चिनी व्हिवो कंपनीचे पाठबळ वर्षभरासाठी थांबल्यामुळे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) तात्पुरता पुरस्कर्ता शोधणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) क्रमप्राप्त होते. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर चकमक झाल्यापासून भारत-चीन संबंध ताणलेले आहेत. चीनला ‘अद्दल’ घडवण्यासाठी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे हा जालीम उपाय असल्याची भारतातील अनेकांची भावना आहे. त्यांची तळी उचलून केंद्र सरकारनेही टिकटॉकसारखी फुटकळ उपयोजने (अ‍ॅप्स), तसेच काही सरकारी कंत्राटांमधील चिनी सेवा व सामग्रीवर निर्बंध आणले. अशा रीतीने चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’ केल्याची फुशारकी सरकारातील काही धुरीणांनी मारली असली, तरी भारतातील नवउद्यमी डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये चीनचे अस्तित्व अजूनही ठळक आहे. ते पुसण्याची आपली क्षमता नाही आणि कदाचित इच्छाही नाही. या परिप्रेक्ष्यात आयपीएलचा यंदाच्या हंगामातील पुरस्कर्ता म्हणून ड्रीम इलेव्हन या कंपनीची झालेली निवड उद्बोधक ठरते. ही निवड झाली, कारण मूळ पुरस्कर्ता व्हिवो कंपनीचा करार २०२३पर्यंत असला, तरी यंदा चीनविषयी भारतीय जनमत अनुकूल नसल्यामुळे यंदाच्या वर्षी करारावर त्यांनी पाणी सोडले आहे. पाच वर्षांच्या करारान्वये बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये कबूल झाले होते. म्हणजे प्रत्येक वर्षी साधारण ४३९.८० कोटी रुपये. यंदाच्या वर्षी व्हिवोऐवजी ड्रीम इलेव्हनला आयपीएल पुरस्कर्ता म्हणून संधी मिळाली आहे. पण त्यांच्याशी झालेला करार २२२ कोटी रुपयांचाच आहे. स्पर्धा संयुक्त अरब अमिरातींमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान होत आहे. ड्रीम इलेव्हनचे आर्थिक पाठबळ ३१ डिसेंबपर्यंत आहे. पण मुद्दा असा, की चिनी कंपनी टेन्सेंट हीदेखील या ड्रीम इलेव्हनमध्ये एक प्रमुख गुंतवणूकदार आहे. म्हणजे चिनी आगळिकीबद्दल चिनी कंपनीचे प्रायोजकत्व नाकारायचे आणि अशा कंपनीला कंत्राट द्यायचे, जिच्यात चीनचाच गुंतवणूकदार आहे! या संपूर्ण साखळीतील दांभिकता ही प्रातिनिधिक आहे. तेव्हा येथून पुढे तरी चिनी वस्तू किंवा कंपन्यांवर बहिष्कार घालण्याचा फोलपणा वेगळ्याने चर्चेत येण्याची गरज उरत नाही. बाकी ड्रीम इलेव्हनविषयी किंवा आयपीएलविषयी फार वेगळ्याने लेखणी झिजवावी असे काही नाही. ड्रीम इलेव्हन ही फँटसी गेमिंग या प्रकारातली नवउद्यमी कंपनी. कारण तिच्यात सहभागी झाल्यावर आर्थिक लाभ किंवा नुकसान होत असते. तिचे संस्थापक दोन भारतीय तंत्रज्ञ आहेत. फँटसी गेमिंग म्हणजे खेळातील आडाख्यांच्या मागे दडलेली सुप्त सट्टेबाजीच. भारतात सट्टेबाजी अधिकृत नाही. इंग्लंडसारख्या देशांमध्ये तिला कायदेशीर अधिष्ठान आहे. तशी ती नसल्यामुळे दारूबंदीसारखीच सट्टाबंदीही भारतात निरुपयोगी ठरत आली आहे. म्हणजे बंदी असूनही अवैध सट्टय़ांमध्ये कोटीच्या कोटी उधळले जातात आणि त्या तुलनेत कारवायांचे प्रमाण फार नाही. सट्टेबाजी आणि सामनेनिश्चितीची वाळवी भारतीय क्रिकेटला काही वर्षांपासून पोखरत आहे. तेव्हा सट्टेबाजीविषयी नेमकी वैचारिक किंवा कायदेशीर बैठकच आपल्याकडे निर्माण होऊ शकलेली नाही. या संदिग्धतेचा फायदा घेऊन ज्या कंपन्या निर्माण झाल्या आणि फोफावल्या अशांपैकी एक म्हणजे ड्रीम इलेव्हन. त्यांनी भारतातील क्रिकेट, कबड्डी आणि अलीकडे फुटबॉलविषयी लोकप्रियतेचा फायदा घेतला. पण इतर नवउद्यमींप्रमाणे संकल्पना किंवा व्यवसाय प्रारूप यांबाबत ही कंपनी कोणतेच नावीन्य दाखवत नाही. सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार हा चीनच्या सरकारला धडकी भरवणारा राजमार्ग, या कल्पनारंजनात आपल्याकडील अनेकजण रममाण आहेत. या फँटसीमय वातावरणातच एका फँटसीमय क्रिकेट स्पर्धेसाठी फँटसीवर आधारित कंपनी प्रमुख प्रायोजक बनते, हा योग मात्र अपूर्वच!