News Flash

एक ‘सुंदर’ विचार!

रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता.

एक ‘सुंदर’ विचार!

रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 1:49 am

Web Title: article on sunder pichai support muslim
Next Stories
1 देवेंद्रभाऊ, तुम्हीसुद्धा?
2 शिका आणि उभे राहा!
3 शहरांचे हित
Just Now!
X