News Flash

पळवाटा आणि चोरवाटा

ऑस्ट्रेलियात मेलबर्नस्थित भारतीय वंशाच्या सट्टेबाजांनी क्रिकेटचे नव्हे, तर टेनिसचे सामने निश्चित करण्याची करामत केली

संग्रहित छायाचित्र

 

खेळाडूंच्या संगनमताने सामनेनिश्चिती आणि सट्टेबाजी करणे हा क्रीडा क्षेत्राला लागलेला कलंक अजूनही पुसला जाण्याची चिन्हे नाहीत. गेल्या दोन दशकांमध्ये या क्षेत्राचा विस्तार अचंबित आकाराने आणि वेगाने झालेला आहे. परंतु सट्टेबाजांना रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्याची इच्छाशक्ती आणि तत्परता क्रीडा संघटनांनी दाखवलेली नाही. ऑस्ट्रेलियात मेलबर्नस्थित भारतीय वंशाच्या सट्टेबाजांनी क्रिकेटचे नव्हे, तर टेनिसचे सामने निश्चित करण्याची करामत केली आणि ती नुकतीच उघडकीस आली. हरसिमरत सिंग आणि राजेश कुमार अशी या प्रकरणी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी इजिप्त आणि ब्राझील येथील दुय्यम टेनिस स्पर्धामध्ये काही टेनिसपटूंशी संधान बांधून सामन्यांचे निकाल निश्चित केल्याचा आरोप आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, या दोघा सट्टेबाजांचा म्होरक्या रविंदर दंडीवाल हा भारतात राहतो आणि त्याला कुणी काही करू शकत नाही! कारण तो भारतीय क्रिकेट मंडळाच्या निशाण्यावर असला, तरी आजवरच्या कोणत्याही सामनेनिश्चिती प्रकरणात त्याचा ‘सक्रिय सहभाग’ आढळलेला नाही. तरीदेखील नेपाळ आणि हरियाणात फुटकळ टी-२० साखळी स्पर्धा आयोजित करणे, ऑस्ट्रेलियातील एका टी-२० स्पर्धेसाठी तरुणांना तेथे पाठवण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात बेकायदा स्थलांतरित तेथे धाडणे अशा अनेक उद्योगांमध्ये तो गुंतलेला होता. स्वतची ओळख इंडियन क्रिकेट कौन्सिलचा सरचिटणीस, क्रिकेट प्रीमियर लीगचा अध्यक्ष अशा प्रकारे तो समाजमाध्यमांवर करून देतो. बीसीसीआयच्या बोधमुद्रेमध्ये फेरफार करून तीदेखील वापरतो. तरीदेखील थेट कोणत्याच प्रकरणात आढळला नसल्यामुळे बीसीसीआय केवळ त्याच्यावर लक्ष ठेवून असते. जगभर क्रिकेटमधील सामनेनिश्चिती प्रकरणांमध्ये आढळलेला एक समान दुवा म्हणजे, बहुतेकदा सट्टेबाज भारतीय किंवा भारतीय वंशाचा आढळून आला आहे. सट्टेबाजी भारतात बेकायदा आहे. किंबहुना त्यामुळेच, सट्टेबाजीची एक मोठी समांतर अर्थव्यवस्था भारतात बांडगुळासारखी फोफावलेली आहे. दंडीवालसारख्यांपासून दूर राहावे, अशी प्रबोधनपर चित्रफीत बीसीसीआय ज्युनियर क्रिकेटपटूंना दाखवत असते. तिकडे ऑस्ट्रेलियात आता दंडीवालविरोधात पुरावाच आढळल्यामुळे त्याची तेथे पाठवणी होणार का, हा प्रश्न आहे. टेनिसमध्ये २०० खालील क्रमवारी असलेल्यांकडून सामनेनिश्चितीसाठी सट्टेबाजांना साथ मिळाल्याचे अनेक पुरावे यापूर्वी आढळले होते. पण वलयांकित टेनिसपटूंचे वर्तनही काही वेळा संशयास्पद आढळून आले होते. या संदर्भात एक उदाहरण दखल घ्यावे असेच. २००७ मध्ये निकोलाय डाविडेन्को या त्यावेळच्या चौथ्या मानांकित टेनिसपटूने एका स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत अर्जेटिनाच्या एका बऱ्याचशा अपरिचित टेनिसपटूविरुद्ध माघार घेतली. या सामन्यात डाविडेन्को हरणार यावर प्रचंड प्रमाणात (जवळपास दसपट) पैजा घेण्यात आल्याचे बेटफेअर या ब्रिटिश कंपनीच्या लक्षात आले. काही तरी काळेबेरे आहे असा संशय येताच बेटफेअरने ती पैजच रद्द केली. पण डाविडेन्को किंवा त्याच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध त्या वेळी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना काहीच सिद्ध करू शकली नाही, त्यामुळे कारवाईही झाली नाही. आता टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेचे टेनिस इंटेग्रिटी युनिट किंवा बीसीसीआय, आयसीसीची भ्रष्टाचारविरोधी पथके संशयितांवर पाळत ठेवण्यापलीकडे फार काही करू शकत नाहीत. सट्टेबाजी, सामनेनिश्चितीच्या पळवाटा आणि चोरवाटा ही पथके हुडकून काढू शकतात; पण त्यांच्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी यांच्याकडे फारच मर्यादित अधिकार आहेत. खरे तर या अजस्र समांतर यंत्रणेला वेसण घालण्यासाठी कायद्यांमध्ये कालसुसंगत बदल, पोलीस यंत्रणेला अधिक अधिकार, क्रीडा संघटनांचे उत्तरदायित्व अशा अनेक घटकांचा विचार झाला पाहिजे. अन्यथा क्रीडा क्षेत्राच्या आणि क्रीडापटूंच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न अधिक सातत्याने उपस्थित होऊ लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:02 am

Web Title: article on melbourne police alleged two indian man of a major international tennis match fixing abn 97
Next Stories
1 केंद्राचा हस्तक्षेप कशासाठी हवा?
2 दहशतवादी राष्ट्रधोरणाचा फटका!
3 चीनविरोधास ‘आसिआन’चे बळ!
Just Now!
X