अचाट बुद्धिमत्ता, प्रकांड विधिवेत्ता, राजकारणातील कौटिल्य, गूढ जीवनशैली.. अशा अनेक वलयांनी राम जेठमलानी यांचे ९५ वर्षांचे आयुष्य वेढलेले होते. वयाच्या १७ व्या वर्षी पाकिस्तानातील सध्याच्या सिंध प्रांतात कायद्याची पदवी संपादन करून त्याच वयात वकिलीच्या व्यवसायाचा परवाना मिळविण्यासाठी कायदेशीर लढा देणारे ते देशातील एकमेव वकील ठरले. १९४८ मध्ये फाळणीनंतर नेसत्या वस्त्रांनिशी भारतात येऊन निर्वासितांच्या छावणीत राहिलेल्या जेठमलानी यांनी फौजदारी वकिलीत स्वत:स बेफामपणे झोकून दिले आणि यशाचे शिखरही गाठले. उभा देश ज्या गुन्हेगारांबद्दल तिरस्कार व्यक्त करीत असे, त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडणारा हा वकील कायद्याच्या दृष्टीने श्रेष्ठ होता; पण सामान्य जनतेच्या नजरेत मात्र अनेकदा खलनायकही ठरला. न्याय देण्याचे काम न्यायालयाचे असते, एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही याचा फैसला वकील करू शकत नाही, अशा शब्दांत स्वत:च्या पेशाचा सफाईदार बचाव करीत जेठमलानी यांनी वकिलीच्या क्षेत्रावर आपले नाव कोरले. पण गुन्हेगारांच्या बचावाकरिता कायदेशीर बाजू बेमालूमपणे हवी तशी फिरविणाऱ्या या ‘फौजदारी’ कायदेपंडिताचे नाव देशाच्या न्यायव्यस्थेस दिशा देणाऱ्यांच्या यादीत मात्र सामील झाले नाही. परंतु कायदेतज्ज्ञ जेठमलानी आणि राजकारणातील जेठमलानी ही त्यांची दोन रूपे ठळकपणे समाजासमोर आली. इस्राएलचे खंदे समर्थक, बंगळूरुमधील विधि विद्यालयाचे संस्थापक, देशातील उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण लावून धरणारे निर्भीड वकील व कोणत्याही न्यायाधीशाच्या वयापेक्षा अधिक काळ वकिली क्षेत्रात वावरणारे विधिज्ञ अशा अनेक बाजूंनी त्यांचे जीवन वादग्रस्त होऊनही उजळलेले राहिले. आदरयुक्त दरारा असलेले हे व्यक्तिमत्त्व सामाजिक व कौटुंबिकदृष्टय़ाही सर्वसामान्यांकरिता एक गूढच होते. कोणत्याही राजकीय नेत्यास वावडे नसलेला राजकारणी व सर्वाधिक शुल्क घेणारा फौजदारी वकील अशी दोन रूपे राम जेठमलानी यांनी जाणीवपूर्वक जपली. भाजपचे खासदार, वाजपेयी मंत्रिमंडळातील कायदामंत्री, लोकसभा व राज्यसभेचे सदस्य.. अशा विविध भूमिकांतून राजकारणात वावरतानाही त्यांनी आपला वकिली पेशा आणि राजकीय निष्ठा यांची गल्लत कधीच होऊ  दिली नाही. त्यामुळेच राजकारणातला बंडखोर ही त्यांची प्रतिमा उत्तरोत्तर गडदच होत गेली. वादग्रस्तता आणि जेठमलानी या एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्या. काळा पैसा, प्रशासन, भ्रष्टाचार, काश्मीर, पाकिस्तान आणि चीन, मूलतत्त्ववाद, दहशतवाद अशा अनेक बाबींसंदर्भात कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची मते व भूमिका वादग्रस्त ठरल्या, तरी त्यांच्या दृष्टीने ती त्यांच्या पेशाशी असलेली इमानदारीच होती. हाजी मस्तान, शेअर घोटाळ्यातील हर्षद मेहता आणि केतन पारेख, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या हत्या कटातील आरोपींपासून अगदी अलीकडच्या काळात, लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे बुरखा फाटलेला संत आसाराम बापू, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेले राजकीय नेते आणि असंख्य गुन्हेगार जेठमलानींच्या चरणी लीन झालेले देशाने पाहिले. सर्वाधिक काळ भाजपसोबत राहूनही भाजपच्या विरोधात बंड उभारून दंड थोपटण्याचा परिणाम म्हणून पक्षाबाहेर गच्छंती झाल्यावर अरुण जेटलींच्या विरोधात केजरीवाल यांच्या बाजूने जेठमलानी न्यायालयात उभे राहिले. भाजपच्या वर्तुळाने जेठमलानींना फारसे स्वीकारले नव्हते; पण लालकृष्ण अडवाणींच्या लोभापोटी त्यांना थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाले, असे म्हटले जाते. राजकारणात दोन प्रवृत्तींच्या व्यक्तींना मोठे महत्त्व मिळते. एक संकटमोचक आणि दुसरे संकटदायक. जेठमलानी यांची तब्बल ७७ वर्षांची झंझावाती कारकीर्द पाहता, ते यातील दुसऱ्या वर्गाचे प्रतिनिधी होते, असेच म्हणावे लागेल.