News Flash

कामगारशक्तीचा दुर्दम्य रेटा

शरीरयष्टी, आवाज, देहबोली कशाही अंगाने इस्वलकरांकडे पाहून त्यांना लढाऊ कामगार नेता म्हणता येत नसे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईचा दक्षिण-मध्य भाग अर्थात लब्ध-प्रतिष्ठांचा ‘सोबो’ हा निवासाचा पत्ता कधीकाळी ‘गिरणगाव’ म्हणून ओळखला जात होता. व्यापारनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या आधुनिक मुंबईच्या विकासात येथील कापडगिरण्या आणि त्यात राबणाऱ्या कामगारांचे योगदान इतिहासानेही समर्पकपणे नोंदविले आहे. मात्र समाजाच्या विकासात मोठा वाटा असणाऱ्यांनाच पुढे अस्तित्वाची लढाई लढावी लागते, असाही एक इतिहास असतो. अशा इतिहासातील एक न टाळता येणारे नाव म्हणजे दत्ता इस्वलकर. इस्वलकर यांचे जाणे हे मुंबईत दीडशे वर्षे फुललेल्या औद्योगिक-सामाजिक संस्कृतीच्या कबरीवर अर्पण केले गेलेले शेवटचे फूलच ठरावे. कामगार हतप्रभ, गिरणी उद्योग आणि पर्यायाने रोजगाराची वाताहत झालेली, असा पराभवाचा शिक्का बसलेल्या -किंबहुना संपवून टाकलेल्या- सैन्याला पुन्हा लढण्याच्या ईर्षेने उभे करणे सोपे काम नव्हते. दत्ता इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अवघड काम केले. गिरण्या जरी बंद पडल्या असल्या तरी कामगार जिवंत आहे. त्याला जिवंत करणारे प्राण त्यांनी भायखळ्याच्या न्यू ग्रेट गिरणीसमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणातून फुंकले. राष्ट्र सेवा दल अर्थात साने गुरुजींच्या विचारांचे संस्कार असल्याने इस्वलकरांच्या हाती नेतृत्व असलेल्या ‘बंद गिरणी कामगार संघर्ष समिती’च्या लढ्याची हत्यारेही उपोषण, सत्याग्रह, मोर्चे अशीच होती. शरीरयष्टी, आवाज, देहबोली कशाही अंगाने इस्वलकरांकडे पाहून त्यांना लढाऊ कामगार नेता म्हणता येत नसे. पण माणसे जोडण्याच्या कसबाने मिळविलेले कामगारांमधील साधेच पण असाधारण सोबती, असीम चिकाटी आणि गमावण्यासारखे काहीच नसल्याने जिवाच्या तडफेने सुरू ठेवलेला आंदोलनाचा रेटा हे इतर नेत्यांमध्ये अभावानेच दिसणारे गुण त्यांच्याकडे होते. १९८८-८९चा तो काळ. मुंबईतील गिरण्यांच्या ६०० हेक्टर जमिनीवरील साम्राज्यासाठी गिरणी मालक, बिल्डर, विकासक असे सारेच राजकारणी आणि अंडरवल्र्डच्या टोळीवाल्यांना हाताशी धरून बाजी लावत होते. या चढाओढीत कामगार दुर्लक्षिला जाणार नाही, हे इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशक-दीड दशकभर नेटाने चालविलेल्या लढ्याचे फलित म्हणता येईल. मुळात गिरणी कामगाराला उद्ध्वस्त कोणी केले? दत्ता सामंत यांच्या गरजेपेक्षा खूप ताणलेल्या संपाने? की  ‘करा कष्ट, व्हा नष्ट, म्हणा जय महाराष्ट्र’ म्हणत संप फोडणाऱ्यांनी? नवीन विकास नियंत्रण नियमावलीने गिरण्यांच्या जमिनीला अवाच्या सवा मोल मिळवून देणाऱ्या राज्यकत्र्या, धोरणकत्र्यांनी? असे प्रश्न विचारण्याचे धाडस हे त्या आंदोलनाने केले. गिरण्यांच्या जमिनीवर कुणी कुणी हात साफ केले, त्यात मराठीचे कैवारी आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे पाईकही कोण व कसे आहेत, याचीही मग चर्चा झाली. मुंबईवर राज्य असणाऱ्या गिरणी कामगाराचाच शहरी विस्थापित म्हणून अस्तित्वाचा लढा सुरू झाला. इस्वलकर यांनी ‘गिरणी चाळ भाडेकरू कृती समिती’च्या लढ्यातही मग उडी घेतली. गिरण्यांच्या जागेवरच मग सर्वच नव्हे तरी किमान ६० हजार गिरणी कामगारांना घरे दिली जातील, असा निर्णय सरकारला घ्यावा लागला. बंद पडलेल्या उद्योगात कामगाराच्या हक्काचीही मोजदाद व्हावी, हे या आंदोलनाचे अजोड यशच. इस्वलकर यांचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे त्यांनी प्रवीण घाग, किसन साळुंखे, कॉम्रेड विठ्ठल घाग, मीरा मेनन, नीरा आडारकर, प्रवीण येरुणकर वगैरे डाव्या, अति डाव्या, समाजवादी अशा वेगवेगळ्या विचार प्रवाहांतील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलनाला एकजीव ठेवले. या आंदोलनांमुळे अनेक प्रकारच्या खटल्यांचा पाठलाग त्यांच्यामागे अगदी आजारपणातही सुरूच होता. पिचलेल्यांचा लढा सोपा नसतो याची जाणीव करून देणारा हा आणखी एक पैलू त्यांनी हयातभर अनुभवला. त्यांच्या जाण्याने कामगारांच्या लढ्यातील प्रामाणिक, समर्पित, जिद्दी बाणाही आपण हरवून बसलो आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:02 am

Web Title: article on mill workers leader datta iswalkar passes away abn 97
Next Stories
1 आश्वासकतेमागील किंतु
2 मानापमानाने काय साधणार?
3 आश्वासक आणि व्यवहार्य
Just Now!
X