डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले गुज सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या निर्मलाताई पुरंदरे यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील समस्यांशी स्वत:ला बांधून घेतले होते. स्वत:च्या पायावर उभे राहता येते, याबद्दल खात्रीच नसलेल्या हजारो महिलांत त्यांनी आत्मविश्वास जागविला. आयुष्यभर पायाला भिंगरी लावल्यागत राज्यभर फिरणाऱ्या निर्मलाताईंना जगण्याच्या अनेक क्षेत्रांबद्दल कमालीची असोशी होती. लेखन, वाचन, संपादन, प्रकाशन, साहित्य, कला, समाजकारण अशा अनेक विषयांत त्यांना कमालीचा रस होता. त्यापैकी अनेक क्षेत्रांत त्यांनी मनसोक्त मुशाफिरीही केली; पण तरीही आपल्या जगण्याचे ध्येय म्हणून ज्या क्षेत्रांची निवड केली, त्यात पूर्णत्वाने स्वत:ला झोकून दिले. ‘वनस्थळी’ हे त्यांचे घरच. तिथे राहून त्यांनी इतक्या जणींच्या आयुष्यात हिरवे गालिचे फुलवले की, त्याने त्या महिलांच्या जगण्याचा पैसच बदलून गेला. अशी कामे करताना लागणारे सातत्य निर्मलाताईंच्या ठायी होते. ध्यासाच्या पूर्ततेचे क्षण क्षणिक असतात, पण ते समाधानाचे असतात. निर्मलाताईंच्या आयुष्यात हे समाधान पसरून राहिले. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या फिरस्त्या शिवशाहिराचा संसार सांभाळत, स्वत:ला उलगडत नेताना निर्मलाताईंनी खूप खस्ता खाल्ल्या. अच्युतराव आपटे यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याला त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले आणि ‘वनस्थळी’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना तेथील विद्यार्थ्यांनाच बालवाडय़ा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण ही संस्था देऊ लागली. सुटीच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन, फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनची स्थापना, ग्रामीण भागातील बालवाडय़ांमधील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, शालाबाह्य़ युवकांसाठी सुतारकाम आणि प्लम्बिंगच्या प्रशिक्षणाचे वर्ग, अशा अनेक प्रकारे निर्मलाताई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेली पाच दशके कार्यरत राहिल्या. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठीचे विविध उपक्रम आखणे हा त्यांच्या कार्यातील अविभाज्य भाग. हे सारे करत असताना आपण काही वेगळे, मोठे करत आहोत, याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नसे. जगातल्या अनेक देशांशी नाते जोडून कार्यविस्तार साधण्यासाठी त्यांच्यापाशी जे बळ होते, संवादकौशल्याचे. पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेण्याची हातोटी आणि समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता यामुळे अनेकांच्या आयुष्यात आत्मविश्वासाची पहाट उगवली. प्रसिद्धीच्या वलयाची पुरेपूर जाणीव असूनही त्यापासून दूर राहण्यात त्या यशस्वी ठरल्या. वृत्तपत्रांत छायाचित्रे छापून येण्यासाठी आपण काम करता कामा नये, यावर त्यांचा सतत भर असे. ‘माणूस’ या मराठीतील एके काळच्या महत्त्वाच्या साप्ताहिकात दोन दशके संपादकीय काम केल्यामुळे नजर विस्फारणे स्वाभाविक होते. निर्मलाताईंनी त्या वैचारिक अधिष्ठानाला प्रत्यक्ष कामाचीही जोड दिली. भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सुरू झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स’ या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या. पुण्यभूषण, बाया कर्वे पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळूनही त्याकडे निर्लेपपणे पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवत असे. काय मिळाले, किती गमावले, याचा हिशेब मांडत बसण्यापेक्षा काम करत राहणे अधिक श्रेयस्कर वाटणाऱ्या निर्मलाताईंच्या निधनाने एक आदर्श समाजव्रती आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख वाटतच राहणार!