05 July 2020

News Flash

बर्नी सँडर्स यांचा वारसा

२०१६ मध्येही डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरवण्याच्या लढतीमध्ये ते हिलरी क्लिंटन यांच्याकडून पराभूत झाले होते.

संग्रहित छायाचित्र

अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून गेले काही आठवडे सुरू असलेल्या द्वंद्वात बर्नी सँडर्स यांनी अपेक्षेनुसार हार पत्करली असून बुधवारी माघार घेत असल्याचे जाहीरही केले. मात्र अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षीय निवडणुकीच्या संदर्भात सर्वाधिक चर्चिले गेलेले पराभूत उमेदवार म्हणून बर्नी सँडर्स ओळखले जातील हे नक्की. ‘पराभूत उमेदवार’ हे काही रूढार्थाने अभिमानास्पद बिरुद नव्हे. २०१६ मध्येही डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरवण्याच्या लढतीमध्ये ते हिलरी क्लिंटन यांच्याकडून पराभूत झाले होते. गंमत म्हणजे त्या वेळी सत्तरी ओलांडलेली असूनही सँडर्स यांना सर्वाधिक पाठिंबा युवा डेमोक्रॅट मतदारांकडून मिळत होता. तो कल यंदाही कायम राहिला. अमेरिकी समाजात, अर्थव्यवस्थेत, शिक्षण व्यवस्थेत असलेल्या विषमतेवर त्यांनी नेहमीच घणाघाती हल्ला चढवला. ते स्वतला पहिल्यापासून ‘समाजवादी डेमोक्रॅट’ मानतात. ‘समाजवादी’ ही शिवी समजल्या जाण्याच्या सध्याच्या युगात आणि जगात असे म्हणवून घेणे म्हणजे धाडस आणि अपराधच. पण झुंडीच्या राष्ट्रवादावर, धर्मवादावर समाजवादाचीच मात्रा लागू होऊ शकते हे ते सांगत राहिले. अमेरिकेत सध्या करोना विषाणूने थैमान घातले असून, शेकडोंनी मृत्यू होत आहेत. ‘अशा वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आश्वासक कवच अधिकाधिक सर्वसामान्यांना मिळाले असते, तर लोक मोठय़ा संख्येने चाचण्या करून घेण्यासाठी सरसावले असते,’ असे काही विश्लेषक पहिल्यापासून सांगत आहेत. असे कवच मिळण्यासाठी सँडर्स यांनी नेहमीच प्रचार केला. मोफत महाविद्यालयीन शिक्षण, किमान वेनतनवाढ आणि अतिश्रीमंतांवर अधिक करभार या मुद्दय़ांवर सँडर्स ठाम होते. त्याचबरोबर, पर्यावरण आणि वातावरण बदलावर त्यांनी घेतलेली भूमिका ट्रम्प यांच्या भूमिकेपेक्षा कित्येक पटींनी प्रगल्भ आणि जबाबदार होती. परंतु २०१६ प्रमाणेच यंदाही निश्चित असा एकगठ्ठा मतदार उभा करण्यात सँडर्स कमी पडले. त्यांनी न्यू हॅम्पशायर आणि नेवाडातील पक्षांतर्गत फेऱ्या (प्रायमरीज) जिंकून सुरुवात धडाक्यातच केली होती. नंतरच्या काळात मात्र त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांनी एकामागोमाग एक राज्ये पदरात पाडून मोठी आघाडी घेतली. ३ मार्च रोजी अनेक राज्यांमध्ये झालेल्या प्रायमरीजमध्ये (सुपर टय़ूसडे) १३ पैकी ९ राज्यांमध्ये बायडेन यांनी बाजी मारली. नंतर फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना आणि इलिनॉय ही राज्येही जिंकली. सँडर्स यांची उमेदवारी जवळपास संपुष्टात आल्याचीच ही लक्षणे होती. महाविद्यालयीन विद्यार्थी ही सँडर्स यांची ताकद त्यांचा कमकुवत दुवाही ठरली. कारण हा वर्ग अजूनही मोठय़ा संख्येने मतदानाला उतरत नाही. आफ्रिकन अमेरिकन समुदायाकडून सँडर्स यांना मोठय़ा अपेक्षा होत्या. त्यांच्याकडूनही पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही. अर्थात बर्नी सँडर्स यांच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष अधिक ‘डावीकडे’ झुकला यावर बहुतेक राजकीय निरीक्षकांचे मतैक्य बनले आहे. सँडर्स यांची भारताविषयीची मते सध्याच्या सरकारसाठी प्रतिकूल ठरली होती. त्यामुळे त्यांच्या माघारीमुळे येथील अनेकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अर्थात सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, वांशिक न्याय, पर्यावरणीय न्याय हे त्यांनी मांडलेले मुद्दे येथीलही असंख्य जणांना जिव्हाळ्याचे वाटणारच. डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचारापलीकडे जाऊन सँडर्स यांनी एका चळवळीचा नारा दिला. ही चळवळ एक दिवस क्रांती बनेल, असा आशावाद ते व्यक्त करत. सलग दुसऱ्यांदा हा आशावाद फोल ठरला असे ठामपणे म्हणता येत नाही. ‘न्यायासाठी लढा यासाठीच आपली चळवळ आहे,’ हे वाक्य पराभव जाहीर करताना त्यांनी वर्तमानकाळासारखे वापरले आहे. हे शब्द अमेरिकेची सीमा ओलांडून असंख्यांच्या हृदयाला भिडतात, हे सँडर्स यांचे यशच मानावे लागेल. तोच त्यांचा वारसा ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:02 am

Web Title: article on legacy of bernie sanders abn 97
Next Stories
1 इयत्ता सुधारणार कधी?
2 ‘विनंती’स मान देऊन..
3 भेदभावाचा वणवा..
Just Now!
X