स्पेस एक्स या खासगी कंपनीने अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) दोन अंतराळवीरांना जवळपास दोन महिने अंतराळाची सफर घडवून आणणे, हा या मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. इलॉन मस्क या अत्यंत तऱ्हेवाईक परंतु कल्पक आणि अतिश्रीमंत उद्योगपतीची मालकी असलेली ‘स्पेस एक्स’ ही मानवाला अंतराळ सफर घडवून आणणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे. २००१ मध्ये त्यांनी ही कंपनी स्थापली तेव्हा या कंपनीचे उद्दिष्ट नजीकच्या भविष्यात मंगळावर मानवी वसाहती उभारण्याचे राहील, असे ते म्हणाले होते. या दाव्यातील अतिशयोक्त वेडगळपणा त्या वेळी अनेकांनी दाखवून दिला, तरी मस्क हार मानणाऱ्यांतले नाहीत. अनेक तंत्रज्ञान किंवा विज्ञानाधारित संकल्पना प्रथम व्यक्त केल्या गेल्या, तेव्हा वेडगळच भासलेल्या होत्या याकडे ते लक्ष वेधतात. विद्युत मोटारी बनवणारी जगातील अग्रणी टेस्ला कंपनी मस्क यांचाच आणखी एक आविष्कार. आपण निव्वळ पोकळ स्वप्नरंजन करणाऱ्यांतले नाही हे त्यांनी प्रस्तुत अंतराळ मोहीम यशस्वीरीत्या राबवून दाखवून दिले. क्रू ड्रॅगन नामक खास बनवलेल्या कुपीतून रॉबर्ट बेन्केन आणि डग्लस हर्ले हे नासाचे अंतराळवीर ३१ मे रोजी अंतराळात झेपावले. अंतराळ स्थानकात जवळपास दोन महिने व्यतीत केल्यानंतर गेल्या शनिवारी दोघे परतीच्या प्रवासाला- पृथ्वीकडे निघाले. हे दोघे, नासा आणि त्याहीपेक्षा अधिक स्पेस एक्सच्या दृष्टीने हा कसोटीचा काळ होता. अंतराळात कुपीचा वेग ताशी १७५०० मैल इतका प्रचंड होता. पृथ्वीच्या वातावरणात फेरप्रवेशाच्या वेळी तो ताशी ३५० मैल इतका झाला आणि मेक्सिकोच्या आखातात, फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर कुपी समुद्राच्या पाण्यात उतरली, त्या वेळी हा वेग अवघा ताशी १५ मैल इतका कमी झाला. फेरप्रवेशाच्या वेळी बाह्य़तापमान १९२७ अंश सेल्शियस इतके प्रचंड होते. ही स्थित्यंतरे क्रू ड्रॅगनने व्यवस्थित झेलली. ४५ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारे नासाचे अंतराळवीर समुद्रात उतरवले गेले. तर २०११ नंतर प्रथमच अमेरिकी भूमीवरून नासाच्या अंतराळवीरांनी उड्डाण केले होते. त्यानंतर ‘स्पेस शटल’ कार्यक्रम गुंडाळण्यात आल्यामुळे नासाच्या पुढील अंतराळ मोहिमांसाठी रशियाची मदत घेतली जात होती. अंतराळ मोहिमांचे, प्रवासाचे व्यापारीकरण आता दूर नाही हे स्पेस एक्सच्या या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. नासानेही व्यापारीकरणावर भर द्यायचा ठरवला असून, येथून पुढे नासा पुरवठादाराच्या नव्हे, तर ग्राहकाच्या भूमिकेत दिसणार आहे. खासगी मोहिमा आखण्यासाठी नासाने २०१४ मध्ये स्पेस एक्स आणि बोइंग या कंपन्यांना मिळून जवळपास ८०० कोटी डॉलर दिले. पण हवाई उड्डाण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असूनही या शर्यतीमध्ये बोइंग मागे पडली आणि स्पेस एक्ससारख्या नवख्या कंपनीने तूर्त बाजी मारलेली दिसते. उद्यमशीलतेस पोषक वातावरण असल्यामुळेच हे घडले आहे. या व्यापारीकरणाच्या शर्यतीत आता अमेरिकेपाठोपाठ रशिया, चीन, युरोपीय महासंघ, आखाती देश हेही लवकरच उतरतील. अद्यापही हा प्रचंड महागडा खेळ दिसतो. त्यामुळे त्यात अतिधनाढय़ांचीच मक्तेदारी राहणार हे उघड आहे. आपल्याकडे भारतातही अतिधनाढय़ांची वस्ती आहेच. शिवाय अंतराळ संशोधनातही आपण जगाच्या फार मागे नाही आणि महत्त्वाकांक्षेची येथे अजिबात वानवा नाही. तेव्हा उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासारखीच एखादी व्यापारपेठ येथेही विकसित होऊ शकते. या शक्याशक्यतांची चर्चा होतच राहील. सध्या तरी प्रस्तुत अवकाश मोहिमेच्या यशस्वी सांगतेबद्दल नासा, स्पेस एक्स यांचे अभिनंदन करणे योग्य ठरेल.