01 October 2020

News Flash

उदंड झाल्या लशी..

जगभर आजवर विकसित झालेल्या लशींबाबत काही साम्यस्थळे आढळतात. ती मांडून वस्तुस्थितीचे आकलन करून घेणे क्रमप्राप्त ठरते.

संग्रहित छायाचित्र

 

कोविड-१९ मुळे उठलेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढत असताना बहुतेक देश अजूनही चाचपडत आहेत. अमेरिका, युरोपातील काही देशांनी निष्ठुर टाळेबंदी जारी न करता, देशांतर्गत विविध क्रियाकलापांना मोकळीक दिली. पण कोविडमुळे लादले गेलेले मर्यादित निर्बंधही प्रगत राष्ट्रांमध्ये जाचक आणि व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी मानले गेले नि म्हणून पाळले गेले नाहीत. परिणामी अमेरिकेत करोनाबाधित आणि बळींची संख्या अजूनही अव्याहतपणे वाढते आहे. मर्यादित निर्बंधांच्या पूर्णपणे विरुद्ध अशी आर्थिक मानगुटी आवळणारी निष्ठुर टाळेबंदी भारताने अमलात आणली. पण त्यामुळेही, साथ नियंत्रणात आली असे म्हणता येत नाही. ४ ऑगस्टपर्यंत भारतात बाधितांची संख्या सुमारे साडेअठरा लाख आणि बळींची संख्या ३८ हजारांवर पोहोचली होती. ३ ते ४ ऑगस्टदरम्यानच्या २४ तासांमधील भारतातील बाधितांचा आकडा जगात सर्वाधिक होता. म्हणजेच, नूतन करोना विषाणूचा फैलाव अजूनही जवळपास अनियंत्रित प्रकारे होतोच आहे. या फैलावाला रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय असल्याचे जगात जवळपास मतैक्य आहे. त्यामुळेच पूर्वी कोणत्याही साथरोगावर झाले नव्हते इतक्या व्यापक आणि वेगवान प्रमाणात संशोधन करोनाविरोधी लशीवर होत आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितानुसार, आजमितीला जगभर १६५ लशींवर संशोधन सुरू आहे! तेदेखील, नोंदणीकृत संस्थांचे ज्ञात संशोधन. त्यापलीकडच्या अवकाशात आणखी कितीतरी अनाम संस्थाही याच क्षेत्रात संशोधन करत आहेत. लशीबाबत पूर्वग्रह आणि गैरसमज प्रचंड आहेत. येत्या डिसेंबरमध्ये लस येणारच आहे; त्यानंतर या विषाणूला मात दिलीच म्हणून समजा; वगैरे अज्ञानमूलक संदेश समाजमाध्यमांवर पसरत आहेत. जगभर आजवर विकसित झालेल्या लशींबाबत काही साम्यस्थळे आढळतात. ती मांडून वस्तुस्थितीचे आकलन करून घेणे क्रमप्राप्त ठरते. लसनिर्मिती ही खर्चीक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. एखादी लस पूर्णपणे यशस्वी किंवा परिणामकारक ठरण्याचे प्रमाण जेमतेम १०-२० टक्के असते. सध्याच्या लसनिर्मिती स्पर्धेची जागा लस राष्ट्रवादाने कशी घेतली आहे, याविषयीचे सखोल विश्लेषण ‘लोकसत्ता’च्या ‘कोविडोस्कोप’ मालिकेत वेळोवेळी येऊन गेलेले वाचकांच्या स्मरणात असेलच. सध्याच्या काळात साऱ्यांचेच लक्ष लसनिर्मितीकडे लागलेले असल्यामुळे, प्राथमिक स्वरूपाच्या टप्प्यांचेही प्रमाणाबाहेर वार्ताकन आणि स्वागत केले जात आहे. वास्तविक कोणत्याही लसनिर्मितीमध्ये पशू चाचण्या, मानवी चाचण्या, त्यांचे विविध टप्पे अंतर्भूत असतातच. त्याहीपेक्षा कळीचा मुद्दा म्हणजे, अगदी या टप्प्यांमध्येही एखादी किंवा अनेक लशी यशस्वी ठरल्या तरी प्रत्यक्ष उपयोजितेच्या टप्प्यावर त्या अयशस्वीही ठरलेल्या आहेत. एड्स किंवा एबोला ही ठळक उदाहरणे आहेत. तेव्हा फाजील आत्मविश्वास न बाळगता, लसनिर्मिती प्रयोग प्रकल्पांना वेळ देणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रम्पसारखे तोंडाळ नेते या मुद्दय़ावर उठवळ मतप्रदर्शन करत आहेत. आपल्याकडे राजकीय नेतृत्वाने याउलट पुरेशी परिपक्वता दाखवलेली आहे. लस बाजारात केव्हा येईल याकडे डोळे लावून न बसता, करोना प्रतिबंधात्मक उपाय आणि शिथिलीकरण यांत समतोल साधत राहणे भारतासाठी आवश्यक आहे. लसनिर्मितीमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे आणि प्रत्यही होत आहे. काही पूर्णपणे अपरिचित आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. करोनाचे संकट अभूतपूर्व असल्यामुळे त्यातून त्वरित मार्ग काढणे आवश्यक असले, तरी अशी घाई लसनिर्मिती प्रक्रियेत एका मर्यादेबाहेर करून चालत नाही याचे भान सरकारांनी आणि माध्यमांनीही राखणे आवश्यक आहे. नाहीतर लशी उदंड असूनही हाती काहीच नाही अशी फजिती होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:02 am

Web Title: article on vaccines developed on coronavirus abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 उद्यमशीलतेची अंतराळझेप
2 विलंबाने का होईना..
3 टाळेबंदीच्या बेजार अर्थखुणा
Just Now!
X