जम्मू आणि काश्मीर राज्याला घटनेच्या ३७०व्या कलमानुसार असलेले विशेषाधिकार रद्द करून त्याचे विभाजन करण्याचा निर्णय मोदी सरकारने गेल्या ५ ऑगस्टला मंजूर करवून घेतला. याला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्याच दिवशी राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा थाटात होणार असल्याचे जाहीर झाले आहे. राम मंदिराच्या मुद्दय़ावर जनमत तयार करण्यात १९९०च्या दशकात भाजपला यश आले आणि त्यातूनच  ‘मंदिर वही बनाएंगे’ हा नारा देत पक्ष सत्तेवर आला. मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्यावर राम मंदिर उभारणीवर भर दिला. सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल हवा तसा  लागल्याने सारे अडथळे दूर झाले. आता पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मंदिराची पायाभरणी होणार आहे. त्यामुळे आगामी  लोकसभा निवडणुकीच्या आधीच अयोध्येत राम मंदिर उभारण्याची भाजपची योजना बहुधा पूर्णत्वास जाईल, असे  चित्र दिसते. अशा वेळी  ‘राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येणार असल्यास खुशाल मंदिराचे भूमिपूजन करावे,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार करतात तेव्हा त्यांच्या हेतूविषयी प्रश्न निर्माण होतो. राम मंदिराचा मुद्दा मुळात निर्माण झाला तो ‘धर्मनिरपेक्ष’ काँग्रेसच्या राजीव गांधी यांच्यामुळे. त्या वेळी  पवार आपल्या काँग्रेस घरवापसीच्या  प्रयत्नात होते.  त्या वेळी त्यांनी राजीव गांधी यांना अयोध्येतील मंदिराचे दरवाजे उघडू नका, असा सल्ला दिल्याचे ऐकिवात नाही. त्याच वेळी शाहबानो प्रश्नावर राजीव गांधी यांनी राज्यघटनेची पायमल्ली करणारी जी भूमिका घेतली, त्याचाही निषेध कधी पवार यांनी केल्याचे दिसले नाही.  नंतर ६ डिसेंबर १९९२ अयोध्येत जे काही झाले त्यावेळी पवार हे नरसिंह राव यांच्या सरकारात आणि काँग्रेसमध्येही होते. त्याही वेळी त्यांनी राव यांच्या निष्क्रियतेचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. धर्मनिरपेक्षतेवर ओरखडा आणणाऱ्या त्या घटनेनंतरही पवार यांना काँग्रेसच जवळची होती. या सगळ्यामागील दुटप्पीपणाचा फायदा उठवत भाजपने राम मंदिराचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला आणि यश मिळवले. हे जसे भाजपचे यश आहे तसेच ते पवार आणि अन्य अनेक काँग्रेसींचे अपयश आहे. जनतेने या मंडळींना नाकारले कारण या सर्वाची धर्मनिरपेक्षता बेगडी आहे असे वाटल्यामुळे. ती तशी नाही हे सिद्ध करण्याची संधी या नेत्यांना साधता आलेली नाही. अशावेळी राम मंदिराची पायाभरणी आणि करोना यांची सांगड घालण्यात काय शहाणपणा?   करोनाकाळात बकरी ईद साधेपणाने साजरी करा, असे आवाहन पवारांनी केल्याचे ऐकिवात नाही. राज्याच्या सत्तेतील त्यांचे एकतृतीयांश सहकारी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यानंतरही  अयोध्येस जाऊन आले. शिवसेनेची भूमिका कायमच राममंदिराच्या बाजूने राहिली आहे.  उद्या या मंदिराच्या भूमीपूजन समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले तर पवार त्यांचाही निषेध करून सत्ता सोडणार काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच करोनाच्या वातावरणात आषाढी एकादशीला  पंढरपुरास गेले. त्यावेळी पवारांनी हा संबंध जोडला काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत आणि हे पवार यांनाही ठाऊक आहे. तरीही अशा विषयावर भाष्य टाळण्याचा मोह त्यांना आवरत नाही, हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. या आणि अशा निवडक धर्मनिरपेक्षतेमुळेच देशात धार्मिकता फोफावली हे आता तरी या मंडळींनी लक्षात घेऊन सर्रावसमावेशक राजकारण करावे. अन्यथा हे पक्ष असेच कालबा होत राहतील.