22 September 2020

News Flash

कुचकामी आणि हास्यास्पद

१६ वर्षांखालील वयोगटात १८-२० वर्षांचे किंवा १८ वर्षांखालील स्पर्धामध्ये २०-२२ वर्षांचे क्रिकेटपटू हमखास खेळताना आढळतात.

संग्रहित छायाचित्र

 

मुंबई क्रिकेटशी परिचित असलेल्यांकडून जी एक नित्याची तक्रार कानी पडते ती अशी : लहान वयोगटांतील स्पर्धामध्ये मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीयांकडून (विशेषत: उत्तर भारतीयांकडून) वयचोरीचे प्रकार सर्रास घडतात. १६ वर्षांखालील वयोगटात १८-२० वर्षांचे किंवा १८ वर्षांखालील स्पर्धामध्ये २०-२२ वर्षांचे क्रिकेटपटू हमखास खेळताना आढळतात. या वयचोरीचा मोठा फटका मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना बसतो. त्याहीपेक्षा वाईट बाब म्हणजे, वयचोरीचे हे लोण लहान वयोगटांमध्येही पसरते. त्यामुळे या खेळात मोठय़ा उत्साहाने सहभागी झालेल्या आणि प्रामाणिकतेची कास धरून राहिलेल्या लहानग्या क्रिकेटपटूंचा आणि त्यांच्या पालकांचा हिरमोड होतो. मुंबई क्रिकेटमधील मराठी टक्का कमी होण्यास ही वयचोरीदेखील कारणीभूत आहे, असे या खेळातील जुनेजाणते सांगतात. उत्तर प्रदेशातील कुठल्याशा ग्रामपंचायतीकडून कच्चा जन्मदाखला आणून, त्याद्वारे वय चोरण्याचे प्रकार सर्रास घडलेले आहेत. मुंबईत किंवा अगदी महाराष्ट्रात अधिवास असलेल्यांना हे शक्य नसते, कारण आपल्याकडील जन्मदाखले पुरेसे पक्के आणि चिकित्सेअंती बनवलेले असतात. अर्थात वयचोरी हा केवळ मुंबई क्रिकेटपुरता नाही, तर देशव्यापी मुद्दा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला याची दखल घ्यावी लागत आहे. पण या समस्येवर बीसीसीआयने शोधलेला तोडगा योग्य आहे असे म्हणता येणार नाही. अनधिकृत बांधकामे फोफावू द्यायची आणि मग एखादे वेळी ही बांधकामे नियमित करायची असे उद्योग सरकारदरबारी होतच असतात. यातून दोन गोष्टी होतात. अधिकारी यंत्रणेकडे कोणतेच उत्तरदायित्व राहात नाही आणि थोडेफार अपप्रवृत्तीला आळा घातल्याचेही लटके समाधान मिळते. क्रिकेटमध्ये वय चोरण्याची अपप्रवृत्ती विशेषत: दक्षिण आशियाई देशांमध्ये अनेकदा दिसून आली आहे. केवळ एखाद्या शहरात लहान वयोगटात वय चोरून खेळण्यापुरता हा प्रश्न राहिलेला नाही. अलीकडे १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धामध्येही कोटय़वधींची गुंतवणूक होते. तेथे खेळायची संधी मिळणे सीनियर संघातील संधीपेक्षा कमी महत्त्वाचे नसते. त्यात आता आयपीएलसारख्या तद्दन गल्लाभरू स्पर्धेची भर पडली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या फ्रँचायझी संघांमध्ये युवा क्रिकेटपटूंसाठी जागा राखीव असतात. तेथे प्रवेश मिळाल्यास अनेकदा पुढे सीनियर स्तरापर्यंत सरकायची गरजही उरत नाही. वयचोरीला असे नवीन आणि महत्त्वाचे आयाम प्राप्त झाले आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी बीसीसीआयने सुचवलेला उपाय काय, तर स्वत:हून वयचोरीची कबुली दिल्यास एक वेळ माफी प्राप्त करून खरोखरीच्या वयोगटात खेळत राहणे! तसे न करता वय चोरून एखादा खेळत राहिला आणि सापडला, तर अशा क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी येऊ शकते आणि कदाचित त्याला पुढे कधीही स्थानिक वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही. भारताचा विख्यात माजी फलंदाज राहुल द्रविडकडे गेली काही वर्षे ज्युनियर क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानेच वयचोरीच्या या गंभीर समस्येकडे प्रथम बीसीसीआयचे लक्ष वेधले. हे असे करण्याची वेळ द्रविडवर यावी आणि त्यानंतर बीसीसीआयने जागे झाल्यासारखे करणे हे या संघटनेच्या नैतिक सुस्तीचे आणि बौद्धिक मांद्याचे निदर्शक आहे. या उपायाचा अर्थ, स्थानिक आणि विभागीय क्रिकेट संघटनांनी वयचोरी चाचपणी व्यवस्था बळकट व संशयातीत करावी याविषयी बीसीसीआय कोणताही आग्रह धरणार नाही. ज्या समस्येला मुळापासून भिडण्याचीच बीसीसीआयची इच्छा नाही, त्यावर माफी योजनेचा आणि सशर्त बंदीचा उपाय कुचकामी आणि हास्यास्पद ठरतो. सामनेनिश्चितीबाबतही ‘आम्ही कसे आमच्या दोषी क्रिकेटपटूंना कठोर शासन केले ते पाहा’ असे सांगून बीसीसीआय मोकळी होते. असल्या कुचकामी आणि हास्यास्पद उपायांतून समस्या सुटत नसतात. वयचोरीबाबतही तेच होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:02 am

Web Title: article on rahul dravid first drew the attention of the bcci to this serious issue of age theft abn 97
Next Stories
1 उदंड झाल्या लशी..
2 उद्यमशीलतेची अंतराळझेप
3 विलंबाने का होईना..
Just Now!
X