26 October 2020

News Flash

स्पष्टवक्ते जसवंतसिंह

भारतीय लष्करात मेजर ते राजकारणी असा त्यांचा प्रवास.

(संग्रहित छायाचित्र)

भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, केंद्रीय अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण अशी महत्त्वाची खाती भूषविलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर चोहोबाजूने टीकेचा भडिमार होत असताना आपल्या कौशल्याने देशाची प्रतिमा उंचाविण्यात यशस्वी ठरलेल्या जसवंतसिंह यांच्या निधनाने जुन्या पिढीतील आणखी एक नेता अस्तंगत झाला आहे. भारतीय लष्करात मेजर ते राजकारणी असा त्यांचा प्रवास. सैनिकी पार्श्वभूमी असल्यानेच लष्करी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला तरी अखेपर्यंत खांद्यावर सैनिकी गणवेशाच्या धर्तीवर स्कंधभूषण, हाताच्या बाह्य वळलेल्या असा सैनिकांसारखाच त्यांचा पोषाख असायचा. अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण ही केंद्रातील तीन महत्त्वाची खाती भूषविण्याची संधी मिळण्याचा योगही त्यांच्या वाटय़ाला आला होता. १९७०च्या दशकात लष्कराचा राजीनामा देऊन राजकारण प्रवेशाचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा त्यांचे राजकीय गुरू, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी जनसंघात जाण्याचा सल्ला दिला. परंतु ‘अल्पसंख्याकांबाबतची संघाची तत्त्वे आपल्याला पटणारी नाहीत,’ अशी भूमिका मांडून ते दूर राहिले. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी मैत्रीमुळे भाजप स्थापनेच्या वेळी ते १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांच्या सरकारात अर्थखाते जसवंतसिंह यांच्याकडे सोपविण्यात आले होते. भाजपमध्ये तेव्हा रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्यांची महत्त्वाची पदांवर नियुक्ती केली जात असे. जसवंतसिंह यांच्याकडे ते पाठबळ नसले तरी वाजपेयी यांनी त्यांच्यावर नेहमीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली व ती त्यांनी पारही पाडली. १९९८ मधील अणुचाचणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर टीका झाली, निर्बंधही लादण्यात आले. या वेळी परराष्ट्रमंत्री असलेल्या जसवंतसिंह यांनी राजनैतिक कौशल्याचा वापर करून अमेरिकेशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र उपमंत्री स्टोब टाल्बॉट यांची दोन वर्षांत १० वेगवेगळ्या ठिकाणी १४ वेळा भेट घेऊन चर्चा केली. त्यातूनच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांचा भारत दौरा झाला आणि उभय देशांमधील संबंध सुधारले. भारताच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले वातावरण निवळण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरणानंतर प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात जैश-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्यासह तीन दहशतवाद्यांना जसवंतसिंह हे आपल्या विमानातून कंदहारला घेऊन गेल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती. परंतु १७५ प्रवाशांचा जीव महत्त्वाचा असल्यानेच दहशतवाद्यांना बरोबर घेऊन जावे लागल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. मते रोखठोक मांडण्याची सवय त्यांना अनेकदा भोवली होती. २००९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मदअली जिना यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात, फाळणीविषयी सरदार पटेल यांच्या विरोधात मांडलेली मते भाजप नेत्यांना फारच झोंबली होती. त्यातून जसवंतसिंह यांची पक्षातून हकालपट्टीही झाली, पण वर्षभरातच ही कारवाई मागे घेण्यात आली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा त्यांचा आग्रह पक्षाने मान्य केला नाही. मग त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व त्यात त्यांचा पराभव झाला. पक्षाविरोधात निवडणूक लढविल्याने दुसऱ्यांदा त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. यानंतर काही दिवसांतच, घरातल्या घरात पडल्यामुळे ते कोमात गेले आणि गेली सहा वर्षे ते याच अवस्थेत होते. मोदी-शहा यांच्या काळात तसेच जुने नेते मार्गदर्शक मंडळातच गेले असताना, वाजपेयी-अडवाणी यांच्यासह पक्ष वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे जसवंतसिंह अखेरच्या काळात पक्षाबाहेर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 12:02 am

Web Title: article on outspoken jaswant singh abn 97
Next Stories
1 समाजमाध्यमी उच्छाद
2 अजागळपणावर बोट
3 ‘टाळेबंद’ सहामाही
Just Now!
X