आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये भावना आणि प्रतीकात्मकतेला फारसे स्थान असण्याचे काही कारण नाही. परंतु कोविड-१९ महासाथीच्या महासंकटामुळे उद्भवलेली सध्याची परिस्थितीच इतकी अभूतपूर्व आहे, त्यामुळे नव्वदी ओलांडलेल्या एका आजीबाईंना ब्रिटनमध्ये एखादी लस टोचली गेल्याबद्दल जगभर आशा आणि अपेक्षांचे फुलोरे फुलणे अगदीच स्वाभाविक म्हणावे असे. अमेरिकेच्या फायझर कंपनीची आणि जर्मनीच्या बायोएन्टेक कंपनीने विकसित केलेली लस प्रथम ब्रिटनमध्ये दिली जाते आणि या कंपनीला अमेरिकेबरोबरच भारतातही आपत्कालीन लसीकरणाचा परवाना मिळण्याची आशा आहे, हे सारे कोविड-१९ची वैश्विक आणीबाणी अधोरेखित करणारे आहे. ब्रिटनमध्ये ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यक सेवकांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत मार्गारेट किनन या जगातील पहिल्या अधिकृत कोविड-१९ प्रतिबंधक लस-लाभार्थी ठरल्या. ब्रिटनमधील लसीकरणाकडे जगाचे लक्ष आहे. कारण ही लस वितरित करण्यापूर्वी उणे ७० अंश सेल्सियस तापमानात साठवणे आवश्यक असते. तसे करणे अमेरिका किंवा भारत या बाधितांची संख्या आणि त्यामुळे लसीकरणाची गरज अजस्र असलेल्या देशांमध्ये करणे कितपत व्यवहार्य आणि परिणामकारक ठरेल याविषयी रास्त साशंकता आहे. फायझरने भारतातही आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केला आहे. फायझरच्या बरोबरीने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या सहकार्याने उत्पादित करत असलेली कोविशील्ड ही लस, तसेच हैदराबामधील भारत बायोटेक विकसित करत असलेली कोवॅक्सिन ही लस, या तिन्ही भारतात आपत्कालीन मंजुरी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या, त्यापैकी कोविशील्ड व कोवॅक्सिन यांना तूर्त अधिक परीक्षणे करण्यास सांगण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये सध्या सुरू झालेले लसीकरण हेही आपत्कालीन मंजुरीअंतर्गतच आहे आणि लवकरच अमेरिकेत याच स्वरूपाचे लसीकरण सुरू होत आहे. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि जोखमीची असते. वैद्यकशास्त्राचा आजवरचा इतिहास पाहता, कोविड प्रतिबंधक लस ही सर्वात कमी वेळेत विकसित झालेली लस ठरू शकेल. परंतु लसीकरण हे नेहमीच प्रतिबंधक स्वरूपाचे असते. त्याचा फायदा विद्यमान बाधितांना होत नसतो हे वास्तव आहे. कोविड-१९ फैलावणाऱ्या ‘सार्स करोनाव्हायरस-२’ विषयीदेखील पुरेसे संशोधन झालेले नाही. तो नेमका कोणावर, किती प्रमाणात हल्ला करतो याविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. अनेक उपचारपद्धती त्याच्या निराकरणासाठी वापरल्या जात आहेत ज्या इतर आजारांवर वापरल्या जात होत्या. त्यांच्या यशस्वितेचे प्रमाण असमान आणि अशाश्वत आहे. यामुळेच निव्वळ लसीकरणाला सुरुवात झाली याचा अर्थ विषाणूचा नि:पात दृष्टिपथात आला असे नव्हे, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, देशात ९ जून रोजी दिवसभरात १० हजार बाधितांची संख्या प्रथम नोंदवली गेली होती. हे प्रमाण सप्टेंबरच्या मध्यावर जवळपास दिवसाला लाखापर्यंत गेले होते. आज दररोजच्या बाधितांची संख्या ३० हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. जगभरातील दहा सर्वाधिक बाधित देशांमध्ये केवळ भारत आणि अर्जेटिनामध्येच ‘दुसरी लाट’ अद्याप नोंदवली गेलेली नाही. परंतु करोना विषाणूची तीव्र संसर्गक्षमता पाहता आणि इतर अनेक पुढारलेल्या देशांतील परिस्थिती पाहता, सद्य:स्थितीबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घेण्याची वेळ आलेली नाही याचे भान आपल्याकडील राजकीय नेतृत्वाने आणि वैद्यकीय समुदायाने राखलेले आहे हे मात्र स्वागतार्हच. लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी आपल्याकडे सुरू झाली असून, आपत्कालीन लसीकरणाबाबत विचार, विवेक आणि विश्लेषण यांवर भर दिला जात आहे. सरकारी आणि वैद्यकीय पातळीवर या प्रकारची खबरदारी घेतली जात असताना, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना जबाबदार आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे. ब्रिटनमध्ये लस आली, तशी ती याकडेही येणार आहेच. तोपर्यंत धोक्याचे भान आणि प्रतिबंधाची जाण सुटू न देणे हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.