैतिकतेवर कोणी प्रश्न उपस्थित केले नव्हते. ‘आयपीएल बंद करून त्या मैदानांवर कोविडकेंद्रे उभारावीत’ अशीही सूचना होती. सध्याच्या हंगामात कधी तरी अचानक पाऊस सुरू झाल्यास मोठी गैरसोय होऊ शकते, त्यामुळे हा पर्याय हितावह नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई, चंडीगड, कोलकाता येथील फ्रँचायझींनी त्या-त्या शहरांमध्ये स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात भाग घेतला, तर त्याचे स्वागतच. पण अशा प्रकारचे करोनानिवारण वा मदतकार्य ही सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारांची जबाबदारी असते याचे विस्मरण या चर्चेत होता कामा नये. सद्य:स्थितीत आयपीएल बंद केल्याने करोनालेख नक्कीच घसरणार नाही. शिवाय ती सुरू राहिल्यामुळेच तो आणखी उसळेल अशीही शक्यता नाही. तेव्हा औटघटका करमणुकीचे नागरिकांना स्वातंत्र्य असते याचे भान ठेवल्यास आयपीएल सुरू ठेवण्यामागील नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होणार नाही.