07 July 2020

News Flash

सामाजिक सृजनाची पत्रकारिता

दिनू रणदिवे हे पत्रकारितेच्या अशा कष्टप्रद अध्यायाचे प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

 

बातमीवेड जपत लेखन- संपादन करायचे, पदरमोड करून पेपर छापायचा. शिवाय हे वृत्तपत्र छापून आल्यावर, रस्त्यावर ओरडून लोकांना ते विकण्याचा जिम्माही स्वत:च वाहायचा. दिनू रणदिवे हे पत्रकारितेच्या अशा कष्टप्रद अध्यायाचे प्रतिनिधी. जोम धरत असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गरज म्हणून ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे साप्ताहिक सुरू झाले. त्याचे बातमीदार, लेखक, संपादक, प्रकाशक आणि विक्रेते अशा साऱ्या भूमिका रणदिवे यांनी बिनबोभाट पार पाडल्या. रणदिवे यांनी त्यांच्या ९५ वर्षांच्या आयुष्यात काय केले, असे जर कोणी विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तर हेच की, त्यांनी समाज वाचला आणि त्याला शब्द देऊन तो मुखर केला. त्या काळच्या निडर बातमीदारीचा मानदंड ठरेल, अशा लिखाणाचे अफाट नमुने त्यांनी घडविले.

महाराष्ट्र राज्य आकाराला येत होते तेव्हापासून विशेषत: मुंबईच्या रस्त्यावरची आंदोलने, येथील दलित- श्रमिकांचा जगण्याचा संघर्ष आणि त्यावरून ठरणारा राजकारणाचा पोत याचा चालता- बोलता इतिहासपट म्हणून रणदिवे यांच्याकडे पाहिले जात असे. अत्रे, डांगे, एसेम, लिमये, जॉर्ज फर्नाडिस ते बाळ ठाकरे (त्यांना ‘बाळ’ असे एकेरी संबोधणाऱ्या काही मोजक्या मंडळींपैकी रणदिवे एक) यांच्याबद्दल ते भरभरून बोलायचे. ‘अमुक-तमुक घडलं तेव्हा नेमकं काय झालं?’, असा केवळ त्यांच्यापुढे प्रश्न करायचा की त्यांचे बोलणे सुरू व्हायचे. समोरच्याने चाट पडावे अशा लयीने ते अनेकानेक घटना व प्रसंगांची सफर घडवून आणत असत.

डहाणूनजीकच्या चिंचणी गावातील जन्म. शिक्षण मुंबईत झाले. रुईया महाविद्यालयात शिकत असताना समाजवादी पक्षाच्या युवक संघटनेचे काम करू लागले. तो एकूणच भारावलेला काळ होता. ध्येयवाद, बौद्धिक-वैचारिक घडणही त्यातून घडत गेली. शिकता शिकताच ‘लोकमान्य’ दैनिकात रणदिवे उमेदवारी करीत होते. लढे-आंदोलने करीतच पत्रकारितेत आलेले रणदिवे यांच्या बातमीदारीशी व्यापक सामाजिक दृष्टिकोनाचा पैलू जैवपणेच जुळला गेला होता. चळवळी-लढय़ांमध्ये सक्रियता इतकी की, प्रसंगी तुरुंगवासही त्यांनी भोगला. विषमता, अनिष्टता, भेदाभेद, अभाव, नाकारलेपण, तुच्छता हे त्यांच्या लेखनाचे विषय बनले नसते तरच नवल होते. ‘लोकमान्य’ बंद झाले आणि काही दिवसांतच ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाले. ‘लोकमान्य’मधील बरेचजण या नव्या दैनिकात आले, त्यात रणदिवेही होते. बोरीबंदरच्या त्या दैनिकात प्रारंभापासून बातमीदार ते मुख्य वार्ताहर अशा कारकीर्दीत गिरणी कामगारांचे संप- लढे, जातीय दंगली, वेगवेगळ्या निवडणुका आणि सत्तासंघर्ष याचे ते साक्षीदार राहिले. ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ला देणग्या मिळवून देणाऱ्या सीमेंट घोटाळ्याचा पर्दाफाश आणि अ. र. अंतुले यांची मुख्यमंत्रिपदावरून गच्छंती हे एकंदर पत्रकारितेचेच यश असले तरी, त्याविषयीची पहिली मराठी वृत्तमालिका दिनू रणदिवे यांची होती.  ‘राजभवनात स्मगलिंग’ ही त्यांनी दिलेली बातमी प्रभावी ठरली. अगदी बांगलादेश मुक्तीसाठी सुरू असलेल्या युद्धाचे सीमेवर जाऊन वार्ताकनही त्यांनी केले. पण स्वत:चा लौकिक वाढवणाऱ्या या विशेष बातम्यांइतक्याच, रोजच्या बातम्याही त्यांनी तन्मयतेने दिल्या आणि लोकांना यश मिळवून दिले. मुंबईच्या स्मशानभूमी-दफनभूमींवरील जातिवाचक पाटय़ा हटविल्या जाणे, कामगार-कष्टकऱ्यांच्या आंदोलनांचा त्यांच्या मागण्या मान्य होईतोपर्यंत पाठपुरावा हे त्यांच्या पत्रकारितेच्या सामाजिक सृजनाचे काही नमुने.

