पौर्णिमेच्या पूर्णाकृती गोलाकार चंद्रासारखा सदोदित जीवनोल्हास वागवणारा हसतमुख चेहरा.. गळ्यात टपोरी मोत्याची माळ.. भाळावर ठसठशीत मोठे कुंकू.. अंबाडय़ात मोगऱ्याचा गजरा असा घरंदाज थाट असलेली रूपगर्विता हे अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे रूप गेली कित्येक वर्षे रसिकांच्या मनीमानसी ठसलेले आहे. गोव्याच्या कलासक्त भूमीतील काणकोणचा त्यांचा जन्म. साहजिकपणे कलेचे संस्कार रक्तातूनच झालेले. षोडशवर्षीय आशालतांच्या विलक्षण बोलक्या चेहऱ्याचे आणि गात्या गळ्याचे मोल‘ धि गोवा हिंदु असोसिएशन’चे रामकृष्ण नाईक व ज्येष्ठ नाटय़कर्मी गोपीनाथ सावकार यांनी जाणले आणि त्यांनी त्यांना नाटकात काम करण्याकरता पाचारण केले. आणि तिथून त्यांचा अभिनयाचा प्रवास कोकणी-मराठी नाटकांद्वारे जो सुरू झाला, तो अगदी त्यांच्या कालच्या जाण्यापर्यंत अखंड सुरूच राहिला.

त्याकाळी महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. गावोगावच्या हुन्नरी, सर्जनशील कलावंतांना आपले कसब दाखविण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे रंगपीठ निर्माण झाले होते. स्वाभाविकपणेच या राज्य नाटय़स्पर्धेत रंगभूमीवर नवनवे नाटय़ाविष्कार घडवू पाहणारे रंगकर्मी हिरीरीने भाग घेत. गोव्यातील नाटय़संस्थाही त्यात सहभागी होत असत. ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ ही सेवाभावी संस्था आपल्या कलाविभागातर्फे या स्पर्धेत त्यावेळी अहमहमिकेने उतरत असे. त्यांची निर्मिती असलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. शारदा’ या नाटकांतून आशालताबाईंनी आपल्या अभिनयाची छाप पाडून रसिक जाणकारांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या अभिनयाची रेंज या नाटकांतून दिसून आली आणि मग मुंबईच्या कलासक्त व्यावसायिक रंगभूमीनेही त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले. ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकाने त्यांना प्रचंड नावलौकिक मिळवून दिला व त्या नाटय़सृष्टीत स्थिरावल्या. त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’च्या पुनरुज्जीवित प्रयोगांत त्यांनी साकारलेली बेळगाव-कारवारकडची कडवेकर मामी आजही रसिकांच्या लख्ख स्मरणात आहे. पुढे जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ या गोव्यातील देवदासी प्रथेवरील कादंबरीवर आधारित ‘गुंतता हृदय हे’, पेशवाईतील राघोबादादा व नारायणराव यांच्यातील ‘भाऊबंदकी’चे चित्रण करणाऱ्या नाटकातील आनंदीबाई यांसारख्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी उत्तमरीत्या वठविल्या. ‘छिन्न’मध्ये स्मिता पाटील- सदाशिव अमरापूरकर यांच्यासारख्या कसलेल्या कलावंतांबरोबर त्या तेवढय़ाच ताकदीने उभ्या राहिल्या. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, निर्माते मोहन वाघ यांची ‘चंद्रलेखा’ या नामांकित नाटय़संस्थांतून त्यांनी ‘सोन्याची द्वारका’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, वि. वा. शिरवाडकरांचे ‘विदूषक’ अशा अनेक नाटकांतून कामे केली. पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडे त्यांनी गाण्याची तालीम घेतली होती. तसेच पं. जितेंद्र अभिषेकी यांनीही नव्या धर्तीच्या संगीत नाटकांच्या निमित्ताने आशालताबाईंना गायनाचे धडे दिले. रसानुकूल गाणे हे आशालताबाईंचे वैशिष्टय़. बहुतांश गायक नटांसारखा नाटकात गाण्याचा अतिरेक त्यांनी कधीच केला नाही. मोजके, नाटय़ाशय पुढे घेऊन जाणारे सुविहित गाणे हीच त्यांची खासियत राहिली.

बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटात त्यांना फिल्म फेअरचे उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकनही मिळाले. यानंतर त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलेच बस्तान बसले. ‘शौकीन’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘वो सात दिन’, ‘अंकुश’, ‘नमकहलाल’, ‘यादों की कसम’ असे संवेदनशील तसेच कमर्शियल धाटणीचे असे दोन्ही तऱ्हेचे सिनेमे त्यांनी केले. शंभराहून अधिक चित्रपट त्यांच्या खाती जमा आहेत, यावरून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची कल्पना यावी. मराठीतही त्यांनी ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ आदी अनेक चित्रपटांतून आपल्या विविधांगी अभिनयाचे दर्शन घडवले.

नव्वदच्या दशकात आपल्याकडे दूरचित्रवाहिन्यांचे पेव फुटले आणि मनोरंजनाचा धबधबा सुरू झाला. स्वाभाविकपणेच आशालताबाईंना मालिकांचे नवे विश्व खुणावू लागले. त्यांतही त्यांनी आपले वेगळेपण ठसविले. आपल्या या प्रदीर्घ कलाप्रवासातील आठवणी त्यांनी ‘गर्द सभोवती’ या पुस्तकातून शब्दबद्ध केल्या आहेत. कलावंत म्हणून त्या चतुरस्र होत्याच, त्याचबरोबर त्या उत्तम सुगरणही होत्या. याचे दाखले त्यांच्या हातचे सामिष पदार्थ चाखलेले त्यांचे सहकारी कलावंत नित्य देत असत.

एकीकडे कलाक्षेत्रात वलयांकित आयुष्य जगलेल्या आशालताबाई अलीकडच्या काळात व्यक्तिगत जीवनात मात्र एकटय़ा होत्या. पूर्वायुष्यातील आठवणींशी हितगूज करीत, येतील ती कामे स्वीकारीत आपले हे एकलेपण सुस करीत होत्या. सभोवती गर्द रान असूनही एकाकी असलेल्या ‘चाफेकळी’सारख्याच. कलाकारासाठी प्रत्यक्ष कलाक्षेत्रात कार्यरत असताना मरण येणे हे भाग्याचे समजले जाते. आशालताबाईंच्या भाळी हे भाग्य होते. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.