करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमके काय करायचे, याविषयी शहर/जिल्हा ते देशपातळीवर कोणतेही प्रारूप अद्याप विकसित होऊ शकलेले नाही. आज जो पवित्रा यशस्वी ठरताना दिसतो, त्यात काही दिवसांनी त्रुटी आढळू लागतात. एक तर अशा प्रकारची महासाथ शतकातून एखादीच येते. त्यातही साथनियंत्रण आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या टाळेबंदीतून आर्थिक चक्र केव्हा आणि कसे सुरू करायचे हा समतोल राखणे हे सर्वात मोठे आव्हान. दोन्ही आघाडय़ांवर तज्ज्ञांची गरज भासते आणि सरकारमध्ये या तज्ज्ञांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती लागते. तो योगही प्रत्येक वेळी जुळून येईलच असे नाही. हे झाले राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थांविषयी. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या (डब्ल्यूएचओ) संस्थेचे स्वरूप आणि कार्यपद्धती तितकी व्यामिश्र नसते. तिथे तर बहुतेक सगळेच तज्ज्ञ. शिवाय साथरोग नियंत्रणाचा प्रदीर्घ अनुभव या संघटनेच्या गाठीशी आहे. त्यामुळेच कोविडच्या लक्षणधारी नसलेल्या (एसिम्प्टोमॅटिक) रुग्णांच्या बाबतीत या संघटनेने केलेले वक्तव्य काही तासांतच त्यांना बदलावे लागणे, हे चांगले लक्षण नक्कीच नाही! लक्षणधारी नसलेल्या रुग्णांमार्फत कोविडचा फैलाव होणे ही दुर्मीळ बाब असल्याचे विधान डब्ल्यूएचओच्या डॉ. मारिया व्हॅन केरखोवे यांनी मंगळवारी केले. मात्र काही तासांमध्येच ‘हा निष्कर्ष फार थोडय़ा प्रयोगाभ्यासांवर आधारित’ असल्याची सारवासारव त्यांनी केली. जगभर लक्षणधारी नसलेल्या रुग्णांमार्फत कोविडचा प्रसार होत असल्याबद्दल अनेक वैद्यकतज्ज्ञ आणि साथरोगतज्ज्ञांमध्ये जवळपास मतैक्य आहे. किंबहुना, त्यामुळेच प्रचंड वेगाने होणारा हा फैलाव रोखणे हे आव्हानात्मक बनून गेले आहे. काही वेळा, कोणतीही लक्षणे नसणारी व्यक्ती बाधित होऊनही करोनाचा मुकाबला करून ठणठणीत राहाते. पण दरम्यानच्या काळात करोनाची वाहक मात्र बनते. ती इतरांच्या संपर्कात आल्यास (लक्षणधारी नसल्याने बेसावध राहून आणि इतरांना बेसावध ठेवून) त्यांना करोनाचा संसर्ग होऊ शकतोच. हे प्रमाण नेमके किती, याबाबतचे पुरावे गोळा करण्याचे काम जगभर सुरू आहे. करोनाच्या विद्यमान अवताराचे (सार्स-सीओव्ही-२) प्रताप अजूनही पुरेसे अभ्यासण्यात आलेले नसल्यामुळे लक्षणधारी नसलेले किती प्रमाणात इतरांना बाधा पोहोचवू शकतात, याविषयी एखादे प्रारूप निश्चित होऊ शकलेले नाही. या प्रयत्नांमध्ये डब्ल्यूएचओच्या वक्तव्यांनी खोडा पडू शकतो. मुखपट्टय़ांबाबतही संघटनेने गोंधळात टाकणारी विधाने केली होती. लक्षणधारी नसलेल्यांकडून संसर्गाची शक्यता दुर्मीळ आहे म्हणणाऱ्या डॉ. केरखोवे यांनी, विधान मागे घेताना हे प्रमाण ४० टक्के असू शकते, असे म्हटले आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात ४० टक्के प्रमाण हे सहज काही कोटींमध्ये जाऊ शकते. तसा पुरावा मिळाला आहे का, हा प्रश्न आपल्याला ‘लक्षणपूर्व’ अवस्थेकडे घेऊन जातो. बाधित झाल्यानंतर साधारण तीन दिवस लक्षणे दिसायला लागू शकतात, असे एक संशोधन सांगते (संदर्भ : बीबीसी वृत्त. त्यातील साथरोगतज्ज्ञ डॉ. बबाक जाविद यांचे वक्तव्य). डब्ल्यूएचओच्या कार्यपद्धतीविषयी कधी नव्हे इतकी टीका कोविडच्या प्रादुर्भावातच झालेली आहे. वास्तविक अशा पद्धतीच्या महासाथीमध्येच एक कणखर मार्गदर्शक म्हणून या संघटनेने संसर्गग्रस्त देशांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याऐवजी संघटनेची स्वत:चीच अवस्था ‘चांचरती चांचरती बाहेरी निघाले। ठकचि मी ठेले काय करूं॥’ अशी झालेली आहे. करोनाचा ‘स्वभाव’ अजूनही पडताळण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा वेळी काही औषध कंपन्या आणि त्यांच्या कच्छपि लागलेली सरकारे आणि माध्यमे यांनी बातम्या पेरण्याचे उद्योग सुरू केलेच आहे. डब्ल्यूएचओची कृती आणि वक्तव्ये अशा उद्योगांना खतपाणीच घालणारे ठरते.