बातमीदारी करणे हे कायमच आव्हानात्मक होते आणि आहे. असे असले तरी रणदिवे यांच्यासाठी ते अवघड मात्र नव्हते. आज मात्र नेमके उलट घडत असल्याचे दिसत आहे. आज माध्यमांची भाऊगर्दी आहे, साधने वाढली आहेत, पण बातमीदारी हरवत चालली आहे. बातमीदारी करणे हे नाहक नाना कारणांनी अवघड बनलेले आहे इतके नक्की, असे रणदिवेच म्हणत. मुळात, ‘आमच्या काळाची बात काही वेगळीच होती,’ अशा धाटणीचे काहीही अनवधनानेदेखील ते बोलत नसत. तरी त्यांच्यातील पत्रकार आणि सध्याच्या पत्रकारितेच्या तुलनेचा मोह आवरता येत नाही. सध्याच्या पत्रकाराची अवस्था ही खरे तर आड आटलेला आणि पोहराही तुटलेला अशी आहे. कसले संचित नाही, ध्येय नाहीत, निष्ठा तर नाहीच नाहीत. अशा वेळी रणदिवे, आजच्या पत्रकारांना निराळेच वाटत. गांधीयुगाशी नाळ, नेहरूंचा काळ पाहात वाढलेले आणि १९६०च्या आधीपासून सुरू झालेली पत्रकारितेची कारकीर्द महाराष्ट्र राज्यस्थापनेनंतर बहरलेले रणदिवे, १९४० च्या दशकापासून समाजवादी चळवळींशी जोडले गेले होते. त्या वेळच्या अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच, रणदिवेही ‘स्वातंत्र्यसैनिक’ ठरले.  गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बातमीदार आणि कार्यकर्ता अशा दुहेरी नात्याने ते आघाडीवर होते. त्यानंतरच्या काळात सामाजिक संघटन हीच खरी लढाई असल्याचे त्यांनी ओळखले. बातमीदार या नात्याने संघटनांना बळ दिलेच पण अनेक संघटनांमध्ये सहभागही कायम ठेवला. मोठय़ा माध्यमसमूहात, संगणकीकरणाने रोजगार जातील म्हणून काही दिवसांचा संप घडवण्यातही ते सक्रिय सहभागी होते. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि पुढे ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट्स’चेही काम त्यांनी केले. अनेक तरुण पत्रकारांना त्यांनी या संघटनाकार्यात आणले.

माणसाचे जिवंतपणीच आख्यायिका बनणे रणदिवे यांना त्यांचा वैचारिक पोत, साधी राहणी पाहता मान्य होणे शक्यच नव्हते.  सत्ताधाऱ्यांना आणि सत्ता टिकवण्यासाठी अनेक डावपेच वापरणाऱ्यांना रणदिवे यांनी अगदी जवळून , पण नैतिक भान आणि वैचारिक अंतर राखूनच पाहिले. त्यामुळेच  आयुष्यभर साधी राहणी तरी समाधानी जिणे ते जगले. स्वत:साठी काहीही कमावले नाही. अनेक पुरस्कार मिळाले, पण पुरस्काराची रक्कम घरी आणली नाही. पत्नी सविता शाळेत शिक्षिका होत्या, त्यांच्या निवृत्तिवेतनावर घर चालले होते.

सगळी कामे बंद, घराबाहेर पडणे, वाटेल तिथे जाणे, मनाला येईल त्याची भेट घेणे.. सारेच बंद. टाळेबंदीने माणूस कोंडला गेला. गंभीर गोष्ट म्हणजे एकंदर वर्तमानकाळ असाच की, माणसाची अभिव्यक्तीही संकोचत- आक्रसत चालली होती. आधी मेंदू कोंडला आणि आता माणसेच शरीराने कोंडलेली. रणदिवेंसारख्यांसाठी हे जिवंतपणी मरणच. विस्मृतीत तर ते गेलेच होते. कोणी फिरकेनासेही झाले होते. केवळ वर्षांतून एकदा कधी तरी कोणाकडून जाहीर झालेला जीवनगौरव पुरस्कार, इतकेच काय त्यांना आठवण्याचे कारण. आयुष्यभर जीव लावून साथ करणाऱ्या पत्नीची संगतही महिनाभरापूर्वी तिच्या जाण्याने सुटली. जगूच शकत नाही अशा वातावरणात घुसमट होण्यापेक्षा त्यांचे जाणे एका अर्थाने क्रमप्राप्तच होते.

पत्रकारितेचे स्वरूप बदलले, तरी ‘बातमी’चे महत्त्व बदलत नाही. ते महत्त्व कायम राखणाऱ्या दिनू रणदिवे यांना ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 12:01 am

Web Title: article on senior journalist dinu randive passed away abn 97
Next Stories
1 माणूस नावाचे (डिजिटल) बेट!
2 नेपाळशी संवादसेतूच हवा..
3 कापूस खरेदीचा घोळ
Just Now!
X