देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सुरुवातीच्या ५० वर्षांमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकी अध्यक्षांची संख्या होती तीन. ड्वाइट आयसेनहॉवर, रिचर्ड निक्सन आणि जिमी कार्टर हे ते तीन अध्यक्ष. १९७८ मध्ये जिमी कार्टर यांच्या दौऱ्यानंतर २२ वर्षे भारताकडे जणू अमेरिकी अध्यक्ष फिरकलाच नाही. पण सन २००० पासून दोन दशकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रस्तावित भेट जमेस धरता पाच वेळा अमेरिकी अध्यक्ष भारत दौऱ्यावर आलेले असतील. सन २००० मध्ये बिल क्लिंटन, २००६ मध्ये जॉर्ज बुश धाकटे, मग २०१० आणि २०१५ मध्ये बराक ओबामा आणि आता फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रम्प. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांच्या बदलत्या छटा या बदलत्या वारंवारितेतून सहज लक्षात येऊ शकतात. या दोन देशांमधील सामरिक आदान-प्रदान अभूतपूर्व वाढलेले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका हा चीनला मागे सारत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला आहे. अमेरिका हा असा दुर्मीळ देश आहे, ज्याच्याबरोबर भारताचे व्यापारी आधिक्य (ट्रेड सरप्लस) आहे. हे आधिक्य २०१८-१९ या वर्षांत १,६८५ कोटी डॉलर इतके होते. ट्रम्प यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर किती विषय आहेत, हे येत्या दोन दिवसांतच स्पष्ट होईल. परंतु ‘अमेरिकेलाच प्राधान्य’ या ट्रम्प यांच्या जगजाहीर धोरणाच्या आड ही आकडेवारी येते. ‘तुमच्याबरोबरच्या व्यापारात आम्ही खूप नुकसान सोसत असतो,’ असे ट्रम्प काही वेळा आणि गेल्या चार-पाच दिवसांत तर वारंवार बोलून गेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिका, चीन, युरोपीय समुदाय यांच्याइतका अवाढव्य अजून तरी नाही. त्यामुळे भारताबरोबरचे व्यापारी समीकरण दोन समतुल्य भागीदारांचे नाही, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला आहे. त्यामुळेच या भेटीत तरी कोणताही ठोस व्यापार करण्याच्या मन:स्थितीत ट्रम्प नाहीत. कदाचित तो त्यांचा ‘अजेण्डा’ही नसावा. मग त्यांच्या मनात आहे काय?

ट्रम्प यांचा स्वभावपिंड लक्षात घेता, याबाबत नेमका अंदाज बांधणे हीच एक मोठी जोखीम ठरते! भारतात येण्याच्या एक दिवस आधी त्यांनी ट्विटरवरून बाहुबलीरूपातील त्यांची एक चलचित्रफीत जारी केली आहे! भारतभेटीवर नेमका बाहुबली कोण, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. अवघ्या ३६ तासांच्या या दौऱ्यात अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीभेटीचा भरगच्च कार्यक्रम आहे. मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी ‘हाऊडी, मोदी!’ कार्यक्रम ह्य़ुस्टनमध्ये केला. त्याच स्वरूपाचा ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादेत होतो आहे. भारताच्या दौऱ्यावर आजवर आलेल्या इतर कोणत्याही अमेरिकी अध्यक्षांपेक्षा ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व विविधरंगी आहे. पण त्यामुळेच त्यांच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत त्यांचे जामात जॅरेड कुशनरही आहेत. कुशनर यांनी गेली काही वर्षे ट्रम्प यांच्या पश्चिम आशियाविषयक धोरणाच्या घडणीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांची उपस्थिती ट्रम्प भेटीला भूराजकीय सामरिक रंग देते. किंबहुना, सामरिक क्षेत्र, ऊर्जा आणि रोजगार व शिक्षण याच मुद्दय़ांपुरती या भेटीत चर्चा मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी वारंवार तक्रार करूनही त्यांच्या सरकारने भारताविरुद्ध कठोर व्यापारी र्निबधांची पावले उचललेली नाहीत. भारतातील कथित असहिष्णुतेबाबत ट्रम्प यांचे डेमोकॅट्रिक विरोधक बर्नी सॅण्डर्स यांनी आवाज उठवूनही ट्रम्प प्रशासनाने त्या मुद्दय़ावर एका मर्यादेपेक्षा अधिक प्रतिकूल मतप्रदर्शन केलेले नाही. भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा ट्रम्प भेटीदरम्यान केवळ चर्चिला जाणार आहे. परंतु या अनेक मुद्दय़ांकडे लक्ष देण्यासाठी ट्रम्प यांना सध्या वेळ नाही. कारण त्यांचे सगळे लक्ष या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर केंद्रित झालेले आहे. त्यामुळेच अहमदाबाद भेट ही त्यांना ह्य़ुस्टनमध्ये झालेल्या भारतीय अमेरिकनांच्या पाठिंब्याची पुढील फेरी वाटते. चीनला प्रतिबंध करण्यासाठी प्रशांत महासागरात भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियाई देशांची फळी ते बनवतात. त्याच वेळी भारताच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरू शकेल, अशा तालिबान करारालाही मान्यता देतात. ‘अमेरिकेलाच प्राधान्य’ धोरणाशी ते सुसंगतच. परंतु आज ना उद्या भारताशी असलेल्या व्यापारी तुटीचा (अमेरिकेच्या दृष्टीने) मुद्दा ट्रम्प यांना अजेण्डय़ावर आणावा लागणारच आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम आणि अनेक प्रकारच्या आयातशुल्कांमुळे आमच्या मालाला भारतीय बाजारपेठ बंद झाल्याची तक्रार अमेरिकी उद्योगपती करत असतात. ट्रम्प किंवा भविष्यातील इतर कोणताही अमेरिकी अध्यक्ष या तक्रारीला फशी पडून निर्बंध लादू शकतो. त्याविषयी आताच विचार न केल्यास, आधीच मंदीग्रस्त झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तो प्राणांतिक टोला ठरू शकतो. ट्रम्प यांचे आज स्वागत करताना भविष्यातील या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.