धर्माचे पालन करण्याची किमान व्याप्ती म्हणजे देवदेवता किंवा सण-उत्सव नव्हेत. जन्मानंतरचे सोहळे, विवाहाचे विधी, विवाह कुणाशी करावा अथवा करू नये याचे संकेत आणि मृत्यूनंतर कलेवराला निरोप देण्याच्या पद्धती. या चार व्यक्तिगत रीतीही धर्म टिकवून ठेवत असतात. या रीती बदलल्या, तर धर्माचेच अस्तित्व धोक्यात येईल असा विश्वास त्या-त्या धर्मातील बहुसंख्यांचा सहसा असतो. सहसा म्हणण्याचे कारण असे की, पारसी समाजातील अनेकांना आता, आपल्या मृत्यूनंतर पारसी धर्मपद्धतीप्रमाणे आपला अंत्यविधी होऊ नये, असे वाटते. हे वाटणाऱ्यांची संख्या मुंबईत अधिक आहे, याला अर्थातच महत्त्व आहे कारण मुळात अगदीच अल्पसंख्य असले तरी पारसी लोकांची या महानगरातील संख्या केवळ राज्यातील अन्य शहरांच्या नव्हे तर देशातील पारसी लोकसंख्येच्या मानाने लक्षणीय आहे. धार्मिक रीतीनुसार ‘डूंगरवाडी’मध्ये, म्हणजे टेकडीवरील विहीरवजा बांधीव जागेत पारसी मृतदेह ठेवले जातात आणि इराणी संस्कृतीत मातास्वरूप असलेली गिधाडे तसेच सूर्य यांमुळे त्या कलेवरांची विल्हेवाट पुढील काही काळात लागत राहते.  पण प्रश्न आहे गिधाडांच्या घटत्या संख्येचा आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांत अशी विल्हेवाट लागणे शक्य होईल काय, याचाही. यातून व्यवहार्य आणि मनाला पटणारा मार्ग म्हणून ‘माझ्या मृत्यूनंतर माझे दहनच करा’ असे इच्छापत्र अनेक पारसी जाणत्यांनी करून ठेवले. हे एक प्रकारे, पारसी धर्मापुढले मोठे आव्हानच होते. माझे दहनच करा, अशी इच्छा ज्यांनी लिहून ठेवल्यामुळे पूर्ण करावी लागली, अशांमध्ये ३० वर्षांपूर्वी दिवंगत झालेले दाराब टाटा (जेआरडींचे बंधू) जसे होते, तसेच मुंबईच्या कलादालन विश्वाची पायाभरणी करणारे केकू गांधीदेखील होते. अशा दहन-इच्छापत्रांची संख्या वाढत असतानाच गिधाडे कमी होतच होती. मग काही पारसी धर्मगुरूंनीच मुंबई महापालिकेकडून विद्युतदाहिनी आणि तिला जोडून पारसी प्रार्थनालय अशा सुविधेची अनुमती मिळवली. ही सुविधा यथास्थित सुरू झाल्याला येत्या ऑगस्टात वर्ष पूर्ण होईल! पण प्रश्न आहे तो, अद्यापही पारसी समाजाचे नियमन करणाऱ्या ‘पारसी पंचायत’ने या नव्या प्रथेला पाठिंबा न देता विरोधच कायम ठेवल्यामुळे. या पंचायतीने धर्म-सुधारणेतून पाऊल मागेच घेतले आहे. त्यामुळे केवळ पारसी नव्हे, तर सर्वच धर्मातील सुधारणावादय़ांनी या विद्युतदाहिनीचे पुढे काय होते, हे पाहायला हवे. विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कारांनंतर पारसी पद्धतीनेच प्रार्थना करणारे पुजारी (दस्तूर) आहेत, पण धर्माचे नियमन करणाऱ्या पंचायतीने मात्र ‘अग्नी पवित्र आणि पूजनीय, त्याला मृतदेह कसा द्यायचा?’ हा धोशा कायम ठेवला आहे. नियमनासाठी अशी एकच एक पंचायत नसलेल्या हिंदू समाजातही धर्म काय सांगतो हे ठरवणाऱ्या अनेक संस्था असतातच. त्या कितपत सुधारणावादी असतात- जन्म/ विवाह/ विवाह कुणाशी करावा वा करू नये आणि मृत्यूनंतरचे विधी कोणते या चार बाबींत अशा संस्थांचा सुधारणावाद खरोखरच दिसतो का, हा प्रत्येकाने आपापल्या प्रांजळपणाने पाहण्यासारखा प्रश्न आहे. धर्माच्या नियामक संस्था परंपरावादीच असल्याचा अनुभव सार्वत्रिकच. परंतु वेगळेपण हे की, संख्येने भारतभरात अवघ्या ६९ हजारांच्या आसपास असलेल्या पारसी समाजातून एकटय़ा मुंबईतल्या विद्युतदाहिनीत गेल्या आठ महिन्यांत सुमारे ८० दहनविधी झाले. धर्मसंस्कार बुडाला तरी चालेल, सुधारणा हवीच अशी धमक पारसी समाजाने दाखविली! या देशातील अत्यल्पसंख्य समाजात ही धमक आहे. बहुसंख्य समाजात ती नाही, हे येणाऱ्या सार्वजनिक उत्सवांच्या काळातही दिसेलच.